वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गव्हर्न्मेंट ई-मार्केटप्लेसने सकल व्यापारी मूल्याचा 15 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

Posted On: 25 AUG 2025 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्‍ट 2025

 

गव्हर्न्मेंट ई-मार्केटप्लेस (जीईएम) ने 2016 पासून स्थापनेनंतर एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. जीईएमचे सकल व्यापारी मूल्य (जीएमव्ही) 15 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

हे यश जीईएमच्या पारदर्शक, कार्यक्षम आणि सर्वसमावेशक सार्वजनिक खरेदी व्यवस्थेच्या दृष्टीकोनावर ग्राहक  व विक्रेते यांनी ठेवलेला विश्वास अधोरेखित करते. गेल्या नऊ वर्षांत जीईएमने स्वतःला एक सक्षम डिजिटल व्यासपीठ म्हणून विकसित केले आहे, ज्यामध्ये सरकारी ग्राहकांसोबत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग , स्टार्टअप्स, महिला-चलित व्यवसाय, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती उद्योग तसेच स्वयं-सहायता गट  यांचा समावेश असलेले विविध विक्रेते जोडले गेले आहेत.

या प्रसंगी जीईएम चे मुख्य कार्यकारी अधिकारी मिहीर कुमार म्हणाले:

“15 लाख कोटी रुपये जीएमव्हीचा टप्पा पार करणे हे आपल्या हितधारकांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाचे द्योतक आहे. आमचा भर समावेशकता अधिक दृढ करणे, प्रक्रिया सुलभ करणे आणि नाविन्याला चालना देणे यावर कायम राहील, जेणेकरून संधी देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचतील. आपण सर्व मिळून विकसित भारत या दृष्टीकोनाशी सुसंगत अशी  पारदर्शक, उत्तरदायी  आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम खरेदी-प्रणाली उभारत आहोत.”

जीईएम वरील प्रत्येक व्यवहार केवळ खरेदीपुरता मर्यादित नसून तो कार्यक्षमता, जबाबदारी आणि सशक्तीकरणाचे प्रतीक आहे. प्रक्रिया सुलभ करून, प्रवेशातील अडथळे कमी करून आणि धोरण व तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शकता रुजवून, जीईएम ने शेवटच्या टोकापर्यंत संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर उद्योजकता, नाविन्य आणि समतोल विकासालाही चालना मिळाली आहे.

जीईएम च्या प्रवासातील काही ठळक वैशिष्ट्ये:

  • विविध क्षेत्रातील लाखो विक्रेत्यांसाठी सरकारी खरेदीमध्ये प्रवेशाचा विस्तार
  • लघु आणि मध्यम उद्योग, महिला उद्योजक आणि स्टार्टअप्स यांच्या सहभागाला बळकटी
  • खरेदी प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता व उत्तरदायीत्वाची  हमी
  • डिजिटल इंडियाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत शासनात डिजिटल अंगीकाराला चालना

ही कामगिरी  जीईएमशी निगडित वापरकर्ते, खरेदीदार, विक्रेते, धोरणकर्ते आणि प्रशासक यांचा आहे. त्यांनी जीईएमला खऱ्या अर्थाने बदलाचे साधन बनवले आहे. हे यश डिजिटलदृष्ट्या सक्षम, पारदर्शक आणि सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचे साधन म्हणून जीईएमची भूमिका अधोरेखित करत   विकसित भारत या व्यापक दृष्टीकोनामध्ये योगदान देत आहे.

 

* * *

निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2160719)