कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोळसा मंत्रालयाकडून मुंबईत स्टार रेटिंग पुरस्कार सोहळ्याचे आयोजन, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कोळसा आणि लिग्नाइट खाणींचा सन्मान


केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्र्यांनी सर्व भागधारकांना केले उत्कृष्टतेसाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आणि पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर व विकसित भारताच्या संकल्पात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन

कोळसा असलेल्या क्षेत्रात सामाजिक-आर्थिक विकास, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि जीवनमान सुधारणे, यासाठी खाणकाम क्षेत्राने उत्प्रेरक म्हणून भूमिका बजावावी : केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी

जबाबदार खाणकामात उत्पादन कार्यक्षमतेसह पर्यावरण संरक्षण, खाण वैज्ञानिकरित्या बंद करणे आणि समुदाय कल्याणालाही समान प्राधान्य दिले पाहिजे: कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे

कोळसा क्षेत्रातील भागधारकांसाठी पारदर्शकता, कार्यक्षमता आणि माहितीची सुलभता वाढविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नव्या सीसीओ संकेतस्थळाचे परस्परसंवादी डॅशबोर्डसह अनावरण

Posted On: 04 SEP 2025 5:45PM by PIB Mumbai

मुंबई, 4 सप्‍टेंबर 2025

 

कोळसा मंत्रालयाने आज मुंबईत स्टार रेटिंग पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.  सुरक्षा, पर्यावरणीय शाश्वतता आणि परिचालनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कोळसा आणि लिग्नाइट खाणींचा सन्मान यावेळी करण्यात आला. या  कार्यक्रमाला केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी प्रमुख पाहुणे म्हणून तर राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.  कोळसा मंत्रालयाचे सचिव विक्रम देव दत्त, अतिरिक्त सचिव रुपिंदर ब्रार, मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि कोळसा सार्वजनिक उपक्रम तसेच खाजगी क्षेत्रातील खाण कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सुरक्षा, पर्यावरणीय देखभाल आणि उत्पादकता यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खाणींच्या कार्याची दखल या पुरस्कार सोहळ्यात घेण्यात आली.   या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या मंत्रालयाच्या वचनबद्धतेनुसार उच्च कामगिरी करणाऱ्या इतर खाणींना प्रमाणपत्रे आणि पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आले. केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खाणींना पंचतारांकित पुरस्कार प्रदान केले आणि सुरक्षितता व शाश्वततेच्या जागतिक मानकांचे पालन करत देशाची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यात त्यांनी बजावलेल्या  भूमिकेचे कौतुक केले.  स्टार रेटिंग उपक्रम हा केवळ एक पुरस्कार नाही तर जबाबदार खाणकामासाठी एक मापदंड आहे, यावर रेड्डी यांनी भर दिला.  सर्व खाणींना पंचतारांकित दर्जासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सर्वोच्च सुरक्षा आणि पर्यावरणीय मानकांचे पालन करत परिचालन उत्कृष्टता सुनिश्चित करण्यात उल्लेखनीय  कामगिरी केल्याबद्दल रेड्डी यांनी आपल्या बीजभाषणात सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.  कोळसा गॅसिफिकेशनला गती देण्यावर आणि मूल्यवर्धन, कमी उत्सर्जन व नव्या औद्योगिक संधी खुल्या व्हाव्यात यासाठी स्वच्छ कोळसा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर त्यांनी भर दिला. आयातीवरील अवलंबित्वाकडून कोळसा निर्यातीसाठी क्षमता बांधणीच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वॉशरीजचा अधिक उपयोग करत कोळशाची गुणवत्ता  सुधारण्यात यावी, असे ते म्हणाले. 

खाणकामाच्या केंद्रस्थानी समुदाय-केंद्रित आणि प्रगतीशील खाण बंद उपक्रम, मोठ्या प्रमाणात वनीकरण, कामगार सुरक्षा आणि कल्याण, नवोन्मेष, पर्यावरणीय जबाबदारी, शाश्वतता आणि स्पर्धात्मकता यांचा समावेश करण्याचे महत्त्वही रेड्डी यांनी अधोरेखित केले. नवोन्मेष अंगीकारत, देशाचे  कोळसा क्षेत्र संसाधनांचा वापर अनुकूलित करताना जागतिक मानकांची बरोबरी करू शकतो, असे ते म्हणाले. "सुधारणा, कामगिरी, परिवर्तन" हे केवळ एक घोषवाक्य नसून एक कर्तव्य असल्याचे सांगून, त्यांनी सर्व भागधारकांना उत्कृष्टतेसाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आणि पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर व  विकसित भारताच्या संकल्पात  सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. कोळसा असलेल्या क्षेत्रात सामाजिक-आर्थिक विकास, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि जीवनमान सुधारणे, यासाठी खाणकाम क्षेत्राने उत्प्रेरक म्हणून भूमिका बजावावी, असे रेड्डी यांनी सांगितले.

कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे यांनी आपल्या भाषणात, जबाबदार खाणकामात उत्पादन कार्यक्षमतेसह, पर्यावरण संरक्षण, वैज्ञानिक पद्धतीने खाण बंद  करणे आणि समुदाय कल्याण याला समान प्राधान्य दिले पाहिजे, यावर भर दिला. त्यांनी कोळसा क्षेत्र अधिक शाश्वत, सुरक्षित आणि लोककेंद्रित बनवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला पुन्हा एकदा दुजोरा दिला आणि भविष्यातील मूल्यांकनांमध्ये सर्व भागधारकांना सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

कोळसा मंत्रालयाचे सचिव विक्रम देव दत्त यांनी पंतप्रधानांच्या विकसित भारताच्या संकल्पावर  भर देताना, स्टार रेटिंग प्रणाली ही सुरक्षा, उत्पादकता, शाश्वतता आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब यामधील गुणवत्ता  वाढवण्यासाठी सामूहिक वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते यावर भर दिला.  प्रत्येक खाणीला आत्मनिर्भर  आणि विकसित भारत निर्माण करण्यात  साहाय्यभूत ठरण्यासाठी  जबाबदार खाणकामात आणखी उच्च मानके स्थापित करण्यासाठी  प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कोळसा मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव रुपिंदर ब्रार यांनी स्वागतपर भाषणात, स्टार रेटिंग पुरस्कार सोहळा हा देशाच्या  कोळसा खाण कामगारांच्या समर्पण, शिस्त आणि कठोर परिश्रमाचा खरा उत्सव असून ते देशाच्या आर्थिक प्रगतीचा कणा असल्याचे सांगितले. 

या कार्यक्रमात कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज (सीसीयूएस), तसेच संशोधन व विकास यावरील  हॅकेथॉनच्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान  करण्यात आले. यातून  शाश्वत तंत्रज्ञानासाठी नवोन्मेषाला  चालना देण्याची  मंत्रालयाची  वचनबद्धता दिसून येते. या कार्यक्रमात  पारदर्शकता, कार्यक्षमता आणि भागधारकांसाठी माहितीची सुलभता वाढविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नव्या सीसीओ संकेतस्थळाचे  इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्डसह अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमात विशेष मुलांनी त्यांच्या प्रतिभेचे, सर्जनशीलतेचे आणि दृढनिश्चयाचे दर्शन घडवत  हृदयस्पर्शी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

 

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/सोनाली काकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2163778) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu