संरक्षण मंत्रालय
भारताच्या पहिल्या प्रशिक्षण जहाजांची स्क्वाड्रन सेशेल्स इथून रवाना
Posted On:
05 SEP 2025 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2025
भारताच्या पहिल्या प्रशिक्षण जहाजांची स्क्वाड्रन (फर्स्ट ट्रेनिंग स्क्वाड्रन - 1TS) दि. 4 सप्टेंबर 2025 रोजी सेशेल्स इथल्या व्हिक्टोरिया बंदरातून रवाना झाला. या ताफ्यात आयएनएस तीर, आयएनएस शार्दुल आणि आयसीजीएस सारथी यांचा समावेश होता. या प्रशिक्षणानंतर या स्क्वाड्रनने दूरच्या अंतरातील प्रशिक्षण तैनातीचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आपल्या चार दिवसांच्या सेशेल्स भेटीदरम्यान, भारतीय नौदल आणि सेशेल्सच्या संरक्षण दलामध्ये विविध व्यावसायिक देवाणघेवाण, प्रशिक्षण विषयक भेटी तसेच सामाजिक संवादांसारखे द्विपक्षीय उपक्रम पार पडले. या सगळ्यातून दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ झाले आहे.
या बंदराला दिलेल्या भेटीदरम्यान पहिल्या प्रशिक्षण जहाजांच्या स्क्वाड्रनचे वरिष्ठ अधिकारी कॅप्टन टिजो के जोसेफ यांनी आयएनएस शार्दुल आणि आयसीजीएस सारथीच्या कमांडिंग ऑफिसर्ससह सेशेल्सचे परराष्ट्र व्यवहार आणि पर्यटन मंत्री सिल्वेस्टर राडेगोंडे तसेच सेशेल्सच्या संरक्षण दलाचे चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस (CDF) मेजर जनरल मायकेल रोसेट यांची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकांमध्ये सेशेल्स आणि भारतामधील दृढ भागिदारी अधिक बळकट करण्याच्या मुद्यावर विशेषत्वाने चर्चा झाली. यासोबतच सेशेल्सचे संरक्षण दल आणि भारतीय सशस्त्र दलांमधील लष्करी सहकार्याबद्दलही चर्चा केली गेली.

या भेटीच्या निमित्ताने भारताच्या पहिल्या प्रशिक्षण जहाजांच्या स्क्वाड्रनमधील जहाजांवर एका स्वागत समारंभाचेही आयोजन केले गेले. या समारंभात सेशेल्सच्या संरक्षण दलाचे वरिष्ठ अधिकारी, सेशेल्समधील भारतीय समुदायाचे सदस्य, राजदूत आणि इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. सेशेल्सच्या संरक्षण दलाचे चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस मेजर जनरल मायकेल रोसेट यांनी प्रादेशिक सागरी सहकार्य बळकट करण्यात भारतीय नौदलाने दिलेल्या योगदानाचा गौरव केला आणि दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याप्रती सेशेल्सची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली.
IBS2.jpeg)
या भेटीदरम्यान, भारताच्या पहिल्या प्रशिक्षण जहाजांच्या स्क्वाड्रनमधील जहाजांवर आयोजित संयुक्त योग सत्रांमध्ये स्थानिक लोक आणि तिथे वसलेल्या भारतीय समुदायाच्या लोकांनी उत्साहाने भाग घेतला. भारतीय नौदलाच्या बँडने व्हिक्टोरिया टाउन क्लॉक टॉवर इथे लक्ष्यवेधी सादरीकरणातून आपले कौशल्य दाखवले, सेशेल्स नागरिकांनीही या सादरीकरणाची प्रशंसा केली. या निमित्ताने भारतीय नौदल आणि सेशेल्सच्या संरक्षण दलाच्या जवानांमध्ये एक मैत्रीपूर्ण फुटबॉल सामनाही खेळवला गेला. अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांतून दोन्ही दलांमधील सौहार्द आणि एकोपा अधिक वृद्धींगत झाला. यासोबतच सामुदायिक प्रचार प्रसार कार्यक्रमाचा भाग म्हणून, पॉइंट लारुये इथल्या वृद्धाश्रमातील रहिवाशांना आवश्यक वस्तू पुरवल्या गेल्या, तसेच वैद्यकीय तपासणी उपक्रमही राबवला गेला.

ही भेट भारतीय नौदलाच्या प्रशिक्षणार्थींना समृद्ध अनुभव देणारी ठरली. या भेटीदरम्यान प्रशिक्षणार्थींनी सेशेल्स तटरक्षक दलाचा तळ तसेच सागरी प्रशिक्षण आणि मदत केद्राला भेट दिली. परस्पर प्रशिक्षण भेटीचा भाग म्हणून, सेशेल्सच्या संरक्षण दलाच्या जवानांना भारताच्या पहिल्या प्रशिक्षण जहाजांच्या स्क्वाड्रनमधील जहाजांवर छोट्या स्वरुपाची शस्त्रे हाताळण्याचे आणि अग्निशमन प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले गेले. यासोबतच सेशेल्समधील ईएसपीएस नवारा अर्थात निश फ्रिगेट नवरा या युद्धनौकेलाही भेट दिली गेली. या भेटीदरम्यान स्पॅनिश नौदलासोबत व्यावसायिक पातळीवरील संवादाचेही आयोजन केले गेले.
या प्रशिक्षण भेटीतील नियुक्तीमुळे दोन्ही देशांमधील मैत्रीचे बंध अधिक दृढ झाले, तसेच महासागर (MAHASAGAR - Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across Regions) या दृष्टीकोनाअंतर्गत सागरी सहकार्य आणि प्रादेशिक भागीदारी मजबूत करण्याप्रती भारतीय नौदलाची वचनबद्धताही पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
QTF5.jpg)
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2164227)
Visitor Counter : 2