आयुष मंत्रालय
अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) आयुष मंत्रालयाच्या सल्लामसलतीने, श्रेणी 'अ' अंतर्गत येणाऱ्या आयुर्वेद आहार उत्पादनांची व्याख्यात्मक यादी जारी केली
Posted On:
02 AUG 2025 4:31PM by PIB Mumbai
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय)आयुष मंत्रालयासोबत सल्लामसलत करून, ‘आयुर्वेद आहार’ श्रेणी अंतर्गत येणाऱ्या आयुर्वेदिक खाद्यपदार्थांची एक व्याख्यात्मक यादी जारी केली आहे. 2022 मध्ये 'अन्न सुरक्षा आणि मानक (आयुर्वेद आहार) नियम' लागू झाल्यानंतर, भारताच्या या पारंपरिक अन्न ज्ञानाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
नियमनामधील अनुसूची 'ब' च्या टीप (1) नुसार जारी केलेली ही यादी, अनुसूची 'अ' मध्ये नमूद केलेल्या पारंपरिक आयुर्वेदिक ग्रंथांमधून तयार केली आहे. यामुळे या अन्न उत्पादनांची सत्यता आणि पारंपरिक आधार सुनिश्चित होतो. अन्न व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना आयुर्वेद आहार उत्पादनांच्या निर्मितीसाठी एक स्पष्ट आणि विश्वसनीय संदर्भ देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

भविष्यात यादीमध्ये नवीन उत्पादने समाविष्ट करण्यासाठी, एफएसएसएआयने अन्न व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना एक प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. यानुसार, ज्यांची उत्पादने अद्याप 'श्रेणी अ' मध्ये समाविष्ट नाहीत, त्यांना ती यादीत समाविष्ट करण्याची विनंती करता येईल. अशा विनंत्यांसाठी अनुसूची 'अ' मध्ये नमूद केलेल्या अधिकृत ग्रंथांमधून संदर्भ सादर करणे आवश्यक आहे. या संदर्भांमुळे उत्पादनांची प्रमाणिकता सिद्ध होण्यास मदत होईल.
भविष्यात होणारे कोणतेही बदल किंवा नवीन अद्यतने अन्न प्राधिकरणाद्वारे योग्यरित्या अधिसूचित केली जातील.
विशेषतः, 'आयुर्वेद आहार' हा जगातील सर्वात जुन्या आणि सर्वांगीण आरोग्य प्रणालींपैकी एक असलेल्या आयुर्वेदात रुजलेल्या भारताच्या कालातीत अन्न संस्कृतीची समृद्धी दर्शवतो. ही अन्न उत्पादने निसर्गाशी सुसंगती राखून तयार केली जातात, जी पोषण, संतुलन आणि परंपरा यांचा मेळ साधून संपूर्ण आरोग्याचा पुरस्कार करतात.
केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री, प्रतापराव जाधव यांनी नागरिकांना आपल्या दैनंदिन जीवनात आयुर्वेद आहाराचा समावेश करण्याचे आवाहन केले. यामुळे दीर्घकाळ आरोग्य लाभ मिळतील, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, भारताच्या पारंपरिक ज्ञानावर आधारित या जुन्या आहार पद्धती केवळ शरीराला पोषण देत नाहीत, तर रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, पचनक्रिया सुधारतात आणि सर्वांगीण आरोग्याला प्रोत्साहन देतात. केंद्रीय मंत्र्यांनी पुढे म्हटले, "आजच्या धावपळीच्या जीवनात, आयुर्वेद आहार स्वीकारणे हे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि संतुलित, शाश्वत जीवनशैलीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे."
एफएसएसएआय द्वारे प्रकाशित आयुर्वेद आहाराची यादी खालील लिंकवर उपलब्ध आहे:
https://www.fssai.gov.in/upload/advisories/2025/07/68835f872eaf4Order%20dated%2025-07-2025%20enclosing%20Ayurveda%20Aahara.pdf
***
सुषमा काणे/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2151799)