रसायन आणि खते मंत्रालय
भारत, परवडणाऱ्या दरात आणि नाविन्यपूर्ण आरोग्यसेवा सुविधा पुढे नेणार : 17व्या CII ग्लोबल मेडटेक शिखर संमेलन 2025 मध्ये केंद्रीय सचिव अमित अग्रवाल यांचे प्रतिपादन
सरकारी धोरणे आणि स्पर्धात्मक उद्योग, भारताच्या मेडटेक क्षेत्राला सातत्याने दहा टक्क्यांहून अधिक वाढीच्या मार्गावर नेत आहेत.
उच्च दर्जाच्या वैद्यकीय उपकरणांमध्ये आत्मनिर्भर (स्वावलंबी) होण्याच्या दिशेने भारत मोठी पावले उचलत आहे.
Posted On:
30 AUG 2025 9:17AM by PIB Mumbai
औषध विभागाचे सचिव श्री. अमित अग्रवाल यांनी नवी दिल्लीत झालेल्या 17व्या CII ग्लोबल मेडटेक– या जागतिक वैद्यकीय तंत्रज्ञान शिखर संमेलनात, भारताचे वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील उदयोन्मुख केंद्र म्हणून झालेले रूपांतर अधोरेखित केले. या संमेलनाची संकल्पना होती – “आरोग्यदायी भविष्यासाठी नवोन्मेष – जागतिक परिणाम साधणारी मेडटेक प्रगती: मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड (जगासाठी भारतीय उत्पादन)”.
उद्घाटन सत्रात वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिनिधींना संबोधित करताना श्री. अमित अग्रवाल यांनी सांगितले की, जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या भारतात, परवडणाऱ्या आणि नाविन्यपूर्ण आरोग्यसेवा सुविधांची मागणी येत्या दशकांमध्ये सातत्याने दहापेक्षा जास्त टक्क्यांनी वाढत राहील. त्यांनी यावर भर दिला की मेडटेक क्षेत्राचे मूळ ध्येय हे रुग्णकल्याणावर केंद्रित असले पाहिजे आणि देशांतर्गत तसेच जागतिक बाजारासाठी उच्च दर्जाची, किफायतशीर वैद्यकीय उपकरणे विकसित करण्याकडे त्याची वाटचाल असली पाहिजे.
श्री. अग्रवाल यांनी नमूद केले की, कोविडनंतर भारताने प्रगत उपकरणांच्या देशांतर्गत उत्पादनात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यात MRI आणि CT स्कॅन यंत्र, मॅमोग्राफी युनिट्स, व्हेंटिलेटर्स, स्टेंट्स, हृदयाच्या झडपा, डायलिसिस (रक्तशुद्धीकरण) यंत्र तसेच विविध प्रकारची इम्प्लांट (मानवी शरीरात बसवली जाणारी) उपकरणे यांचा समावेश आहे. ते म्हणाले – “दहा वर्षांपूर्वी स्थानिक पातळीवर उत्पादन अशक्य वाटणारी उत्पादने आज भारतात तयार होत आहेत. यामुळे देशाची वाढती क्षमता आणि नवोन्मेषी परिसंस्था ( नवकल्पनांना पोषक वातावरण आणि व्यवस्था) स्पष्टपणे दिसून येते.”
सरकारकडून मिळणाऱ्या पाठबळावर प्रकाश टाकताना सचिवांनी सांगितले की पुढील वर्षभरात तीन स्वतंत्र वैद्यकीय उपकरणे केंद्र (मेडिकल डिव्हाइस पार्क्स) कार्यान्वित होणार आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पायाभूत सुविधा विकासासाठी सरकार मदत करणार असून, वैद्यकीय उपकरणांसाठीची उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) योजना हीसुद्धा या उद्योगाला पुढे नेणारे महत्त्वाचे धोरणात्मक पाऊल ठरत आहे. श्री. अग्रवाल यांनी नवकल्पक, उद्योजक आणि गुंतवणूकदार यांच्यात सखोल सहकार्याचे आवाहन केले, जेणेकरून प्रयोगशाळेतून उगम पावलेल्या नव्या कल्पना लवकरच बाजारात पोहोचतील आणि त्यामुळे भारताची जागतिक स्पर्धात्मकता अधिक बळकट होईल.
वैद्यकीय उपकरण केंद्र सुविधांचा विस्तार, PLI योजना, बॅकवर्ड इंटिग्रेशनसाठीची मार्जिनल इन्व्हेस्टमेंट योजना (वैद्यकीय उपकरण क्षेत्रात आयातीवरील अवलंबित्व कमी करून, आवश्यक कच्चा माल आणि घटक देशातच तयार व्हावेत, यासाठी दिले जाणारे गुंतवणूक प्रोत्साहन), तसेच लवकरच सुरू होणारी फार्मा-मेडटेक ( औषध वैद्यकीय तंत्रज्ञान) क्षेत्रातील 5000 कोटी रुपयांची संशोधन आणि नवोन्मेष प्रोत्साहन योजना (PRIP) , या उपक्रमांमुळे भारतीय मेडटेक क्षेत्राची किंमत-प्रतिस्पर्धात्मकता आणि उत्पादन कार्यक्षमता वाढेल. त्याचबरोबर देशांतर्गत मूल्यसाखळी अधिक सक्षम होईल आणि एक मजबूत नवोन्मेषी परिसंस्था उभी राहील. या पावलांमुळे भारताला स्वतःच्या गरजा तर भागवता येतीलच, सोबत जागतिक उत्तर आणि दक्षिण (विकसित आणि अविकसित -विकसनशील) दोन्ही भागांना परवडणाऱ्या, नाविन्यपूर्ण आरोग्यसेवा उपाय उपलब्ध करून देता येतील, असेही सचिव म्हणाले.
“जगातील अनेक देश आता भारताकडे केवळ बाजारपेठ म्हणून नाही तर आरोग्य क्षेत्रातील नवोन्मेषाचे नेतृत्व म्हणून पाहत आहेत. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून उद्योग आणि सरकार यांच्यातील भागीदारी अधिक दृढ करणे आवश्यक आहे, तेव्हाच मेडटेक क्षेत्राची पूर्ण क्षमता साध्य होईल,” असे श्री. अग्रवाल म्हणाले. त्यांनी असेही सांगितले की विद्यमान आर्थिक सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार करारांच्या मदतीने हे क्षेत्र कोट्यवधी नवी रोजगार निर्मिती करेल आणि सर्वांसाठी सहज उपलब्ध, उच्च दर्जाची आरोग्यसेवा सुनिश्चित करेल.
समारोप करताना श्री. अग्रवाल यांनी सर्व भागधारकांना भारताचे वैद्यकीय तंत्रज्ञान ध्येय (मेडटेक व्हिजन) घडवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. त्यांनी संपूर्ण मूल्यसाखळीत सर्व भागधारकांच्या भागीदारीतून संयुक्त आणि समन्वित प्रयत्नांची गरज व्यक्त केली, ज्यामुळे विकसित भारत 2047 या देशाच्या ध्येयाची पूर्तता साधता येईल.


***
यश राणे/ आशुतोष सावे / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2162293)
Visitor Counter : 14