इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
फिजीच्या पंतप्रधानांनी यूआयडीएआय मुख्यालयाला दिली भेट; भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा पाया असलेल्या ‘आधार’ तसेच अनेक अभिनव डिजिटल उपायांपैकी एक ‘डिजिलॉकर’चे दाखवले प्रात्यक्षिक
Posted On:
26 AUG 2025 7:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2025
फिजी प्रजासत्ताकाचे पंतप्रधान सितीवेनी राबुका यांनी मंगळवारी एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह नवी दिल्लीतील भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) च्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. यूआयडीएआय चे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार तसेच भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले.
भेटीदरम्यान, फिजीच्या पंतप्रधानांना भारताच्या अग्रगण्य डिजिटल ओळख प्रणालीबद्दल माहिती देण्यात आली, जी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा पाया आहे.
यूआयडीएआय चे उपमहासंचालक विवेक चंद्र वर्मा तसेच राष्ट्रीय ई प्रशासन विभागाचे (एनईजीडी) अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नंद कुमारम् यांनी अनुक्रमे आधार आणि डिजीलॉकरवर सविस्तर सादरीकरणे केली. या दोन्ही उपक्रमांनी नागरिकांना सशक्त करण्यात आणि समावेशक डिजिटल शासकीय व्यवस्था सक्षम करण्यात निभावलेली भूमिका तसेच या दोन्ही उपक्रमांचे डिझाईन, अंमलबजावणी आणि व्यापक प्रमाणावर सेवा वितरणाद्वारे पडलेला प्रभाव यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

फिजीच्या शिष्टमंडळाने आधार नोंदणी प्रक्रियेचे थेट प्रात्यक्षिक देखील पाहिले. या प्रात्यक्षिकातून त्यांना भारताच्या डिजिटल ओळख प्रणालीची सुलभता, व्यापकता, कार्यक्षमता आणि सुरक्षिततेबद्दल प्रत्यक्ष माहिती मिळाली.
ही भेट भारत आणि फिजी यांच्यात डिजिटल परिवर्तनाच्या क्षेत्रातील वाढत्या सहकार्याचे प्रतिक आहे, ज्यामध्ये नवोन्मेषी डिजिटल परिवर्तनात्मक उपायांच्या विकासातील सहकार्य देखील समाविष्ट आहे. तसेच, जागतिक भागीदारांसोबत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये आपले कौशल्य सामायिक करण्याची भारताची वचनबद्धता देखील या भेटीतून अधोरेखित होते.
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2161012)