अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

शुभांशु शुक्ला यांनी केलेले अंतराळ प्रयोग "विश्वबंधु" भारत अशी भारताची ओळख करतात दृढ


आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील भारताच्या पहिल्या अंतराळवीराने उघडला देशाच्या अंतराळ प्रवासातील नवीन अध्याय : डॉ.जितेंद्र सिंह

Posted On: 18 AUG 2025 9:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2025

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज येथे सांगितले की, शुभांशु शुक्ला यांनी केलेल्या अंतराळ प्रयोगांनी भारताची "विश्वबंधु" भारत ही ओळख दृढ केली आहे कारण जरी हे प्रयोग स्वदेशी साहित्य वापरून एका भारतीयाने केले असले तरी त्यांचे फायदे संपूर्ण मानवजातीसाठी उपलब्ध असतील. हे प्रयोग व्यापकपणे जीवनशास्त्रे आणि वनस्पती शरीरविज्ञानाशी संबंधित होते.

“2047 पर्यंत विकसित भारतासाठी अंतराळ कार्यक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका” या विषयावरील विशेष चर्चेचा आरंभ आज लोकसभेत करताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले की ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचे ध्येय केवळ एका प्रतिकात्मक विजयाचे नव्हते तर किफायतशीर अंतराळ तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि स्वदेशी नवोन्मेषातील भारताच्या वाढत्या क्षमतेचे प्रदर्शन होते.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आय एस एस) भारताच्या पहिल्या अंतराळवीराची उपस्थिती हा एक "ऐतिहासिक टप्पा" असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले आणि या कामगिरीची 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने देशाच्या वाटचालीशी सांगड घातली.

जागतिक खर्चाच्या काही अंश इतक्या खर्चातील आय एस एस मोहिमेने प्रगत वैज्ञानिक नियोजनासह बौद्धिक संसाधने एकत्रित करण्याची भारताची क्षमता दाखवून दिली आहे, असे मंत्र्यांनी नमूद केले. "हे यश आपल्या शास्त्रज्ञांच्या प्रतिभेचे आणि सुधारणांमुळे अवकाश क्षेत्र खाजगी सहभागासाठी खुले झाल्याने  निर्माण झालेल्या सक्षम वातावरणाचे प्रतिबिंब आहे," असे ते म्हणाले. 

डॉ.जितेंद्र सिंह यांनी यावर भर दिला की शुक्ला यांनी आयएसएसवरील त्यांच्या वास्तव्यादरम्यान केलेले प्रयोग - जीवशास्त्र, शेती, जैवतंत्रज्ञान आणि संज्ञानात्मक संशोधन - हे भारतात आरेखित आणि विकसित केले गेले होते, ज्यामुळे आत्मनिर्भर भारताचा दृष्टीकोन बळकट झाला . त्यांनी सांगितले की या अभ्यासांचे फायदे आरोग्य, शेती, आपत्ती व्यवस्थापन आणि शहरी नियोजन या क्षेत्रातील अनुप्रयोगांसह अवकाशाच्या पलीकडे जातील. 

डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की भविष्याचा वेध घेता, भारत अनेक प्रमुख टप्पे गाठण्याच्या मार्गावर आहे: 2026 मध्ये व्योममित्र मानव  मिशन, 2027 मध्ये गगनयान कार्यक्रमांतर्गत पहिल्या भारतीय अंतराळवीराचे प्रक्षेपण, 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक आणि 2040 पर्यंत चंद्रावर पाऊल ठेवणारा भारतीय अंतराळवीर. "2047 च्या काही वर्षांआधी एक तरुण भारतीय चंद्राच्या पृष्ठभागावरून विकसित भारत  आगमनाची घोषणा करेल," असे त्यांनी सभागृहाला सांगितले.


निलीमा चितळे/नंदिनी मथुरे /प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2157742)
Read this release in: English , Hindi , Telugu