वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-ब्रिटन समावेशक आर्थिक आणि व्यापार करार संदर्भात वाणिज्य मंत्रालयाची वस्त्रोद्योग, चर्म आणि पादत्राणे उद्योगातील भागधारकांसोबत बैठक
या कराराने भारतातील कापड, चर्म आणि पादत्राणे उद्योगासाठी संधींचे एक नवे विश्व उघडले: पियुष गोयल
हा करार भारतीय निर्यातदारांना अधिक स्पर्धात्मक बनवेल : गोयल
Posted On:
28 JUL 2025 10:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2025
भारत-ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार (CETA) द्वारे निर्माण होणाऱ्या संधींवर चर्चा करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाने आज नवी दिल्ली येथे कापड, चर्म आणि पादत्राणे क्षेत्रातील भागधारकांसोबत एक उद्योग संवाद आयोजित केला होता.
हा करार भारताच्या कापड, चर्म आणि पादत्राणे उद्योगांसाठी एक परिवर्तनकारी संधी आहे, असे या बैठकीला दिलेल्या संदेशात, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.
हा ऐतिहासिक करार या क्षेत्रांसाठी संधींचे एक व्यापक विश्व खुले करतो, हे गोयल यांनी अधोरेखित केले. भारत-ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार या ऐतिहासिक करारामुळे भारताच्या वस्त्रोद्योगाच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे असे गोयल यांनी नमूद केले.
या बैठकीसाठी उद्योग आणि संस्थात्मक निमंत्रितांमध्ये लेदर एक्सपोर्ट्स कौन्सिल (CLE), भारतीय उद्योग महासंघ (CII), कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन फूटवेअर इंडस्ट्री (CIFI), विविध वस्त्रोद्योग प्रोत्साहन मंडळे, उद्योग संघटना आणि वस्त्र निर्यातदार यांचा समावेश होता.
या करारामुळे भारतीय वस्त्र आणि कपड्यांना ब्रिटनच्या बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. शुल्क मुक्त बाजारपेठेच्या उपलब्धतेमुळे तयार कपडे, होम टेक्सटाइल, गालिचे आणि हस्तकला यासारख्या विभागांना फायदा होईल आणि निर्यातीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
बाजारपेठ शुल्क मुक्त केल्याने भारताची ब्रिटनला होणारी चर्म आणि पादत्राणे निर्यात जवळजवळ दुप्पट होण्याची अपेक्षा आहे - म्हणजे 2024 मधील 494 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवरून तीन वर्षांत 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. देशभरातील प्रमुख उत्पादन केंद्रांना यांचा लक्षणीय फायदा होणार असून या वाढत्या मागणीमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, महिला उद्योजक आणि युवकांच्या नेतृत्वाखालील उद्योगांमध्ये हजारो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
या करारामुळे सीमाशुल्क प्रक्रियाही सुलभ होणार असून तांत्रिक मानके एकसंध केली जातील तसेच कोल्हापुरी चप्पल आणि मोजडी यासारख्या भारतीय भौगोलिक निर्देशांकांना (GI) संरक्षण मिळणार आहे. यामुळे ब्रिटनच्या 8.7 अब्ज डॉलर्सच्या चर्म आणि पादत्राणे बाजारात भारतीय उत्पादनांची ओळख अधिक बळकट होणार आहे.
शुल्कमुक्त प्रवेश आणि नियामक सुलभतेद्वारे भारत-ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे भारतीय उत्पादकांच्या किंमत निर्धारण क्षमतेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दृश्यमानतेत वाढ होईल विशेषतः उच्च दर्जाचे चर्म आणि फॅशन उत्पादने, ज्याची ब्रिटनमध्ये खूप मोठी मागणी आहे.
भारत-ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार शाश्वत उत्पादन पद्धतींना प्रोत्साहन देतो तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना डिजिटल साधने स्वीकारण्यास, जागतिक मूल्य साखळीत समाविष्ट होण्यास आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून विस्तार साधण्यास प्रोत्साहित करतो.
भारत-ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार हा चर्म आणि पादत्राणे उद्योगाला जागतिक स्तरावर नेत असलेला गतीवर्धक आणि परिवर्तनकारी घटक आहे, जो भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच कारागिरांसाठी आर्थिक विकास शाश्वतता आणि सर्वसमावेशक प्रगती साधणार आहे.
विविध निर्यात प्रोत्साहन परिषदा आणि उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींनी भारत-ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराचे स्वागत केले.
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2149524)