भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतातील पहिले दोन अ‍ॅक्वानॉट्स कमांडर जतिंदर पाल सिंग आणि राजू रमेश यांचे खोल समुद्रात 5000 मीटर खोलीपर्यंत बुडी मारल्याबद्दल कौतुक केले


समुद्रात इतक्या खोलवर पोहोचण्याचा पराक्रम करणाऱ्या अर्धा डझनपेक्षा कमी देशांच्या विशेष पंक्तीत भारत सामील झाला आहे: भूविज्ञान मंत्री

Posted On: 14 AUG 2025 10:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्‍ट 2025

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी घोषणा केली की 5 आणि  6 ऑगस्ट, 2025 रोजी दोन भारतीय जलतरणपटूंनी (एक्वानॉट्स) अटलांटिक महासागरात 4,025 मीटर आणि 5,002 मीटर खोलपर्यंत  यशस्वीरित्या मोहिमा पार पाडल्या - भारताने प्रथमच  असा पराक्रम केला आहे.

भारतीय एक्वानॉट्स - राजू रमेश, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि कमांडर जतिंदर पाल सिंग (निवृत्त) - यांनी सुमारे सात तासांच्या एकूण कालावधीत पहिले डायव्हिंग पूर्ण केले, बहुमूल्य  अनुभव आणि निरीक्षणे गोळा केली आणि नंतर पृष्ठभागावर सुरक्षित परतले.

माध्यमांशी बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारत  महासागरात इतक्या खोलवर जाण्याचे धाडस करणाऱ्या अर्धा डझनपेक्षा कमी देशांच्या विशेष पंक्तीत सामील झाला आहे. ही मोहीम IFREMER या फ्रेंच सागरी संशोधन संस्थेसोबत अटलांटिक महासागराच्या खोल पाण्यात, IFREMER च्या सबमर्सिबल नॉटाईलवर एक सहयोगी वैज्ञानिक उपक्रम म्हणून आयोजित करण्यात आली होती. ही विक्रमी डायव्हिंग भारताच्या समुद्रयान मिशन अंतर्गत उपक्रमांची सुरुवात आहे, ज्याचे उद्दिष्ट 2027 पर्यंत स्वदेशी विकसित पाणबुडी मत्स्य -6000 मधून  तीन एक्वानॉट्सना 6,000  मीटर खोलीवर पाठवणे हे आहे.

समुद्रयान हा भारत सरकारच्या महत्वाकांक्षी  डीप ओशन मिशनचा एक भाग आहे, जे खोल महासागरात संसाधनांचा शोध घेण्यासाठी आणि शाश्वतपणे वापर करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. डॉ. सिंग यांनी कमांडर जतिंदर पाल सिंग यांच्या कामगिरीबद्दल विशेष अभिमान व्यक्त केला आणि ते जम्मूचे आहेत - "माझ्या शेजारच्या मुलाने भारतासाठी हे साध्य केले आहे हा माझ्यासाठी  अभिमानाचा क्षण आहे," असे ते म्हणाले.

ऍक्झियॉम-4 मोहिमेंतर्गत भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला नुकतेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर यशस्वीपणे पोहोचून परत आल्यापासून जेमतेम चार आठवड्यांच्या कालावधीतच हे यश मिळाले आहे याकडे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी सर्वांचे लक्ष वेधले. “आता भारतीयांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि खोल समुद्र अशा दोन्हीकडच्या त्यांच्या पहिल्यावहिल्या यशस्वी फेऱ्या पूर्ण केल्या असून, आपण आपली वैज्ञानिक महत्त्वाकांक्षा, नैपुण्य आणि ताकदीचे प्रदर्शन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत साकार करण्याच्या अगदी जवळ जात आहोत,” ते म्हणाले.

भारताला लाभलेला 11,098 किलोमीटरचा विस्तीर्ण सागरकिनारा आणि प्रचंड वैशिष्ट्यपूर्ण आर्थिक क्षेत्र (ईईझेड) यांच्यात इतर कोणत्याही देशापेक्षा आपल्या देशाला अधिक नैसर्गिक लाभ देणाऱ्या सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही प्रकारच्या सागरी साधनसंपत्तीसाठीची अमर्याद क्षमता आहे ही बाब डॉ.जितेंद्र सिंह यांनी यावेळी अधोरेखित केली. अर्थव्यवस्थेचे मूल्यवर्धन करण्यासाठी, विशेषतः नील अर्थव्यवस्थेच्या विकासातून हे साध्य करण्यासाठी, यातील न शोधलेले स्त्रोत शोधून त्यांचा वापर करून घेण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. समुद्रामध्ये 4,000 ते 5,500 मीटर खोलीवर, खोल समुद्रात सापडणाऱ्या खनिजांचा शोध घेण्यासाठी भारताने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय समुद्रतळ प्राधिकरणाशी करार केला आहे असे त्यांनी नमूद केले.

हे दोन भारतीय सागरवीर चेन्नईच्या केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्थेशी संबंधित असून सदर संस्थेकडे मत्स्य-6000 च्या विकसनाची जबाबदारी देण्यात आली आहे. या सबमर्सिबलच्या विकासामुळे भारत खोल सागरात जाऊ शकणारी स्वतःची मानवसहित सबमर्सिबल विकसित करणारा जगातील सहावा देश ठरणार आहे.

मत्स्य-6000 या अशा प्रकारच्या पहिल्याच, फोर्थ जनरेशन वैज्ञानिक सबमर्सिबलची रचना 12 तासांच्या परिचालन सहनशक्ती आणि 96 तासांच्या आपत्कालीन सहनशक्तीच्या दृष्टीने केली आहे.यामध्ये उच्च-घनतेची ली-पो बॅटरी, पाण्याखाली कार्य करणारे ध्वनिक दूरध्वनी, ड्रॉप-वेट आपत्कालीन सुटका यंत्रणा तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच आरोग्यविषयक निरीक्षणासाठी बायो-व्हेस्ट्स इत्यादी अत्याधुनिक प्रणाली बसवण्यात आल्या आहेत. 

मत्स्य-6000 ने जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये तामिळनाडूत कट्टुपल्ली येथील एल अँड टीच्या गोदीत पाणीसंबंधित चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या असून 2026 पर्यंत 500 मीटर उथळ समुद्रातील चाचण्या हाती घेण्यात येतील अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (एनआयओटी) चे पाच सदस्यीय पथक - पलानीअप्पन, डॉ. डी. सथियानारायणन आणि जी. हरिकृष्णन यांचा समावेश असलेली ज्यांचे नेतृत्व डॉ. रमेश सेथुरामन, (मत्स्य-6000 चे गटप्रमुख आणि शास्त्रज्ञ जी) यांच्या नेतृत्वाखाली - 3 ऑगस्ट 2025 रोजी पोर्तुगालमधील लिस्बन किनाऱ्याजवळ IFREMER च्या संशोधन जहाज L'Atalante वर चढली.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी मोहिमेतून मिळालेल्या महत्त्वपूर्ण अनुभवांची माहिती सामायिक केली. या पथकाला महत्त्वाच्या विविध कार्यपद्धती मध्ये प्रत्यक्ष हताळणीचा अनुभव मिळाला, हे त्यांनी अधोरेखित केले. यामध्ये डायव्हिंगपूर्वीची तयारी आणि पायलटिंग ऑपरेशन्स; उतरणी आणि चढाईच्या पद्धती, मॅन्युफिलटर्स वापरून ध्वज लावणे, नमुने गोळा करणे यासारखे उपचारात्मक कार्य, चार डायव्हिंग दरम्यान तैनाती आणि पुनर्प्राप्ती; जहाजातून मार्गाचा मागोवा घेणे; ऑन-बोर्ड सपोर्ट सिस्टम व्यवस्थापित करणे; ॲकॉस्टीक टेलिफोन कम्युनिकेशन प्रोटोकॉलचे संचलन; तसेच डायव्हिंग नियोजन, हालचाल आणि इतर आवश्यक कार्य प्रक्रियांचा समावेश होता.

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेच्या कर्मचाऱ्यांना मिळालेला अनुभव मत्स्य-6000 च्या विकासाला थेट सहाय्य करेल, असेही त्यांनी सांगितले. यात पुढील महत्त्वाच्या प्रकल्प टप्प्यांचा उल्लेख करण्यात आला:

  • टायटॅनियम हल, सिंटॅक्टिक फोम, व्हीबीएस आणि ड्रॉप-वेट यंत्रणेची निर्मिती आणि चाचणी
  • उपप्रणालींची खुल्या समुद्रातील चाचणी आणि प्रमाणपत्र
  • 2026 च्या सुरुवातीला 500 मीटर पर्यंत उथळ पाण्यातील प्रात्यक्षिक
  • एलएआरएस सह संशोधन जहाजाचा विस्तार
  • 2027 च्या मध्यापर्यंत एकात्मता आणि खोल समुद्र चाचण्या
  • 2027-28 दरम्यान मत्स्य-6000 वापरून वैज्ञानिक शोध

तसेच खोल समुद्रातील खाणकाम आणि मानवी पाणबुडी विकास, तसेच महासागरातील हवामान बदल सल्लागार सेवा यांचा समावेश असलेल्या खोल महासागर मोहिमेच्या प्रमुख उद्दिष्टांचा पुनरुच्चार केला.

यापूर्वी, सीएसआयआर-एनआयओच्या भारतीय शास्त्रज्ञांनी 1997 आणि 2002 मध्ये अनुक्रमे अमेरिकेच्या अल्विन आणि फ्रान्सच्या नॉटाईल या पाणबुड्यांमधून 3,800 मीटर आणि 2,800 मीटर खोलीपर्यंत बुडी मारली होती. सध्याची मोहीम भारताच्या खोल महासागर क्षमतेसाठी एक विक्रमी टप्पा आहे.

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (एनआयओटी) चे संचालक प्रो. बालाजी रामकृष्णन, डीप ओशन मिशनचे मिशन संचालक डॉ. एम.व्ही. रमणा मूर्ती आणि एनआयओटी आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे इतर वरिष्ठ शास्त्रज्ञ देखील माध्यमांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित होते.

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/संजना चिटणीस/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2156657) Visitor Counter : 15