पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्ली येथे 20 व्या जागतिक शाश्वतता शिखर परिषदेला केले संबोधित

Posted On: 02 SEP 2025 11:59AM by PIB Mumbai

 

सीआयआय-आयटीसी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटने आयोजित केलेल्या 20 व्या जागतिक शाश्वतता शिखर परिषदेमध्ये केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारताच्या लवचिक, पुनरुत्पादक आणि जबाबदार विकासाच्या प्रवासाचे वर्णन केले. व्यासपीठावर भारतीय उद्योग महासंघाचे (सीआयआय) महासंचालक चंद्रजित बॅनर्जी आणि सीआयआयचे माजी अध्यक्ष संजीव पुरी यांचा समावेश होता. या मेळाव्यात 10 हून अधिक देशांचे प्रतिनिधी आणि उद्योगातील दिग्गजांचा समावेश होता.

आज नवी दिल्लीत जागतिक प्रतिनिधींना संबोधित करताना यादव यांनी अधोरेखित केले की भारताचे विकास प्रारूप आर्थिक प्रगती आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाचे संतुलन साधण्यासाठी सखोल रुजलेले आहे. मंत्र्यांनी स्पष्ट केले की सध्याचे जागतिक व्यापार तणाव, धोरणात्मक अनिश्चितता, भू-राजकीय संघर्ष आणि जागतिक वित्तीय गुंतवणुकीतील प्रमुख अर्थव्यवस्थांद्वारे आणले जाणारे अडथळे हे सर्व एकत्रितपणे एक संवेदनशील वातावरण निर्माण करतात. त्यासाठी त्यांनी सर्व देशांना वर्तुळाकार अर्थव्यवस्थेचे प्रारूप, निसर्गाशी निगडित कृती, हरित उत्पादन आणि जबाबदार पद्धतींसाठी वर्तन बदलाला चालना देणारे अर्थव्यवस्था-व्यापी उपाय स्वीकारून विकासासाठी शाश्वतता पायाभूत बनवण्याचे आवाहन केले.

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी एकात्मिक जागतिक धोरणावर लक्ष केंद्रित करताना यादव म्हणाले, "आर्थिक वाढीची शाश्वततेशी सांगड कशी घालता येईल हे भारताचा धोरणात्मक आराखडा आणि विकास प्रारूप यामुळे समजू शकेल. यामुळे लवचिक, कमी-कार्बनयुक्त विकास मार्ग विकसित करता येतील. हा एकात्मिक दृष्टिकोन शाश्वत, समावेशक आणि वास्तववादी विकास प्रारूपाच्या शोधात असणाऱ्या ग्लोबल साऊथमधील देशांसाठी मौल्यवान धडे देतो. विकासाची कुंठितता अनुभवणाऱ्या विकसित अर्थव्यवस्था आपल्या विकासाच्या प्रतिमानांचे परिवर्तनात्मक पुनर्संचयन करू शकतात आणि शाश्वतता, सामाजिक समता आणि टिकाऊ लवचिकतेवर लक्ष केंद्रित करू शकतात", असे ते म्हणाले.

या परिवर्तनाच्या प्रवासात उद्योगांनी तसेच जागतिक भागधारकांनी हातभार लावावा , असे आवाहन करत मंत्र्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. पुढील दोन दिवसांत शिखर परिषदेत समृद्ध, समावेशक भविष्य सुनिश्चित करणाऱ्या परिवर्तनाच्या मार्गांवर चर्चा होईल असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला.

***

माधुरी पांगे / नंदिनी मथुरे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2163186) Visitor Counter : 7