युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाचा शुभंकर तसेच बोधचिन्ह यांचे श्रीनगरमध्ये अनावरण
खेलो इंडियाच्या छत्राखाली प्रथमच होत असलेल्या या जलक्रीडा स्पर्धा श्रीनगर येथील दाल सरोवरात 21 ते 23 ऑगस्ट या कालावधीत खेळल्या जातील
Posted On:
14 AUG 2025 10:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2025
दिनांक 21 ते 23 ऑगस्ट, 2025 या कालावधीत श्रीनगरमधील सुप्रसिध्द दाल सरोवरात प्रथमच होत असलेल्या खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवासाठीचा (केआयडब्ल्यूएसएफ) शुभंकर म्हणून हिमालयीन खंड्या (किंगफिशर) चे आज श्रीनगर येथे अनावरण करण्यात आले.

जलक्रीडा महोत्सव हा खेलो इंडिया स्पर्धांच्या सतत विस्तारणाऱ्या परिघाचा भाग आहे. या वर्षी मे महिन्यात दीव येथे प्रथमच खेलो इंडिया सागरकिनारी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरण(एसएआय) यांच्या सहकार्यासह जम्मू आणि काश्मीर क्रीडा मंडळ या केआयडब्ल्यूएसएफचे आयोजन करत आहे.
या वर्षी मार्च महिन्यात गुलमर्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडास्पर्धा या बर्फात आयोजित कार्यक्रमानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये होत असलेला खेलो इंडियाचा हा दुसरा कार्यक्रम असणार आहे. या केआयडब्ल्यूएसएफमध्ये रोइंग,कॅनोईंग तसेच कयाकिंग या पदक विजेत्या स्पर्धा होतील. प्रदर्शनीय खेळांमध्ये वॉटर स्कीईंग, शिकारा शर्यत तसेच ड्रॅगन बोटींची शर्यत असे कार्यक्रम होतील. देशभरातील 36 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांतून 400 पेक्षा जास्त खेळाडू श्रीनगरमध्ये होत असलेल्या या स्पर्धांमध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
जम्मू आणि काश्मीरचे युवा सेवा आणि क्रीडा मंत्री सतीश शर्मा आणि आमदार झदीबल तन्वीर सादिक यांनी आज शुभंकर तसेच बोधचिन्ह जारी केले. या क्रीडास्पर्धांची अधिकृत किट्स देखील यावेळी सर्वांसमोर सादर करण्यात आली.

खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सव 2025 चा रंगीबेरंगी शुभंकर म्हणून निवडलेला हिमालयीन खंड्या पक्षी साहस, निसर्ग आणि या खेळांमधील स्पर्धा भावनेचे मूर्त रूप आहे. या पक्षाचे भडक नारिंगी आणि नीला हे रंग उर्जा, शांतता आणि काश्मीरच्या सौंदर्याचे प्रतिनिधित्व करतात. हे केवळ एक प्रतीक नसून तो देशभरात पर्यावरण-स्नेही क्रीडा, पर्यटन आणि तरुणांचा सहभाग यांना चालना देणारा या महोत्सवाचा राजदूत आहे.
खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाच्या बोधचिन्हात काश्मीरचे अस्सल सार सामावले असून त्यामध्ये दाल सरोवरावर तरंगणारा शिकारा आणि पार्श्वभूमीवर हिमाच्छादित पर्वत आणि पाईनचे वृक्ष दिसून येत आहेत. या सर्वांचे शांत प्रतिबिंब काश्मीरच्या सौंदर्याचा आरसा दाखवते तर खेलो इंडिया चे रंग परंपरा, निसर्ग आणि खेळ भावनेचे एकत्रीकरण दर्शवतात.
“गुलमर्ग हे यापूर्वीच देशातील हिवाळी स्पर्धांची राजधानी झाले आहे आणि आता दाल सरोवर भारताच्या जलक्रीडांचे केंद्र होणार आहे,” सादिक म्हणाले. “जम्मू आणि काश्मीरच्या जनतेसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे,” ते पुढे म्हणाले.

* * *
शैलेश पाटील/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156658)