विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले, वजन कमी करण्याच्या क्रांतीवरील पुस्तकाचे प्रकाशन : लठ्ठपणा आणि चयापचय विकारांबाबत वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित माहितीचे आवाहन

Posted On: 17 AUG 2025 6:07PM by PIB Mumbai

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज "द वेट लॉस रिव्होल्यूशन - वेट लॉस ड्रग्ज अँड हाऊ टू यूज देम" या पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक प्रख्यात अंत:स्त्रावी ग्रंथी तज्ञ डॉ. अम्ब्रीश मिथल यांनी शिवम विज यांच्या सहकार्याने लिहिले आहे.

या कार्यक्रमाला प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री शर्मिला टागोर आणि मीडिया उद्योजक शोभना भारतीया उपस्थित होत्या.

स्वतः वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक, प्रसिद्ध मधुमेहतज्ञ आणि अनेक पुस्तकांचे लेखक असलेल्या डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, भारतात लठ्ठपणा आणि संबंधित चयापचय विकारांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हे पुस्तक योग्य वेळी प्रकाशित झाले आहे. योग्य जागरूकता आणि योग्य प्रकारची वैज्ञानिक माहिती प्रसारित करण्याची गरज असून चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती टाळावी, असा इशारा त्यांनी दिला.

त्यांनी अधोरेखित केले की, एकेकाळी जगात ‘मधुमेहाची राजधानी’ म्हणून ओळखला जाणारा भारत आता लठ्ठपणाची राजधानी म्हणूनही उदयास येत आहे, लहान मुलांमधील लठ्ठपणाच्या बाबतीतही भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी आपल्या भाषणात लठ्ठपणा आणि त्यासंबंधीत चयापचय विकार मधुमेह, डिस्लिपिडेमिया, उच्च रक्तदाब, कोरोनरी हृदयरोग आणि फॅटी लिव्हर रोग यासारख्या संबंधित चयापचय विकारांच्या वाढत्या आरोग्य आव्हानांवर प्रकाश टाकला. त्यांनी या मुद्द्यांबद्दल देशभरात अचानक जागृती होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि अवैज्ञानिक आहार चार्ट आणि फॅड पथ्यांद्वारे चुकीच्या माहितीचा अनियंत्रित प्रसार यापासून सावध राहण्याचा इशारा दिला.

आहारविषयक सूचना नेहमीच वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित तत्वावर आधारित असाव्यात - अन्नाचे प्रमाण, गुणवत्ता आणि वितरण या सर्व बाबींवर भर दिला पाहिजे यावर मंत्र्यांनी भर दिला.

"भारतीय रुग्णांसाठी भारतीय आकडेवारी" ची गरज अधोरेखित करताना, मंत्र्यांनी असे निरीक्षण नोंदवले की मध्यवर्ती लठ्ठपणा - पोटाभोवती चरबी जमा होणे - हे पाश्चात्य देशांपेक्षा भारतीयांसाठी अधिक धोकादायक आहे. "कधीकधी कंबरेभोवती टाकलेला एक साधा इंची टेप काल्पनिक बीएमआय चार्टपेक्षा अधिक अर्थपूर्ण असू शकतो," असे त्यांनी नमूद केले. त्यांनी जीवनशैलीतील बदलाचे महत्त्व अधोरेखित केले. भारतीय अभ्यासांचा संदर्भ देत की नियमित योगाभ्यासाने टाइप-2 मधुमेहाचे प्रमाण 40% पर्यंत कमी होऊ शकते, असेही ते म्हणाले. आधुनिक वैद्यक, जीवनशैलीतील बदल आणि पारंपरिक पद्धती यांचा समन्वय करून सर्वंकष उपाय शोधणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

ओझेम्पिक आणि मुंजारो सारख्या वजन कमी करणाऱ्या नव्या औषधांच्या विषयावर, डॉ. जितेंद्र सिंह यांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. जागतिक अनुभव उत्साहवर्धक असला तरी, क्लिनिकल परिणाम समोर यायला अनेक दशके लागू शकतात. भारतातील रिफाइंड तेलांच्या प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की घाईघाईने काढलेले निष्कर्ष दिशाभूल करणारे असू शकतात.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रतिबंधात्मक धोरणांवर भर देण्याचे आवाहन केले. भारताची 70 टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या 40 वर्षाखाली असल्याचे सांगून त्यांनी स्पष्ट केले की जीवन शैलीविषयक रोगांमुळे तरुण पिढीची क्षमता कमी होऊ देणे देशाला परवडणारे नाही. त्यामुळे आगामी आरोग्य कार्यक्रमांमध्ये प्रतिबंध हा मुख्य आधार असला पाहिजे असे त्यांनी नमूद केले.

***

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2157341)