अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि कतारचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री डॉ. अहमद बिन मोहम्मद अल सय्यद यांच्या सहअध्‍यक्षतेखाली भारत आणि कतार यांच्‍यामध्‍ये गुंतवणूक सहकार्यसंबंधी बैठक

Posted On: 28 AUG 2025 9:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2025

भारताच्या वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने (डीईए) आज नवी दिल्ली येथे कतारच्या शिष्टमंडळासोबत उच्चस्तरीय भागधारकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमुळे  दोन्ही देशांमधील द्विपक्षीय गुंतवणूक सहकार्य मजबूत होईल.

या बैठकीचे सहअध्यक्षपद केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि कतारचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री डॉ. अहमद बिन मोहम्मद अल सय्यद यांनी भूषवले.

कतारचे शिष्टमंडळ 27आणि 28 ऑगस्ट 2025 या दोन दिवसांच्या नवी दिल्लीला भेटीवर आले आहे. या शिष्‍टमंडळामध्‍ये कतारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे तसेच वाहतूक, दळणवळण आणि आयटी आणि नगरपालिका त्याचबरोबर कतार गुंतवणूक प्राधिकरण (क्यूआयए), कतार एअरवेज इत्यादी संस्थांच्या  प्रतिनिधींचा समावेश आहे.  

या बैठकीतील चर्चा प्रामुख्याने भारतामध्‍ये कतारची गुंतवणूक  वाढवण्यासाठी असलेल्या संधींवर केंद्रित होती.विशेषतः पायाभूत सुविधा, प्रगत उत्पादन, वाहतूक, ‘लॉजिस्टिक्स’, अन्न प्रक्रिया, आरोग्य, सेमीकंडक्टर आणि वित्त यासारख्या क्षेत्रातील संधींवर यावेळी चर्चा झाली.

कतारचे अमीर यांनी फेब्रुवारी 2025  मध्ये भारताचा  अधिकृत दौरा केला होता आणि त्यादरम्यान कतार 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भारतामध्‍ये करेल त्याबरोबरच  भारतात ‘क्यूआयए’चे कार्यालय सुरू करण्‍यात येईल, असे  म्हटले  होते, त्‍याचे स्मरण यावेळी  उभय बाजूच्या प्रतिनिधींनी केले. या संदर्भात, त्यांनी प्रमुख क्षेत्रे आणि विशिष्ट प्रकल्प आणि कंपन्यांवर लक्ष केंद्रित करून ‘क्यूआयए’ आणि कतारच्या इतर  संस्थांकडून गुंतवणुकीसाठीची  चर्चा पुढच्या टप्प्यावर नेण्‍याचा  निर्णय घेतला. भारताची  आर्थिक वृध्‍दी  आणि देशाचा होत असलेला तांत्रिक विकास यामुळे  त्यांना भारतात गुंतवणुकीसाठी विविध संधी दिसत असल्याचे कतारच्या बाजूने सांगितले.

‘क्यूआयए’ अर्थात कतार गुंतवणूक प्राधिकरणाने भारतातील किरकोळ विक्री, उपयुक्तता, प्रसार माध्‍यमे, गृहनिर्माण, आरोग्यसेवा आणि स्थावर मालमत्ता  अशा विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली आहे. कतारमधील भारतीय समुदायाने कतारमध्ये विशेषतः लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. कतारच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाच्या भेटीमुळे भारतातील उपलब्ध संधींची सखोल माहिती जाणून घेता येईल आणि दोन्ही बाजूंमधील गुंतवणूक भागीदारी अधिक मजबूत होण्यास हातभार लागेल.

सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2161699) Visitor Counter : 22
Read this release in: English , Urdu , Hindi