शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आश्चर्यकारक थंड मीरा ताऱ्यांमुळे वैश्विक विस्ताराच्या स्वतंत्र दराच्या मापनाला मिळाला नवा आधार


सह-लेखक म्हणून नोबेल पारितोषिक विजेत्यासह केलेल्या पुण्यातल्या आयुका या संस्थेच्या नव्या अभ्यासात ऑक्सिजन समृद्ध मीरा परिवर्तनशील ताऱ्यांचा हबल स्थिरांकाचे अत्यंत अचूक मापन करण्यासाठी वापर

Posted On: 31 AUG 2025 6:23PM by PIB Mumbai

 

 

Pune, India

पुण्याच्या आयुका या खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी आंतर विद्यापीठ केंद्राचे प्राध्यापक अनुपम भारद्वाज यांनी अलीकडेच केलेल्या एका महत्त्वाच्या संशोधनात आपल्या आकाशगंगेतील 18 तारकापुंजांमध्ये असलेल्या परिवर्तनशील ऑक्सिजनसमृद्ध 40 मीरा व्हेरिएबल्स ताऱ्यांचा वापर केला.

या संशोधनामध्ये सहभागी असलेल्या संशोधकांच्या पथकाने या ‘मीरा ताऱ्यांचे’ दीर्घकाळ निरीक्षण केले आणि त्यांची सरासरी प्रकाशदिप्ती  आणि स्पंदन कालावधी निश्चित केले. युरोपियन स्पेस एजन्सीच्या ‘गाया मिशन’ने  पृथ्वीपासून 13,000 ते 55,000 प्रकाश-वर्षांच्या अंतरावर असलेल्या या तारकापुंजांच्या अचूक भूमितीय अंतराची माहिती देऊन महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे ‘मीरा व्हेरिएबल्स’ ताऱ्यांच्या प्रकाशमानतेचे निरपेक्ष कॅलिब्रेशन शक्य झाले, ज्यामुळे मापनामध्ये एक नवीन स्तराची अचूकता प्राप्त झाली.

या ‘मीरा व्हेरिएबल्स’साठी तयार झालेल्या "निरपेक्ष" कालावधी- प्रकाशदिप्ती संबंधाने, ‘सेफिड व्हेरिएबल्स’चा वापर न करता, वैश्विक अंतर शिडीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘सुपरनोव्हा’चे स्वतंत्र कॅलिब्रेशन प्रदान केले. या यशामुळे या पथकाला ‘हबल स्थिरांक’ 3.7% च्या उल्लेखनीय अचूकतेसह निश्चित करता आला. हा अभ्यास नुकताच प्रतिष्ठेच्या ‘ॲस्ट्रोफिजिकल जर्नल’मध्ये प्रकाशित झाला आहे.

या अभ्यासाचे प्रमुख लेखक प्रा. भारद्वाज म्हणाले, “या थंड ताऱ्यांवर आधारित सर्वात अचूक वैश्विक विस्तार दर निश्चित करण्यासाठी आम्ही प्रथमच आपल्या आकाशगंगेतील मीरा ताऱ्यांचा आधार म्हणून वापर केला.” ते पुढे म्हणाले, “‘सेफिड व्हेरिएबल्स’प्रमाणेच, आमच्या आकाशगंगेतील ‘मीरा व्हेरिएबल्स’ने आम्हाला बाह्य-आकाशगंगांच्या (extragalactic) अंतर शिडीचे तीन-आधारभूत कॅलिब्रेशन  स्थापित करण्याची सुविधा दिली, ज्यात दोन बाह्य आकाशगंगांमधील अतिरिक्त ‘मीरा व्हेरिएबल्स’चा वापर केला गेला. हे काम दर्शविते की 'धातू-विपुलता' मीराच्या प्रकाशदीप्तीवर ‘सेफिड’च्या तुलनेत तीन पटीने कमी परिणाम करते, ज्यामुळे ‘मीरा’ हे ‘हबल स्थिरांक’ निश्चित करण्यासाठी एक आशादायक पर्यायी साधन ठरले आहेत.

या संशोधनामध्ये सह-लेखक असलेले ‘स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूट’ आणि ‘जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’चे नोबेल पारितोषिक विजेते ॲडम रीस, यांच्या मते, हे नवीन संशोधन चालू वादविवादावर एक शक्तिशाली तोडगा उपलब्ध करत आहे. “सेफिड आणि मीरा यांच्यावर आधारित ‘हबल स्थिरांका’च्या मूल्यांमधील सुसंगतता हे दर्शवते की ‘हबल तणाव’ (Hubble tension) मापनातील त्रुटींमुळे असण्याची शक्यता कमी आहे, आणि ते नवीन भौतिकशास्त्राच्या शक्यतेसह अधिक मूलभूत कारणाकडे निर्देश करत आहे.”

हा अभ्यास तारकीय खगोलशास्त्र आणि विश्वविज्ञान या क्षेत्रांना एकत्र आणत असून याचा दीर्घकाळ परिणाम होईल, अशी आपली अपेक्षा असल्याचे या अभ्यासाच्या आणखी एक सह-लेखिका आणि ‘युरोपियन सदर्न ऑब्झर्वेटरी’मधील खगोलशास्त्रज्ञ डॉ. मरीना रेजकुबा यांनी सांगितले आहे. जरी अंतर शिडीच्या पहिल्या टप्प्यावर मीराचे कॅलिब्रेशन आता सेफिड्सच्या अचूकतेशी जुळत असले, तरी मीरा-आधारित ‘हबल स्थिरांक’ मापनातील एकूण अनिश्चितता अजूनही ज्ञात ‘मीरा’ असलेल्या आकाशगंगांच्या मर्यादित संख्येमुळे ( केवळ दोन ‘सुपरनोव्हा होस्ट’ आकाशगंगांमध्ये ज्ञात मीरा आहेत) प्रभावित आहे. तथापि, ‘रुबिन वेधशाळे’द्वारे ‘सुपरनोव्हा होस्ट’ आकाशगंगांमध्ये मोठ्या प्रमाणात मीरा शोधले जाण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे विश्वाचे वय आणि आकार अचूकपणे मोजण्याचा एक नवीन मार्ग खुला होईल.

पार्श्वभूमी

मीरा, ज्याला ‘ओमायक्रॉन सेती’ म्हणूनही ओळखले जाते, हा एक असा तारा आहे जो नियमित पॅटर्नमध्ये त्याच्या तेजस्वीपणात कमालीचा बदल करतो. 17 व्या शतकात खगोलशास्त्रज्ञांनी प्रथम याच्या परिवर्तनाचे मोजमाप केले होते, ‘मीरा’ हे "व्हेरिएबल स्टार" चे पहिले ज्ञात उदाहरण होते—हा असा तारा आहे जो एका स्थिर तेजस्वीपणाने चमकत नाही. ‘मीरा’ या नावाचा लॅटिन भाषेत अर्थ "अद्भुत" असा होतो, आणि त्याने ‘मीरा व्हेरिएबल्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संपूर्ण ताऱ्यांच्या वर्गासाठी एक ‘प्रोटोटाइप’ बनून हे नाव सार्थ केले.

***

निलीमा चितळे / शैलेश पाटील / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2162542) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil