युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या नेतृत्वाखाली भारतातील आतापर्यंतच्या सर्वात भव्य राष्ट्रीय क्रीडा दिन (एनएसडी) सोहळ्याचे आयोजन
नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील जागतिक दर्जाच्या पहिल्या मोंडो ॲथलेटिक्स ट्रॅकचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
29 AUG 2025 10:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2025
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 30 कोटी नागरिकांनी एकत्र येऊन आज राष्ट्रीय क्रीडा दिन 2025 साजरा केला. क्रीडा क्षेत्राशी संबंधित भारताच्या इतिहासातील, आणि निश्चितच जगातील हा सर्वात मोठा सोहळा होता. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी राजधानी दिल्ली मधील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये पुष्पांजली अर्पण करून या राष्ट्रीय उत्सवाची सुरुवात केली.त्यानंतर जवाहरलाल नेहरू (जेएलएन) स्टेडियमवर आयोजित सकाळच्या संवादात्मक क्रीडा उपक्रमांमध्ये क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (एसएआय) अधिकारी, भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए), भारतीय पॅरालिम्पिक समिती (पीसीआय), राष्ट्रीय क्रीडा महासंघ (एनएसएफ), जवाहरलाल नेहरू (जेएलएन) स्टेडियममधील खेळाडू आणि प्रशिक्षकांसह 2,000 हून अधिक लोकांनी हजेरी लावली.

यावेळी लाखो नागरिकांनी तंदुरुस्ती आणि आरोग्य कल्याणाची शपथ घेतली आणि या देशव्यापी उत्सवाची सुरुवात झाली. हा प्रसंग उत्कृष्टता, मैत्री आणि आदर या ऑलिंपिक मूल्यांचा आणि धैर्य, दृढनिश्चय, प्रेरणा आणि समानता या पॅरालिंपिक मूल्यांचा प्रतिध्वनी होता, ज्याने या दिवसाला एकात्मिक क्रीडा भावना दिली. शाळा, विद्यापीठे, पंचायती आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील खुल्या हॉकी प्रदर्शनांपासून, ते सामूहिक फिटनेस मोहिमेपर्यंत हा दिवस खऱ्या अर्थाने 'खेळांचे जनआंदोलन' म्हणून रंगला. भारतातील प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात आला. 'हर गली, हर मैदान, खेले सारा हिंदुस्तान', या घोषणेचे खऱ्या अर्थाने प्रतीक असलेला हा दिवस लोकांचा क्रीडा महोत्सव बनवण्याच्या सामूहिक प्रयत्नात कोणतीही संस्था मागे राहिली नाही.

देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री या उत्सवात सहभागी झाले. लखनौ (उत्तर प्रदेश) मधून योगी आदित्यनाथ, बंगळूरू (कर्नाटक) मधून सिद्धरामय्या, मोहन चरण माझी, भुवनेश्वर (ओडिशा) मधून, ईटानगर (अरुणाचल प्रदेश) मधून पेमा खांडू आणि देहरादून (उत्तराखंड) मधून पुष्करसिंग धामी, यात सहभागी झाले. आंध्र प्रदेश (विशाखापट्टणम), छत्तीसगड (रायपूर) आणि महाराष्ट्र (पुणे) येथील उपमुख्यमंत्र्यांनी या उपक्रमांचे नेतृत्व केले. इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, क्रीडा मंत्री आणि वरिष्ठ राजकीय प्रतिनिधींनी या मोहिमेला गती दिली.

जवारलाल नेहरू स्टेडियममध्ये भारताच्या पहिल्या मोंडो ॲथलेटिक्स ट्रॅकचे उदघाटन डॉ. मांडवीय यांनी केले.हा क्षण राष्ट्रीय राजधानीतील एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे. एसएआय भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अभियांत्रिकी शाखेने चार महिन्यांत ही सुविधा,पूर्ण करून विक्रम नोंदविला आहे
केंद्रीय मंत्री, पीसीआयचे अध्यक्ष देवेंद्र झझारिया, पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सुमित अंतिल, कांस्यपदक विजेती सिमरन शर्मा, दुहेरी पदक विजेती प्रीती पाल, सुवर्णपदक विजेते प्रवीण कुमार आणि ऑलिंपियन अंजू बॉबी जॉर्ज यांच्यासमवेत, नव्यानेच तयार केलेल्या 400 मीटरच्या या धावण्याच्या मार्गावर अनेक उत्साही क्रीडाप्रेमी धावण्यात सहभागी झाले होते.
'एक घंटा खेल के मैदान में' या संकल्पनेला पूर्ण करत दिवसाच्या उत्सवपूर्ण आणि समावेशक भावनेला अधोरेखित करत;सकाळच्या सत्राची अखेर मिनिस्टर्स इलेव्हन आणि मीडिया इलेव्हन यांच्यातील अनोख्या क्रिकेट सामन्याने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

डॉ.मांडवीय यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे स्मरण केले आणि ते म्हणाले, “खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे आणि नेहमीच राहील. आपल्या इतिहासातही विविध प्रकारच्या खेळांचा उल्लेख आहे.

टार्गेटेड ऑलिंपिक पोडियम स्कीम (टॉप्स), खेलो इंडिया आणि फिट इंडिया सारख्या उपक्रमांद्वारे ही भावना अधोरेखित केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो,असे ते म्हणाले. खेलो भारत नीती आणि राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा यासह, भारत ऑलिंपिकमध्ये पहिल्या पाच राष्ट्रांमध्ये स्थान मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षेसह विकसित भारत-2047 या दिशेकडे वाटचाल करत आहे. क्रीडा क्षेत्रापेक्षा दुसरा मोठा शिकवणी वर्ग नाही आणि खेळापेक्षा दुसरा मोठा शिक्षक नाही, असे त्यांनी सांगितले.
सोनाली काकडे/राजश्री आगाशे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2162110)
Visitor Counter : 19