ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक उपासमारीशी लढण्यासाठी जागतिक अन्न कार्यक्रमाशी भारताची भागीदारी

Posted On: 25 AUG 2025 8:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्‍ट 2025

 

भारत सरकार आणि जागतिक अन्न कार्यक्रम (डब्ल्यूएफपी) यांनी आज एका इरादापत्रावर(एल ओ आय) स्वाक्षरी करून जागतिक उपासमारीच्या संकटाचा सामना करण्याच्या दृष्टीने परस्पर सहकार्याचा महत्त्वाचा टप्पा गाठल्याची घोषणा केली.

या उपक्रमांतर्गत भारत सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने (डीएफपीडी) जागतिक अन्न कार्यक्रमासाठी भारतातून पोषणमुल्ये युक्त  तांदूळ पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे जागतिक स्तरावरील संकटग्रस्त क्षेत्रातील सर्वात दुर्बल  लोकसंख्येच्या अन्न आणि पोषणविषयक  गरजा पूर्ण होण्यास मदत होऊ शकेल. 

या सहकार्यामुळे जागतिक भागीदारीची ताकद अधोरेखित होते. भारताकडून तांदूळ मिळवून, डब्ल्यूएफपी कृषी क्षेत्रातील अधिशेष असलेल्या राष्ट्राच्या संसाधनांचा वापर जीवनरक्षक मदत देण्यासाठी आणि उपासमारीविरुद्ध ठोस प्रगती करण्यासाठी करेल.

"वसुधैव कुटुंबकम - पृथ्वी ही एक कुटुंब आहे - या तत्त्वाशी तसेच एकमेकांप्रती आणि परस्परांच्या सामायिक भविष्याप्रती असलेल्या सामूहिक जबाबदारीशी भारत वचनबद्ध आहे. अन्न असुरक्षिततेचा सामना करणाऱ्या गरजू समुदायांना देशाचा मानवतावादी पाठिंबा हा या दृष्टिकोनाचा एक भाग आहे," असे भारत सरकारच्या डीएफपीडीचे सचिव संजीव चोप्रा म्हणाले.

"अन्न-सुरक्षित आणि शांततापूर्ण जग निर्माण करण्यासाठी भारताच्या दृढ वचनबद्धतेचे आम्ही मनापासून कौतुक करतो," असे डब्ल्यूएफपीचे उपकार्यकारी संचालक कार्ल स्काऊ म्हणाले. "ही भागीदारी जागतिक प्रयत्नांना बळकटी देण्याच्या आणि गरजूंना शाश्वत आधार देण्याच्या आमच्या संयुक्त उद्दिष्टांना प्रतिबिंबित करते," असे ते पुढे म्हणाले.

विशेषतः जेव्हा जग मर्यादित मानवतावादी सहाय्यता निधीमुळे वाढत्या अन्न असुरक्षिततेचा सामना करत आहे,अशा वेळी उपासमारीविरुद्धच्या लढाईतील भारताचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त करत डब्ल्यूएफपीच्या उपकार्यकारी संचालकांनी भारताच्या योगदानाचे कौतुक केले. 

हा उपक्रम फेब्रुवारी 2025 मध्ये रोम येथे झालेल्या कार्यकारी मंडळाच्या कार्यक्रमात भारत सरकार आणि डब्ल्यूएफपीच्या प्रतिनिधींनी सहकार्य करण्याच्या मार्गावर विचार विनिमय केला होता त्या चर्चेचे फलित दर्शवितो. मानवतावादी वितरणासाठी अन्नधान्याचा विश्वासार्ह पुरवठा सुनिश्चित करण्याचा पाया या इरादापत्राने घातला आहे. 

पुरवठा साखळीचा प्रभावी वापर (वितरण / खरेदी), पोषणमुल्ये युक्त  तांदूळ पुरवठा, अन्नपूर्ती उपकरणे (धान्य एटीएम), जन पोषण केंद्र, स्मार्ट गोदाम तंत्रज्ञान आणि फ्लोस्पॅन्स ( फिरती साठवण एकके) या डब्ल्यूएफपीसोबत सुरू असलेल्या इतर सहयोगी प्रयत्नांबाबत तसेच भविष्यातील सहकार्याच्या संभाव्य क्षेत्रांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

 

* * *

निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2160754)