दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
स्थावर मालमत्तांमध्ये डिजिटल संपर्कव्यवस्थेचे मूल्यांकन करण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मार्गदर्शक पुस्तिका केली जारी
Posted On:
13 AUG 2025 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2025
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (टीआरएआय-ट्राय) आज डिजिटल संपर्कव्यवस्थेच्या संदर्भात स्थावर मालमत्तांच्या श्रेणी निर्धारणासाठी मार्गदर्शक पुस्तिका जारी केली. विविध इमारती वेगवान, विश्वासार्ह डिजिटल संपर्काच्या उपलब्धतेने किती परिणामकारकरीत्या सुसज्ज आहेत यांचे मूल्यमापन करण्यासाठीची ही देशातील पहिली प्रमाणित चौकट आहे.
मोबाईल फोनसाठी उपलब्ध डाटापैकी 80% डाटा कोणत्याही इमारतीच्या अंतर्गत भागातून वापरला जात असल्यामुळे आणि 4 जी तसेच 5 जी सारखे उच्च-वारंवारता बँडचे सिग्नल्स आधुनिक काळातील इमारत बांधणी साहित्यामुळे कमकुवत होत असल्यामुळे कामकाज, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि दैनंदिन डिजिटल सेवांसाठी इमारतींच्या अंतर्भागात सशक्त डिजिटल नेटवर्क उपलब्ध असणे अत्यावश्यक झाले आहे. अंतर्भागातील कमकुवत संपर्कव्यवस्था ग्राहकांचा अनुभव आणि एकंदर सेवेच्या दर्जावर थेट प्रभाव टाकते.
‘डिजिटल संपर्कव्यवस्था नियमावली 2024 साठी स्थावर मालमत्तांच्या श्रेणीनिर्धारणा’ अंतर्गत विकसित करण्यात आलेली ही पुस्तिका:
- डिजिटल संपर्कव्यवस्था श्रेणीनिर्धारण संस्थांसाठी (डीसीआरएएस) एकसमान मूल्यांकन पद्धती प्रस्थापित करते.
- मालमत्ता व्यवस्थापक (पीएम्स) तसेच सेवा पुरवठादारांना भविष्यासाठी सज्ज डिजिटल संपर्कव्यवस्था (डीसीआय) विषयक पायाभूत सुविधांचे नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी एक ‘संदर्भीय आराखडा’ म्हणून कार्य करते.
- फायबर्सची तयारी, इमारतीच्या अंतर्भागातील मोबाईलच्या कार्याचा प्रसार, वाय-फायची पोहोच, ब्रॉडबॅंडचा वेग तसेच एकंदर वापरकर्ता अनुभवासह मालमत्तांच्या श्रेणी निर्धारणासाठी पारदर्शक, प्रमाणित निकष निश्चित करते.
- खरेदीदार, भाडेकरू आणि व्यापारी संस्था यांना खऱ्या डिजिटल संपर्कव्यवस्थेच्या कामगिरीवर आधारित माहितीपूर्ण निर्णय घेणे शक्य करते.
- विकासकांना रचनेपासून ते बांधकाम स्तरापर्यंत सशक्त डिजिटल पायाभूत सुविधा समाविष्ट करून घेण्यासाठी प्रोत्साहित करणे
“21 व्या शतकात, डिजिटल संपर्कव्यवस्था ही चैनीची बाब राहिलेली नसून ती वीज किंवा पाण्याप्रमाणे आवश्यक पायाभूत सुविधा बनली आहे. आजघडीला डिजिटल संपर्कव्यवस्था वृद्धी, नवोन्मेष आणि संधींना अधिक बळ मिळवून देते. अधिकाधिक नागरिकांना आपल्या जोडलेल्या अर्थव्यवस्थेत संपूर्णपणे सहभागी होणे शक्य करून आणि समावेशक राष्ट्रीय विकासासाठीचा पाया घालत ही चौकट भारतातील प्रत्येक इमारत डिजिटल भारत संकल्पनेसाठी सज्ज करण्याच्या दिशेने उचललेले एक निर्णायक पाऊल आहे,” ट्रायचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी म्हणाले.
गेल्या दशकभरात, भारतामध्ये वेगवान डिजिटल स्थित्यंतर घडून आले असून त्यामुळे नागरिक कसे कामकाज करतात, शिकतात, आरोग्यसुविधा प्राप्त करतात आणि सरकारी सेवांशी जोडले जातात या बाबी देखील नव्याने घडत गेल्या आहेत. विश्वासार्ह डिजिटल पायाभूत सुविधा आता आर्थिक वृद्धी, नवोन्मेष आणि समाज कल्याणाला आधार देतात. उपलब्ध डाटापैकी बहुतांश डाटा कोणत्याही इमारतीच्या अंतर्गत भागातून वापरला जात असल्यामुळे, इमारतींच्या आतमध्ये सशक्त डिजिटल संपर्कव्यवस्था सुनिश्चित करणे आता महत्त्वाचे झाले आहे.
यावर उपाय म्हणून ट्रायने 25 ऑक्टोबर 2024 रोजी डिजिटल संपर्कव्यवस्था नियमावली 2024 साठी स्थावर मालमत्तांचे श्रेणीनिर्धारण अधिसूचित करून, डीसीआयच्या मुल्यांकनासाठी प्रमाणित, सहयोगात्मक चौकट उभारली. 13 मे 2025 रोजी डिजिटल संपर्कव्यवस्थेच्या मुल्यांकनासाठीच्या नियमावलीचा मसुदा सार्वजनिक चर्चेसाठी जारी करून सेवा पुरवठादार, पायाभूत सुविधा पुरवठादार, ग्राहक संघटना तसेच संभाव्य डीसीआरएज यांसह चौदा भागधारकांकडून अभिप्राय मागवण्यात आले ज्यामध्ये एका ग्राहक संघटनेकडून सादर झालेल्या प्रती सूचनांचा देखील समावेश आहे. या नियमावलीमध्ये सुधारित व्याख्या, सुस्पष्ट मूल्यांकन निकष आणि अधिक सशक्त अंमलबजावणीविषयक मार्गदर्शक तत्वांचा समावेश असून त्या सूचना आणि प्रती सूचना अशा दोन्हींचा योग्य विचार करून देशभरात न्याय्य, विश्वासार्ह आणि सातत्यपूर्ण श्रेणीनिर्धारण सुनिश्चित करतात. तयार संदर्भासाठी सूचना आणि विरोधी सूचना अशा दोन्हींचे विश्लेषण ट्रायच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नियमावलीसंदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी कृपया येथे संपर्क करा:
तेजपाल सिंह, सल्लागार (क्यूओएस-आय), ट्राय
ईमेल: adv-qos1@trai.gov.in | दूरध्वनी क्रमांक: +91-11-20907759
* * *
निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156158)