युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
क्रीडा साहित्य निर्मिती परिषदेत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांनी केली पहिल्या-वहिल्या पोषण पूरक चाचणी रेफरल प्रयोगशाळांची घोषणा
Posted On:
30 AUG 2025 6:09PM by PIB Mumbai
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) आणि संबंधित संस्था यांच्यातील त्रिपक्षीय सामंजस्य करारांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या दोन पोषण पूरक चाचणी प्रयोगशाळांना NABL अधिस्वीकृती आणि FSSAI रेफरल लॅबची परवानगी मिळाल्याची औपचारिक घोषणा केली आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज नवी दिल्ली येथील द अशोक हॉटेलमध्ये क्रीडा साहित्य निर्मिती परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत ही घोषणा करण्यात आली. भारताच्या क्रीडा साहित्य परिसंस्थेला बळकटी देणे आणि स्वदेशी निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या परिषदेत धोरणकर्ते, उद्योगांचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञ एकत्र आले होते.
या परिषदेत ज्या प्रयोगशाळांना मान्यता मिळाल्याची घोषणा करण्यात आली त्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर रिसर्च अँड ॲनालिसिस ऑफ नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी (NFSU), गांधीनगर, गुजरात, आणि ॲनालिटिकल टेस्टिंग लॅबोरेटरी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (NIPER), हैदराबाद या दोन संस्था असून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दोन्ही संस्थांचा सत्कार केला आणि या पथदर्शी उपक्रमाच्या आवश्यकतेवर भर दिला. पोषण पूरकांचा (nutritional supplements) ॲथलीटस्द्वारे मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. परंतु भारतात समर्पित चाचणी सुविधांच्या अभावामुळे, त्यांना अनवधानाने उत्तेजक द्रव्य सेवनाच्या(डोपिंग) धोक्याला सामोरे जावे लागते. म्हणजेच, त्यांना नकळत असुरक्षित किंवा दूषित उत्पादने घ्यावी लागतात, जी खेळांमध्ये प्रतिबंधित आहेत आणि ज्यामुळे डोपिंग चाचणी सकारात्मक येऊ शकते.
देशात प्रथमच,पोषण पूरकांमध्ये जागतिक उत्तेजक द्रव्य-विरोधी संस्था (WADA) द्वारे प्रतिबंधित पदार्थांच्या चाचणीसाठी विशेष प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे पूरकांची सुरक्षा आणि गुणवत्ता सुनिश्चित होईल, अनवधानाने होणारे डोपिंग उल्लंघन रोखता येईल आणि खेळांमध्ये निष्पक्षतेला प्रोत्साहन मिळेल.
या रेफरल प्रयोगशाळांची स्थापना, भारताची उत्तेजक द्रव्य-विरोधी (anti-doping) चौकट मजबूत करण्याच्या, वैज्ञानिक क्षमता निर्माण करण्याच्या आणि खेळाडूंना विश्वसनीय, प्रमाणित पौष्टिक उत्पादने उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
***
सुषमा काणे / शैलेश पाटील / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2162378)
Visitor Counter : 15