संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑपरेशन सिंदूर हे तिन्ही सेनादलांमधील समन्वय आणि कार्यान्वयन एकात्मकतेचे प्रतीक आहे: संरक्षण दल प्रमुख

Posted On: 10 AUG 2025 10:02AM by PIB Mumbai

 

‘ऑपरेशन सिंदूर’चे यश हे तिन्ही सेनादलांमधील समन्वय आणि कार्यान्वयन एकात्मकतेचे प्रतीक आहे असे संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी म्हटले आहे. सिकंदराबाद येथे 21 व्या उच्च संरक्षण व्यवस्थापन अभ्यासक्रम (HDMC) च्या सहभागींना आणि संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालय (CDM) मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. सशस्त्र दलांमधील सयन्वय आणि एकात्मता यावरील धोरणात्मक दृष्टिकोन संरक्षण दल प्रमुखांनी सामायिक केले तसेच एकात्मिक कार्यान्वयनाबाबत आगामी पथदर्शी प्रकल्पाला आकार देण्याच्या उद्देशाने महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले.

आधुनिक काळातील तंत्रज्ञानाधारित युद्धातील विघटनकारी बदलांना सामोरे जाण्यासाठी व्यापक क्षमता विकास, आत्मनिर्भरता आणि सैन्यात केल्या जाणाऱ्या परिवर्तनात्मक बदलांचा प्रगाढ अभ्यास यावर जनरल अनिल चौहान यांनी भर दिला.

A person in uniform speaking at a podiumDescription automatically generated

संरक्षण दल प्रमुखांनी ‘राष्ट्रीय सुरक्षा संरचना आणि उच्च संरक्षण व्यवस्थापन’ या विषयावर विवेचनात्मक भाष्य केले. भारताच्या संरक्षण दलांची उत्क्रांती आणि सध्याच्या संरचनेची रूपरेषा त्यांनी विषद केली. त्यांनी लष्करी व्यवहार विभागाची कामगिरी, निर्णय घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा समित्यांचे कामकाज, संघटनात्मक पुनर्रचनेसह सुधारणांची अंमलबजावणी आणि संयुक्त क्षमता वाढविण्यासाठी एकत्रित अधिकार क्षमतेसाठी अंगिकारण्यात आलेला पथदर्शी प्रकल्प यावर प्रकाश टाकला. राष्ट्रीय सुरक्षेला भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सातत्यपूर्ण सुधारणा, समन्वय आणि अनुकूलता यांचे महत्त्व या संबोधनात अधोरेखित करण्यात आले.

संयुक्त लॉजिस्टिक्स आणि एकात्मता मजबूत करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, जनरल अनिल चौहान यांनी संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयाने तयार केलेल्या 'जॉइंट प्राइमर फॉर इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स' या विस्तृत मार्गदर्शिकेचे प्रकाशन केले. लॉजिस्टिक्स हा लष्करी कार्यान्वयनाचा कणा आहे आणि सशस्त्र दलांमध्ये धोरणात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लॉजिस्टिक प्रक्रियांचे एकत्रीकरण महत्त्वपूर्ण आहे, असे ते म्हणाले.

ही संदर्भ मार्गदर्शिका लॉजिस्टिक्स प्रणालीच्या आधुनिकीकरणात एक पाऊल पुढे टाकते, ज्यामुळे सशस्त्र दल नेहमीच कोणत्याही आव्हानासाठी सज्ज आणि तयार असतात. लॉजिस्टिक्स एकात्मिकतेवर आधारित डिजिटायझेशन, राष्ट्रीय लॉजिस्टिक्स संरचनेसह सामान्य तरतूदी आणि संरक्षण सामग्री खरेदी सह एकात्मतेच्या मुख्य क्षेत्रांवर ती प्रकाश टाकते. या दस्तऐवजाचे उद्दिष्ट तिन्ही सेवादलांमधील लॉजिस्टिक्स समन्वय वाढवणे, कार्यक्षमता सुधारणे आणि सशस्त्र दलांमध्ये अधिक संघटनात्मक परिणामकारकता सुनिश्चित करणे आहे.

स्मार्ट  दुचाकी सायकल सामायिकरण सुविधेचे उद्घाटन देखील संरक्षण दल प्रमुखांनी केले, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होत संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयामधील कर्मचाऱ्यांना दैनंदिन प्रवासासाठी पर्यावरणपूरक ई-सायकलींमध्ये सोयीस्कर प्रवेश सक्षम करण्यासाठी हा एक अग्रगण्य उपक्रम ठरेल. संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयाने हा प्रकल्प स्मार्ट बाइक मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने राबवला आहे तसेच हरित जीवन पद्धती, स्मार्ट तंत्रज्ञान आणि निरोगी जीवनशैली पर्याय स्वीकारण्यासाठी संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयाची वचनबद्धता यातून प्रतीत होते.

A group of men standing in front of a signDescription automatically generated

सीडीएम मेजर जनरल कमांडंट हर्ष छिब्बर यांनी सशस्त्र दलांच्या भविष्यातील धोरणात्मक नेतृत्वाला आकार देण्याच्या उद्देशाने व्यावसायिक लष्करी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अलिकडच्या काळात घेतलेल्या उपक्रमांची विस्तृत माहिती दिली.

तिन्ही सेनादलांची एक प्रमुख आधारभूत संस्था असलेले संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालय, वरिष्ठ स्तरावरील नेतृत्व भूमिकांसाठी आवश्यक असलेल्या समकालीन व्यवस्थापन कौशल्यांनी उच्च अधिकारी घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वर्तमान 44 आठवड्यांच्या उच्च संरक्षण व्यवस्थापन अभ्यासक्रमात 167 अधिकारी सहभागी आहेत, ज्यात मित्र राष्ट्रांच्या 12 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातून प्रादेशिक सहकार्य आणि लष्करी राजनैतिकतेसाठी भारताची वचनबद्धता प्रतीत होते.

***

नाना मेश्राम/संदेश नाईक/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2154816)