युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
भारतीय क्रीडा जगताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केली प्रशंसा, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक, 2025 आणि राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी सुधारणा विधेयक 2025 मंजूर झाल्याचे केले कौतुक
सुशासनाला चालना आणि खेळाडूंच्या हिताचे रक्षण करण्यासाठीच्या तरतुदींचे खेळाडू, राष्ट्रीय क्रीडा महासंघ, प्रशासकांकडून स्वागत
Posted On:
14 AUG 2025 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2025
संसदेने मंगळवार, 12,ऑगस्ट 2025 रोजी मंजूर केलेल्या राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक, 2025 आणि राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी सुधारणा विधेयक 2025 चे भारतीय क्रीडा जगताने स्वागत केले आहे. सुशासनाला चालना आणि खेळाडूंच्या हिताचे रक्षण करण्यासाठी दीर्घकाळापासून प्रलंबित सुधारणा केल्याबद्दल खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा प्रशासक आणि इतरांनी कौतुक केले आहे.
बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आनंद व्यक्त केला आहे. "भारतीय खेळांसाठी ऐतिहासिक क्षण! दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले क्रीडा विधेयक 2025 ने प्रशासन, पारदर्शकता आणि खेळाडूंच्या कल्याणासाठी नवीन मानके स्थापित केली आहेत. निष्पक्षता आणि कल्याण हे खेळांचे आधारस्तंभ बनवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार," असे त्याने लिहिले आहे.
भारतातील पॅरा-जॅव्हलिनचा सध्याचा पोस्टर बॉय सुमित अंतिल याने सोशल मीडियावर लिहिले आहे की, “संसदेच्या दोन्ही सभागृहात क्रीडा विधेयक 2025 मंजूर झाल्याने क्रीडा प्रशासनात पारदर्शकता आणि निष्पक्षता येईल! राष्ट्रीय क्रीडा निवडणूक पॅनेल, आचारसंहिता, सुरक्षित क्रीडा धोरण आणि तक्रार निवारण यंत्रणा यामुळे सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल आणि त्यांचा आदर केला जाईल .”
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक 2025 पारित होणे ही स्वातंत्र्यानंतर क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठी सुधारणा असल्याचे नमूद केले आहे.
भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू सुकांत कदम यांनीही क्रीडा प्रशासनाच्या पुनर्रचनेच्या दृष्टीने या विधेयकाचे महत्त्व अधोरेखित केले. "राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक 2025 ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यावसायिक, लेखा परीक्षण आणि नियमबद्ध राष्ट्रीय क्रीडा महासंघाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले आहे , ज्यामुळे राजकारणासाठी नव्हे तर खेळासाठी निर्णय घेतले जातील हे सुनिश्चित होईल ," असे ते म्हणाले.
अखिल भारतीय फूटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे म्हणाले, “चार दशकांनंतर हे विधेयक आणल्याबद्दल मी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांचे अभिनंदन करतो. याचा भारतीय खेळांना दोन प्रमुख क्षेत्रांमध्ये फायदा झाला आहे. पहिले म्हणजे, क्रीडा संघटनेची नोंदणी किंवा मान्यता देण्याचे किंवा रद्द करण्याचे अधिकार असलेले राष्ट्रीय क्रीडा मंडळ स्थापन करण्याची तरतूद आहे. दुसरे म्हणजे, न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या शेकडो खटल्यांचा निपटारा क्रीडा न्यायाधिकरण करेल, ज्यामुळे अनावश्यक खर्च वाचेल जो आता खेळांच्या विकासासाठी वापरला जाऊ शकतो.”
“हा कायदा आपल्या खेळाडूंची प्रतिमा स्वच्छ राहील याची काळजी घेईल , विशेषतः जेव्हा देश एका मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करणार आहे,” असे चौबे म्हणाले.
भारतीय डेव्हिस चषक संघाचा कर्णधार रोहित राजपाल म्हणाला, "भारतातील खेळांसाठी ही अत्यंत निकडीची सुधारणा होती. वादविवाद सोडवण्याच्या अनेक क्षेत्रात आपण मागे होतो, जिथे प्रत्येक संघटना कमी-अधिक प्रमाणात न्यायालयात धाव घेते , ज्यामुळे दुर्दैवाने अनेकदा विलंब होतो. हे विधेयक क्रीडा प्रोत्साहन आणि क्रीडा विकासाच्या बाबतीत आमूलाग्र बदल घडवून आणेल."
विधेयकातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सुरक्षित क्रीडा धोरण, ज्यात खेळाडू संरक्षण चौकट, तक्रार निवारण यंत्रणा आणि शोषणाविरुद्ध संरक्षणात्मक उपाययोजनांचा विशेषतः महिला, दिव्यांग आणि अल्पवयीन मुलांसाठी अनिवार्य अवलंब करण्याची तरतूद आहे. पॅरालिम्पिकच्या मागील दोन स्पर्धांमध्ये तीन पदके जिंकणारी अवनी लेखरा हिने लिहिले, "दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले क्रीडा विधेयक 2025, सुरक्षित क्रीडा धोरण आणि समान संधींसह महिला आणि पॅरा-अॅथलीट्ससाठी सुरक्षितता, प्रतिष्ठा आणि प्रगती सुनिश्चित करते. समावेशकतेचे कृतीत रूपान्तर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार."
आयओए अँटी-डोपिंग समितीचे अध्यक्ष रोहित राजपाल यांनी उत्तेजक सेवन विरोधी (सुधारणा) विधेयकावर आपले मत मांडले. "हे भारतातील खेळांसाठी क्रांतिकारी ठरेल, वाद जलद गतीने सोडवेल आणि खेळाडू आणि क्रीडा प्रशासनासाठी स्पष्टता आणेल. समावेशकतेला चालना देण्यासाठी आपण संघटनांना सहकार्य केले पाहिजे. नाडामध्ये काम केल्यानंतर, मला अँटी-डोपिंग प्रशासनाची थोडी समज आली आहे. आम्ही वाडासोबत काम करण्यास उत्सुक आहोत आणि खेळाडूंनी देखील अधिक जागरूक राहण्याची आवश्यकता आहे."
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156641)