भूविज्ञान मंत्रालय
भारताच्या हवामान विषयक सज्जतेला मिळाली चालना, भूविज्ञान मंत्रालयाच्या स्थापना दिनी डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते प्रमुख उपक्रमांचे उद्घाटन
Posted On:
28 JUL 2025 6:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2025
हवामान-अनुकूल आणि वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम भारताच्या उभारणीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज भूविज्ञान मंत्रालयाद्वारे विकसित नवीन वैज्ञानिक साधने आणि डिजिटल सेवांच्या संचाचे अनावरण केले, तसेच विज्ञान-केंद्रित नागरिक सेवांमध्ये लोक सहभाग आणि व्यापक जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय राजधानीत आयोजित एका कार्यक्रमात मंत्रालयाच्या 19 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधत जितेंद्र सिंह म्हणाले की गेल्या दशकभरात मंत्रालयाचा दृष्टिकोन, पोहोच आणि लोकांच्या जीवनावर वास्तविक-वेळेत प्रभाव यात लक्षणीय बदल झाला आहे.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, विज्ञान आणि नवोन्मेष हे केवळ पर्यावरणीय शाश्वततेच्या केंद्रस्थानी नाहीत तर आगामी दशकांमध्ये भारताच्या आर्थिक वाढीमध्येही ते महत्त्वाची भूमिका बजावतील.
या कार्यक्रमात सिंह यांनी भूविज्ञान मंत्रालया अंतर्गत विविध संस्थांनी विकसित केलेल्या 14 प्रमुख उत्पादने आणि उपक्रमांचे औपचारिकपणे उद्घाटन केले. यामध्ये पर्जन्यमान निरीक्षण आणि पीक-हवामान कॅलेंडर, भारत अंदाज प्रणाली - दीर्घ कालावधी अंदाज (BharatFS-ERP) सारख्या प्रगत हवामान अंदाज प्रणाली, उच्च-रिझोल्यूशन पर्जन्यमान डेटासेट, अद्ययावत वेव्ह अॅटलस आणि समुद्रतळ चार्ट, हवेच्या गुणवत्तेसंबंधी अंदाज प्रणाली, सागरी जैवविविधता अहवाल आणि चार भारतीय शहरांचे भूकंपीय सूक्ष्म क्षेत्रीकरण अभ्यास यांचा समावेश होता.
गेल्या दहा वर्षांतील परिवर्तनासंदर्भात बोलताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी नमूद केले की देशात डॉप्लर हवामान रडारची संख्या आज 15 वरून वाढून 41 झाली आहे. त्याचप्रमाणे, भूकंप आणि हवामान केंद्रे, वरच्या थरातील हवेची निरीक्षण प्रणाली, वीज कोसळण्याचा अंदाज देणारे नेटवर्क आणि पर्जन्यमापक यांची संख्या दुपटीने वाढली आहे. "भूकंपानंतर दोन ते तीन मिनिटांनी, आम्ही आता ऑनलाइन धोक्याचा इशारा जारी करतो जो लाखो लोकांपर्यंत त्वरित पोहचतो. मागणी इतकी वाढली आहे की अलिकडे दिल्लीतील भूकंपात वापरकर्त्यांच्या मोठ्या संख्येमुळे आमचे सर्व्हर क्रॅश झाले," असे त्यांनी नमूद केले.
चक्रीवादळाचा अंदाज वर्तवण्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने केलेल्या प्रगतीचे त्यांनी कौतुक केले. ओदिशात 1999 च्या भीषण चक्रीवादळात 10,000 लोकांच्या जीवितहानीनंतर अनेक सुधारणा झाल्या,वेळेवर सूचना देण्यात आल्यामुळे अलिकडच्या काळात कमीत कमी जीवितहानीसह वादळांचा सामना करता आला.

कृषी आणि मत्स्यव्यवसाय यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना मंत्रालयाच्या कामाची कशी मदत होत आहे याचा उल्लेख डॉ. जितेंद्र सिंह यांनी केला.
संवाद आणि जनसंपर्क वाढविण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. "आम्ही विकसित केलेल्या साधनांबद्दल अजूनही अनेक लोकांना माहिती नाही. लोकांशी त्यांच्या भाषेत आपण संवाद साधला पाहिजे," असे ते म्हणाले, यासाठी त्यांनी इतर मंत्रालये आणि सरकारी संप्रेषण प्लॅटफॉर्मशी जवळून समन्वय साधण्याची सूचना केली.
खोल समुद्रातील मोहीम (डीप ओशन मिशन) आमूलाग्र बदल घडवून आणेल असे नमूद करत डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की अद्याप शोध घेण्यात न आलेली भारताची पाण्याखालील संपत्ती भविष्यातील आर्थिक विकासाला चालना देणारा एक प्रमुख घटक ठरू शकेल.
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2149422)