वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सन 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्यासाठी भारत आणि आफ्रिकेने योजना आखणयाची गरज: 20 व्या सीआयआय भारत-आफ्रिका व्यवसाय परिषदेच्या समारोप सत्रात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्र्यांचे बीजभाषण
व्यापार आणि भागीदारीसाठी भारत-आफ्रिका व्यवसाय परिषद बनली आहे एक सुनिश्चित व्यासपीठ : पीयूष गोयल
Posted On:
29 AUG 2025 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2025
भारत आणि आफ्रिकेने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्यासाठी काम केले पाहिजे, ज्यामध्ये मूल्यवर्धन, तंत्रज्ञान-चालित शेती, अक्षय ऊर्जा आणि आरोग्यसेवा यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे झालेल्या 20 व्या सीआयआय भारत आफ्रिका व्यवसाय परिषदेच्या समारोप सत्रात बीजभाषण करताना हे उद्गार काढले. "आपण जागतिक बाजारपेठांसाठी कच्च्या मालाच्या निर्यातीपासून मूल्यवर्धित उत्पादनाकडे एकत्रितपणे जाऊ शकतो," असे त्यांनी नमूद केले. या परिषदेचे बीज 20 वर्षांपूर्वी पेरले गेले. या परिषदेने आफ्रिका आणि भारत या दोघांच्याही ताकदींचे प्रदर्शन घडवून आफ्रिकन देशांमधील संधी आणि क्षमता समोर आणल्या आहेत, असे ते म्हणाले.
गोयल यांनी निदर्शनास आणून दिले की भारत आणि आफ्रिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार आधीच बराचसा संतुलित आहे - भारताची निर्यात 42.7 अब्ज अमेरिकन डॉलर्स आणि आयात 40 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. तथापि त्यांनी विविध प्रदेशांमधील अप्रयुक्त क्षमता अधोरेखित करत सांगितले की "यामुळे गेल्या काही वर्षांत आपण गमावलेल्या संधी आणि आज असलेल्या विस्ताराच्या संधी दिसून येतात."
भारत आणि आफ्रिकेला प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा करण्याची गरज नाही तर त्यांना पूरकता शोधावी लागेल यावर मंत्र्यांनी भर दिला. त्यांनी परस्पर लाभाच्या प्रचंड संधी प्रदान करणाऱ्या शेती, अन्न सुरक्षा, सहकारी आणि स्वयंसहायता गट चळवळी, शिक्षण, कौशल्य विकास, क्षमता बांधणी, संशोधन आणि विकास, नवोन्मेष, स्टार्ट-अप्स, आरोग्यसेवा, औषधनिर्माण आणि अक्षय ऊर्जा यासारख्या क्षेत्रांवर प्रकाश टाकला.
वाहनउद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या प्रचंड क्षमतेवर गोयल यांनी प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की आफ्रिका दरवर्षी सुमारे 20 अब्ज अमेरिकन डॉलर्स किंमतीची मोटार वाहने आयात करतो, परंतु भारत सध्या या मागणीपैकी फक्त 2 अब्ज अमेरिकन डॉलर्सचीच पूर्तता करतो. त्यांनी अधोरेखित केले की भारतीय वाहने किंमत आणि गुणवत्ता या दोन्ही बाबतीत जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आहेत, त्यांची उत्पादन मानके जगातील सर्वोत्तम वाहनांच्या बरोबरीची आहेत. ते म्हणाले की प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने, दुचाकी आणि तीन चाकी वाहने तसेच परवडणाऱ्या इलेक्ट्रिक मोबिलिटी सुविधांची आफ्रिकेची वाढती मागणी पूर्ण करण्यात भारतीय उत्पादक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
पूरक बाबींवर प्रकाश टाकताना गोयल यांनी असे निरीक्षण नोंदवले की आफ्रिका भारताला महत्त्वाची खनिजे आणि पेट्रोलियम उत्पादने यासारख्या क्षेत्रात मदत करू शकतो तर भारत अन्न सुरक्षा, तांत्रिक सुधारणा, उत्पादन आणि सेवांमध्ये आफ्रिकेला मदत करू शकतो. त्यांनी नमूद केले की भारत वास्तुकला, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि टेलिकॉमसारख्या सेवांमध्ये किफायतशीरपणे स्पर्धात्मक आहे तसेच वैद्यकीय पर्यटनातही क्षमता राखून आहे.
सोनाली काकडे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2162105)
Visitor Counter : 12