आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी एआयआयए, नवी दिल्ली येथे 'राष्ट्रीय आयुष अभियान आणि राज्यांमध्ये क्षमता निर्मिती ' यावरील विभागीय शिखर परिषदेचे केले उद्घाटन

Posted On: 03 SEP 2025 5:21PM by PIB Mumbai

 

आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी आज  नवी दिल्लीतील सरिता विहार येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था येथे 'राष्ट्रीय आयुष अभियान आणि राज्यांमध्ये क्षमता निर्मिती' या विषयावरील विभागीय शिखर परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद कुमार पॉल आणि आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा  उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना, केंद्रीय मंत्री  जाधव यांनी राज्य-निहाय गरजांनुसार एक लवचिक आणि समावेशक आरोग्य सेवा चौकट तयार करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला. देशभरात आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सर्वसमावेशक  मानक कार्यपद्धती (एसओपी) विकसित करण्याचा सरकारचा दृष्टिकोन जाधव यांनी अधोरेखित केला. " राज्य-निहाय  चौकट तयार करणे, उत्तम  आरोग्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक  एसओपी विकसित करणे, लोकांना दर्जेदार सेवा प्रदान करणे आणि आयुषचे आधुनिक आरोग्य प्रणालींबरोबर एकीकरण सुनिश्चित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे," असे ते म्हणाले.

पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली 2014 मध्ये सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय आयुष मिशनच्या प्रगतीचा आढावा घेताना, बद्दल बोलताना आयुष मंत्र्यांनी नमूद केले की या मिशनने परवडणाऱ्या आणि समावेशक आयुष आरोग्य सेवांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे.  संपूर्ण भारतात 12,500 आयुष्मान आरोग्य मंदिरे स्थापन करण्याच्या परिवर्तनकारी उपक्रमावर त्यांनी विशेष भर दिला. प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित करून ओपीडी-आधारित सेवांकडून  समग्र सेवा वितरण मॉडेलच्या दिशेने हा आमूलाग्र बदल आहे.

मंत्रालयाने  4, मार्च 2024 रोजी आयुष आरोग्य सेवा सुविधांसाठी भारतीय सार्वजनिक आरोग्य मानके (IPHS) सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. नीती आयोग आणि आरोग्य सेवा महासंचालनालय  यांच्याशी सल्लामसलत करून विकसित केलेली ही  मानके, आयुष पायाभूत सुविधा, मनुष्यबळ , क्षमता बांधणी, औषधे, गुणवत्ता हमी, क्लिनिकल चाचण्या आणि ब्रँडिंगमध्ये एकसमानता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक मैलाचा दगड आहेत.

एक महत्त्वपूर्ण घोषणा करताना जाधव यांनी जाहीर केले की आयुर्वेद दिन आता दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल, या वर्षी 10 वा वर्धापन दिन "लोकांसाठी आणि ग्रहासाठी आयुर्वेद" या संकल्पनेअंतर्गत साजरा केला जात आहे. पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करताना वैयक्तिक निरामय आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी आयुर्वेदाची प्रासंगिकता ही संकल्पना अधोरेखित करते. आयुर्वेद दिनाला जागतिक आरोग्य उपक्रमात रूपांतरित करण्यासाठी त्यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सक्रीयपणे सहभागी होण्याचे आणि एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

संस्थात्मक विकासाच्या संदर्भात , आयुषशी संबंधित विमा बाबींवर हितधारकांना मदत करण्यासाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये  (एआयआयए)  प्रकल्प व्यवस्थापन युनिट  कार्यान्वित करण्याची घोषणा मंत्र्यांनी केली. विमा यंत्रणेच्या माध्यमातून आयुष उपचार सुलभरीत्या उपलब्ध करून देण्यात हे युनिट एक समर्पित इंटरफेस म्हणून काम करेल.

त्यांनी एआयआयए येथे 'आयुर्वेद प्रगत केंद्र' चे  देखील उद्घाटन केले  जो आयुर्वेद शिक्षण आणि संप्रेषणासाठी समर्पित एक अग्रगण्य डिजिटल प्लॅटफॉर्म आहे . तज्ञांच्या नेतृत्वाखालील अभ्यासक्रम, लाईव्ह  वेबिनार आणि परस्परसंवादी सत्रांद्वारे आयुर्वेद शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे. आयुष क्षेत्रात क्षमता निर्मिती , निरंतर व्यावसायिक विकास आणि नवोन्मेषाला चालना देण्यात हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.

सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी आयुष आणि योगाचे मिश्रण असलेला 'हर घर आयुर्वेद' उपक्रम  प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याच्या गरजेवर  भर दिला, जो निरोगी राष्ट्र निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. सहा प्रमुख उप-संकल्पनांवर आधारित या दोन दिवसीय शिखर परिषदेचे उद्दिष्ट वर्तणुकीतील बदलाद्वारे  एकात्मतेला चालना देणे असून आयुष धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीत ती महत्त्वपूर्ण योगदान देईल, असे त्यांनी सांगितले.

राज्य/केंद्रशासित प्रदेशातील अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेली राज्य-निहाय  माहिती आणि अभिप्राय यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे हे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे, ज्यामध्ये तळागाळातील सूचनांचा देखील समावेश आहे.

बातमीसाठी इथे भेट द्या  - https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2162389

***

शैलेश पाटील / सुषमा काणे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2163487) Visitor Counter : 2