वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत आणि युरेशियन आर्थिक महासंघात मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी सुरू करण्यासाठी संदर्भ अटींवर स्वाक्षरी
Posted On:
20 AUG 2025 7:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2025
भारत आणि आर्मेनिया, बेलारूस, कझाकस्तान, किर्गिज प्रजासत्ताक आणि रशियन फेडरेशन यांचा समावेश असलेल्या युरेशियन आर्थिक महासंघाने (EAEU) आज रशियात मॉस्को इथे मुक्त व्यापार करारासंबंधी (FTA) वाटाघाटी सुरू करण्यासाठी टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजेच संदर्भ अटींवर वर स्वाक्षऱ्या केल्या. भारताच्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव अजय भादू आणि युरेशियन आर्थिक आयोगाच्या (EEC) व्यापार धोरण विभागाचे उपसंचालक मिखाईल चेरेकायेव यांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या.
या दौऱ्यामध्ये अजय भादू यांनी युरेशियन आर्थिक आयोगाचे प्रभारी व्यापार मंत्री आंद्रेई स्लेपनेव यांचीही भेट घेतली. या वाटाघाटीसाठीच्या गटप्रमुखांनी मंत्री आंद्रेई स्लेपनेव यांना संदर्भ अटीवर स्वाक्षरी केल्याने साध्य केलेल्या महत्त्वाच्या टप्प्याविषयी सांगितले. यासोबतच त्यांनी भविष्यातील व्यापार विषयक कराराच्या संघटनात्मक पैलूसह औपचारिकपणे वाटाघाटी प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने उचलायच्या पुढच्या पावलांविषयी देखील चर्चा केली.
भारत आणि युरेशियन आर्थिक महासंघामधील परस्पर व्यापाराचे प्रमाण 2023 च्या तुलनेत 7 टक्क्याने वाढून 2024 मध्ये 69 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याची माहिती यावेळी दिली गेली. या वाढत्या व्यापाराची दखलपूर्ण नोंदही या चर्चेदरम्यान घेतली गेली. भारत आणि युरेशियन आर्थिक महासंघाच्या 6.5 ट्रिलियन डॉलर एकत्रित सकल देशांतर्गत उत्पादनासह प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे भारतीय निर्यातदारांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असून, नवीन क्षेत्र आणि व्यापार विषयक भौगोलिक वैविध्य आणण्याच्या दृष्टीनेही मोठी मदत होणार आहे. त्यासोबतच बिगर बाजारी अर्थव्यवस्थांविरोधातली स्पर्धात्मकताही वाढणार असून, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनाही याचा मोठा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे.
या स्वाक्षरी केलेल्यासंदर्भ अटींअंतर्गत वाटाघाटींसाठीचा एक मार्गदर्शक आराखडा आखून दिला गेला आहे. यामुळे व्यापार विषयक दडलेल्या क्षमतांचा विकास , गुंतवणुकीत वाढ तसेच भारत आणि युरेशियन आर्थिक महासंघात एक दृढ आणि चिरस्थायी आर्थिक भागीदारी प्रस्थापित होईल अशी अपेक्षा आहे. या भेटीदरम्यान भारतासह युरेशियन आर्थिक महासंघाने या कराराची लवकर पूर्तता करण्यासाठी तसेच व्यापार वियषक परस्पर सहकार्यासाठी दीर्घकालीन संस्थात्मक आराखडा तयार करण्याबद्दलची आपापली वचनबद्धताही पुन्हा एकदा व्यक्त केली.

निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2158589)