वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑरिक स्मार्ट सिटीने औद्योगिक उत्कृष्टता आणि परिवर्तनाची सहा वर्षे केली साजरी


विविध प्रकल्पांमुळे 71,343 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह, 62,405 रोजगारांचीही निर्मिती होणार

बिडकिन औद्योगिक क्षेत्रात 49 सूक्ष्म - लघु आणि मध्यम उद्योग, 27 मोठे प्रकल्प आणि 4 बिगर सूक्ष्म - लघु आणि मध्यम उद्योगांना भूखंडांचे वाटप

Posted On: 07 SEP 2025 4:41PM by PIB Mumbai

 

महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर मधील ऑरिक (शेंद्रा-बिडकिन औद्योगिक क्षेत्र) अर्थात औरंगाबाद औद्योगिक शहराला सहा वर्ष पूर्ण झाली. ऑरिकचा सहावा वर्षपूर्ती सोहळा म्हणजे औद्योगिक प्रगती, जागतिक गुंतवणूक आणि शाश्वत प्रगतीच्या गौरवाचा सोहळा आहे. ऑरिक हे राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर विकास कार्यक्रमांतर्गत (NICDP) विकसित केले गेलेले  भारतातील पहिल्या हरित क्षेत्र  औद्योगिक स्मार्ट शहरांपैकी एक शहर आहे.

ऑरिक : प्रगती आणि प्रभाव

* या सहा वर्षांमध्ये, औद्योगिक आणि संमिश्र हेतूने वापर (mixed-use) या दोन्ही श्रेणींअंतर्गत 3,029 एकर औद्योगिक जमीन आणि 117 एकर मिश्र-वापर जमिनीवर इतक्या क्षेत्राच्या एकूण 323 भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. या प्रकल्पांअंतर्गत एकूण 71,343 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीची तर  62,405 इतक्या संख्येने रोजगार (थेट आणि अप्रत्यक्ष) निर्मितीची क्षमता आहे.

* सध्या, 78 युनिट्स कार्यरत असून, 62 कारखान्यांच्या उभारणीचे काम सुरू आहे, तर 184 युनिट्सच्या बांधकामाची तयारी सुरू आहे.

सहा वर्षांतील यश

* शेंद्रा औद्योगिक क्षेत्रात 135 सुक्ष्म - लघु आणि मध्यम उद्योगांना, 17 मोठ्या प्रकल्पांना, आणि 16 बिगर लघु आणि मध्यम उद्योगांना भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे (यात भारतात आपला पहिला स्पँडेक्स प्रकल्प सुरू करणाऱ्या दक्षिण कोरियाच्या ह्योसंग (Hyosung) यासारख्या महत्त्वाच्या गुंतवणूकीचाही अंतर्भाव आहे.).

* बिडकिन औद्योगिक क्षेत्रात 49 सुक्ष्म - लघु आणि मध्यम उद्योगांना, 27 मोठ्या प्रकल्पांना आणि 4 बिगर सुक्ष्म - लघु आणि मध्यम उद्योगांना भूखंडांचे वाटप झाले आहे. या औद्योगिक क्षेत्रात मोटार वाहन, इलेक्ट्रिक वाहने, पॉलिमर, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांतील जागतिक कंपन्या उभ्या राहात आहेत.

* ऑरिकमधील औद्योगिक जमिनीचे वाटप जवळपास पूर्ण झाले असून, यावरून इथल्या पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक आराखड्यावरचा गुंतवणूकदारांचा विश्वास दिसून येतो.

* वैशाली अजित देशपांडे (अनुकूल पॉवर इंजिनिअर्स प्रा. लि.), डॉ. हर्षाली संदीप देशमुख (टर्बोनोवा पॉलिमर प्रा. लि.) आणि पायल नाईकवाड (रेयॉन इल्युमिनेशन्स अँड एनर्जी सोल्युशन्स प्रा. लि.) यांसारख्या महिला उद्योजकांनी सर्वसमावेशक प्रगतीचे उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे.

* कर्मचाऱ्यांच्या क्षमता वृद्धीसाठी आणि त्यांच्या कौशल्यांना उद्योग क्षेत्राअंतर्गत सामावून घेण्याच्या उद्देशाने भारतीय उद्योग महासंघासोबतच्या  भागीदारीत ऑरिक इथे 20,000 चौरस फूट क्षेत्रात कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला गेला आहे.

* ऑरिक इथे 1 एप्रिल 2025 पासून सुक्ष्म - लघु आणि मध्यम उद्योगांकरता कार्यालयीने जागेच्या भाड्याच्या दरांमध्ये तब्बल 50% कपात करून ते, 50 रुपये प्रति चौरस फूटावरून 25 रुपयांपर्यंत कमी केले आहे.

शेंद्रा औद्योगिक क्षेत्र

या क्षेत्रात 6,096 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून 14,455 रोजगार निर्माण झाले आहेत. महत्त्वाच्या गुंतवणूकदारांमध्ये ह्योसंग (दक्षिण कोरिया) यांचा समावेश आहे. या कंपनीने भारतात शेंद्रा औद्योगिक क्षेत्रात आपला पहिला स्पॅन्डेक्स प्रकल्प स्थापन केला आहे. इतर उल्लेखनीय गुंतवणूकदारांमध्ये पर्किन्स (यूके), फुजी सिल्व्हरटेक (जपान), ओरलिकॉन बाकियर्स (लिकटेंस्टाईन), सीमेन्स (जर्मनी), एनएलएमके (रशिया), कोहलर (यूएसए), कोटॉल फिल्म्स (भारत), एन्ड्युरन्स कम्प्लीट सोल्युशन्स (भारत), डेटपॅक (भारत) इत्यादींचा समावेश आहे.

बिडकिन औद्योगिक क्षेत्र

बिडकिन औद्योगिक क्षेत्र मराठवाडा विभागात विकासाचे इंजिन म्हणून वेगाने उदयास आले आहे. या औद्योगिक क्षेत्राने 76,219 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित केली आहे. एथर एनर्जी (ईव्ही), लुब्रिझोल (रसायने), टोयोटा किर्लोस्कर (वाहन निर्मिती) आणि जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी या कंपन्यांचा समावेश असून यात 35,000 हून अधिक रोजगार निर्मितीची क्षमता आहे.

राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक रजत कुमार सैनी म्हणाले, “ उत्पादन, शाश्वतता आणि समावेशक वाढ यांचे भविष्यासाठी सज्ज केंद्र निर्माण करणाऱ्या ऑरिकचा प्रवास एनआयसीडीसी स्मार्ट सिटीजच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. अवघ्या सहा वर्षांच्या कालावधीत ऑरिक हे जागतिक आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षण केंद्र बनले आहे. यामुळे औद्योगिक शहरे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना कसे  सक्षम बनवू शकतात, रोजगार निर्माण करू शकतात आणि प्रादेशिक परिवर्तन करू शकतात याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. आपण भविष्याकडे पाहत असताना, ऑरिक सारखी स्मार्ट शहरे येत्या दशकांपर्यंत भारताच्या विकासगाथेला चालना देत राहतील याकडे लक्ष देण्यावर आमचा भर आहे.

ऑरिक गुंतवणूकदारांना जागतिक दर्जाचे प्लग-अँड प्ले पायाभूत सुविधा प्रदान करते, यात रुंद रस्ते, खात्रीशीर पाणी आणि वीज पुरवठा, तसेच प्रगत मलनिस्सारण आणि सांडपाणी प्रक्रिया सुविधा यांचा समावेश आहे. या शहरात तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, यात ई-गव्हर्नन्स, सिंगल-विंडो क्लिअरन्स, ऑनलाइन जमीन आणि इमारत आराखडा मंजूरी तसेच केंद्रीय कमांड आणि नियंत्रण प्रणाली यांचा समावेश आहे. वीज वितरण परवाना आणि भूमिगत नेटवर्कसह, ऑरिक अखंडित, उच्च-गुणवत्तेचा आणि स्पर्धात्मक दरातील वीजपुरवठा सुनिश्चित करते. हे औद्योगिक शहर वाहन निर्मिती, इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स, औषधनिर्माण, कापड, अन्न प्रक्रिया, माहिती तंत्रज्ञान, आयटीईएस आणि रसायने यांचा समावेश असलेल्या क्षेत्रीय समूह-आधारित मॉडेलवर विकसित केले जात आहे. यामुळे व्यवसायांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण उपलब्ध होईल.

या प्रदेशाला बहुआयामी संपर्कयोजनेचा लाभ मिळत असून त्यामध्ये समृद्धी महामार्ग, प्रस्तावित संभाजीनगरपुणे ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे, जालना ड्राय पोर्ट, औरंगाबाद विमानतळाशी जवळीक तसेच महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचा समावेश आहे. पंतप्रधान गतिशक्ती योजनेशी सुसंगत असलेल्या या संपर्क उपक्रमांमुळे दळणवळण कार्यक्षमता वाढली असून ऑरिक हे एक स्पर्धात्मक गुंतवणूक केंद्र बनले आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ऑरिक  हा दिल्लीमुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा अविभाज्य घटक असून, त्यामुळे त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारांशी अधिक दृढ नाते जोडले गेले आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर प्रमुख उत्पादन व गुंतवणूक केंद्र म्हणून अधिक प्रस्थापित होत आहे.

ऑरिकसाठी गुंतवणूकदारांना सहाय्य करण्याकरिता सतत उच्चस्तरीय संवाद साधला जातो. वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि डीपीआयआयटी ( डीपीआयआयटी) चे सचिव अमरदीपसिंह भाटिया यांनी गुंतवणूकदारांशी संवाद साधण्यासाठी तसेच प्रत्यक्ष प्रगतीचा आढावा घेण्यासाठी भेटी दिल्या आहेत. यामुळे समस्यांचे  वेळेवर निराकरण होत असून व्यवसाय सुलभतेत सातत्याने सुधारणा घडवून आणली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 सप्टेंबर 2019 रोजी ऑरिक सिटीचे उद्घाटन केले. त्याच दिवशी सहा मजली ऑरिक सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले, जे या स्मार्ट सिटीचे प्रशासकीय आणि देखरेख केंद्र म्हणून कार्यरत असून तंत्रज्ञानाधारित प्रशासन आणि व्यवसाय सुलभता प्रति बांधिलकीचे प्रतीक आहे.

ऑरिक हे 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याच्या महाराष्ट्राच्या ध्येयात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सशक्त पायाभूत सुविधा, नामांकित गुंतवणूकदार आणि रोजगारनिर्मितीमुळे ऑरिक विकसित भारत @ 2047या राष्ट्रीय दृष्टिकोनातही हातभार लावत आहे. या शहराने मराठवाड्यासाठी उत्पादन, निर्यात व नवनिर्मिती यांची समृद्ध परिसंस्था उभी केली  असून, केवळ सहा वर्षांत ऑरिक  हे औद्योगिक स्मार्ट सिटींसाठी एक आदर्श ठरले आहे.

ऑरिक विषयी

ऑरिक ही दिल्लीमुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत विकसित केलेली ग्रीनफिल्ड औद्योगिक स्मार्ट सिटी आहे. तिचे व्यवस्थापन महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड (एमआयटीएल) या विशेष उद्देशाने स्थापन केलेल्या कंपनीकडे असून ती भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे.

शेंद्रा व बिडकीन (ऑरिक) येथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, मोठ्या सलग जमिनीचे तुकडे, ‘प्लग-अँड-प्लेसुविधा आणि एक खिडकी मंजुरी प्रणाली उपलब्ध असून, देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित केले जात आहे. येथे विशेषतः वाहन उद्योग , अभियांत्रिकी, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, कापड, अन्न प्रक्रिया आदी क्षेत्रांवर भर दिला जातो.

***

सुषमा काणे / तुषार पवार / श्रद्धा मुखेडकर / नितीन गायकवाड / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2164508) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil