पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्रिमंडळाने वर्ष 2025-26 साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी 12,000 कोटी रुपयांचे लक्ष्यित अनुदान  सुरू ठेवण्यास  दिली मंजुरी

Posted On: 08 AUG 2025 4:14PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2025-26 साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) लाभार्थ्यांना 14.2 किलो सिलिंडर मागे दरवर्षी 9 रिफिलपर्यंत (आणि 5 किलो सिलेंडरसाठी उचित प्रमाणानुसार) 300 रुपये लक्ष्यित अनुदान सुरु  ठेवण्यास मंजुरी दिली आहे. या अनुदानाचा खर्च 12,000 कोटी रुपये आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना: देशभरातील गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना ठेव मुक्त  एलपीजी जोडणी  प्रदान करण्याच्या उद्देशाने मे  2016  मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (पीएमयुवाय) सुरू करण्यात आली होती . 01.07.2025 पर्यंत, देशभरात सुमारे 10.33 कोटी पीएमयूवाय जोडण्या  आहेत.

सर्व पीएमयूवाय लाभार्थ्यांना ठेव  मुक्त एलपीजी कनेक्शन मिळते ज्यामध्ये सिलेंडरची अनामत रक्कम ,  प्रेशर रेग्युलेटर, सुरक्षा नळी, घरगुती गॅस ग्राहक कार्ड (डीजीसीसी) पुस्तिका आणि ते बसवण्याचे  शुल्क समाविष्ट असते. उज्ज्वला 2.0 च्या विद्यमान पद्धतींनुसार, सर्व लाभार्थ्यांना पहिले रिफिल आणि शेगडी  देखील मोफत दिली जाते. पीएमयूवाय लाभार्थ्यांना एलपीजी कनेक्शन किंवा पहिले रिफिल किंवा शेगडीसाठी कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही कारण त्यांचा खर्च भारत सरकार/ओएमसीद्वारे केला जातो.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना लक्ष्यित अनुदान: भारत आपल्या एलपीजी गरजेच्या सुमारे 60% आयात करतो. एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील तीव्र चढउतारांच्या परिणामापासून पीएमयूवाय लाभार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि पीएमयूवाय ग्राहकांसाठी एलपीजी अधिक किफायतशीर बनवण्यासाठी, जेणेकरून ते  एलपीजीचा शाश्वत वापर सुरु ठेवतील यासाठी  सरकारने मे 2022 मध्ये पीएमयूवाय ग्राहकांना प्रति 14.2 किलोच्या  सिलेंडरसाठी दरवर्षी जास्तीत जास्त  12 रिफिल पर्यंत (आणि  5  किलोच्या सिलिंडरसाठी योग्य  प्रमाणानुसार) 200/- रुपयांचे लक्ष्यित अनुदान सुरू केले. ऑक्टोबर 2023 मध्ये, सरकारने प्रति वर्ष जास्तीत जास्त 12 रिफिल पर्यंत (आणि  5  किलोच्या सिलिंडरसाठी योग्य  प्रमाणानुसार)  प्रति 14.2  किलोच्या  सिलेंडरसाठी लक्ष्यित अनुदान 300 रुपये पर्यंत वाढवले.

पीएमयूवाय कुटुंबांद्वारे एलपीजी वापरात वाढ : पीएमयूवाय ग्राहकांचा सरासरी दरडोई वापर जो 2019-20 मध्ये अवघा 3 रिफिल  आणि 2022-23 मध्ये 3. 68 रिफिल होता तो आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सुमारे 4.47 रिफील  पर्यंत वाढला  आहे.

***

निलिमा चितळे/सुषमा काणे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2154398)