लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

श्रीलंका हा भारताच्या 'शेजारी राष्ट्र प्रथम' धोरणात आणि 'व्हिजन सागर'मध्ये एक प्रमुख भागीदार आहे - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

Posted On: 28 AUG 2025 9:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2025

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज संसद भवन संकुलात श्रीलंका-भारत संसदीय मैत्री संघटनेच्या 24 सदस्यीय उच्चस्तरीय शिष्टमंडळाची भेट घेतली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व श्रीलंकेचे आरोग्य आणि जनसंवाद मंत्री तसेच श्रीलंका-भारत संसदीय मैत्री संघटनेचे अध्यक्ष डॉ. नलिंदा जयतिस्सा यांनी केले.

"भारत आणि श्रीलंका यांच्यात गाढे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सभ्यता विषयक संबंध आहेत. आज, हे बंध एका मजबूत, बहुआयामी भागीदारीत परावर्तित झाले आहेत. भारताच्या 'शेजारी राष्ट्र प्रथम' धोरणात आणि 'व्हिजन सागर'मध्ये श्रीलंकेला विशेष स्थान आहे," असे शिष्टमंडळाचे स्वागत करताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले.

 श्रीलंकेच्या संसदेत भारत-श्रीलंका संसदीय मैत्री संघटनेची स्थापना झाल्याबद्दल बिर्ला यांनी आनंद व्यक्त केला. ही संघटना म्हणजे द्विपक्षीय संबंधांच्या बळकटीचे प्रतीक असल्याचे बिर्ला यांनी सांगितले. लोकशाही पद्धती आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे अनुभव सामायिक करण्यासाठी दोन्ही देशांच्या संसदांमध्ये संस्थात्मक सहकार्य आणि नियमित संवादाची आवश्यकता लोकसभा अध्यक्षांनी अधोरेखित केली. अशा देवाणघेवाणीमुळे लोकशाही मूल्ये आणखी मजबूत होतील असे त्यांनी सांगितले.

भारतीय संसदेत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणि डिजिटल नवोन्मेषाचा वापर पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरला असून त्यातून कागदविरहित कामकाजाला प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्रीलंकेच्या आर्थिक संकटाच्या काळात प्रथम प्रतिसाद देणारा देश म्हणून डॉ. नलिंदा जयतिस्सा यांनी भारताचे आभार मानले. तसेच हिंद महासागर प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यात भारताच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील भारताचे सहकार्य श्रीलंकेसाठी जीवनरेखा ठरल्याचे वर्णन त्यांनी केले.

श्रीलंकेचे संसदीय शिष्टमंडळ 26 ते 30 ऑगस्ट 2025 दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळात 20 संसद सदस्य आणि 4 संसदीय कर्मचारी यांचा समावेश आहे.

 

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2161708) Visitor Counter : 13