गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून लखनौ मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-1बी ला मंजुरी – 11.165 किमी लांबी, 12 स्थानके, एकूण खर्च 5,801 कोटी रुपये

Posted On: 12 AUG 2025 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील लखनौ मेट्रो रेल्वे  प्रकल्पाच्या टप्पा-1बी ला मंजुरी दिली आहे. या टप्प्यात 11.165 किमी लांबीचा मार्ग असून (7 भुयारी व 5 उन्नत  स्थानके) अश्या एकूण 12 स्थानकांचा समावेश आहे.  टप्पा-1बी कार्यान्वित झाल्यानंतर लखनौ शहरात 34 किमी लांबीचे सक्रिय मेट्रो रेल्वेचे जाळे उपलब्ध होणार आहे.

फायदे व विकासाला चालना:

लखनौ मेट्रो रेल प्रकल्पाचा टप्पा-1बी हा शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हा टप्पा मेट्रो रेल्वेच्या जाळ्याचे मोठ्या विस्ताराचे प्रतिनिधित्व करतो.

संवर्धित संपर्क व्यवस्था:

सुमारे 11.165 किमी लांबीचा  नवीन मेट्रो मार्ग  जुने लखनौ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वाधिक दाट लोकवस्तीच्या भागांना सुलभ व कार्यक्षम सार्वजनिक वाहतुकीची  सोय पुरवेल. 

या टप्प्यात जुन्या लखनौतील खालील महत्त्वाच्या भागांचा समावेश आहे:

  • अमिनाबाद, याहियागंज, पांडेयगंज व चौक यांसारखी व्यापारी केंद्रे
  • किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (वैद्यकीय महाविद्यालय) यांसारखी महत्त्वाची आरोग्यसेवा केंद्रे
  • मोठा व छोटा  इमामबाडा, भूलभुलैया, घंटा घर  व रूमी दरवाजा यांसारखी प्रमुख पर्यटनस्थळे
  • लखनौच्या समृद्ध खाद्यपरंपरेचे प्रतिनिधित्व करणारी प्रसिद्ध खाद्य ठिकाणे

या भागांना मेट्रो रेल्वेच्या जाळ्याशी जोडल्याने संपर्क व्यवस्था सुलभ होईल, पर्यटनाला चालना मिळेल शिवाय स्थानिक आर्थिक क्रियाशीलता वाढेल व नागरिक तसेच पर्यटक यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल.

वाहतूक कोंडीतील घट:

लखनौ मेट्रो रेल ही रस्ते वाहतुकीस पर्यायी, कार्यक्षम व्यवस्था आहे. त्याचबरोबर टप्पा-1बी मुळे जुन्या लखनौतील सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या मार्गांवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच रस्ते वाहतुकीत घट झाल्यास वाहतूक  अधिक सुरळीत होईल, प्रवासाचा वेळ कमी होईल व रस्ते सुरक्षेतदेखील वाढ होईल.

पर्यावरणीय लाभ:

लखनौ मेट्रो रेल्वे  प्रकल्पाच्या टप्पा-1बी ची भर पडल्याने आणि लखनौ शहरातील एकूण मेट्रो रेल्वेचे जाळे वाढल्याने, पारंपरिक जीवाश्म इंधनावर आधारित वाहतुकीच्या तुलनेत कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होईल.

आर्थिक विकास :

प्रवासाचा कालावधी कमी होणे आणि विमानतळ, रेल्वे स्थानके व बस डेपो यांसारख्या शहरातील विविध भागांपर्यंत सुधारित प्रवेश मिळाल्याने, नागरिकांना त्यांच्या कार्यस्थळांपर्यंत व इतर ठिकाणांपर्यंत अधिक कार्यक्षमतेने पोहोचणे शक्य होईल. तसेच सुधारित संपर्क व्यवस्थेमुळे नवीन मेट्रो स्थानकांच्या परिसरातील स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल, तसेच पूर्वी कमी उपलब्ध असलेल्या भागांमध्ये गुंतवणूक व विकासाला प्रोत्साहन मिळेल.

सामाजिक परिणाम:

लखनौ मेट्रो रेल्वे जाळ्याच्या टप्पा-1बी च्या विस्तारामुळे सार्वजनिक वाहतुकीचा अधिक न्याय्य वापर सुनिश्चित होईल, ज्याचा लाभ विविध सामाजिक-आर्थिक गटांना मिळेल. यामुळे वाहतूक सेवांमधील असमानता कमी होईल व प्रवासाचा कालावधी कमी होऊन तसेच अत्यावश्यक सेवांपर्यंतचा प्रवेश सुधारून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल.

लखनौ मेट्रो रेल प्रकल्पाचा टप्पा-1बी हा शहरासाठी परिवर्तनकारी विकास ठरणार आहे. यामुळे सुधारित संपर्क व्यवस्था, कमी झालेली वाहतूक कोंडी, पर्यावरणीय फायदे, आर्थिक विकास  आणि जीवनमानातील सुधारणा यांचा लाभ या प्रकल्पातून मिळणार आहे. तसेच शहरी आव्हानांना उत्तर देत, भविष्यातील विस्तारासाठी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करून, टप्पा-1बी हा शहराच्या विकासाच्या प्रवाहात व शाश्वततेत महत्त्वाची भूमिका बजावेल.

 

* * *

सोनाली काकडे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2155630)