पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
संसद प्रश्न : वनक्षेत्र वृद्धीसाठी उचललेली पावले
Posted On:
24 JUL 2025 10:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जुलै 2025
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी डेहराडून येथील भारतीय वन सर्वेक्षण संस्था दर दोन वर्षांनी देशातील वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादनाचे क्षेत्र यांचे मूल्यांकन करून भारत वन स्थिती अहवाल (आयएसएफआर) प्रकाशित करते. एफएसआय उपग्रह रिमोट सेन्सिंग डेटा आणि क्षेत्र-आधारित राष्ट्रीय वन सूची (एनएफआय) च्या आधारे केली जाणारी वन आच्छादन मूल्यांकन प्रक्रिया ही एक सखोल मॅपिंग प्रक्रिया असून रिमोट सेन्सिंगवर आधारित आहे. या अंतर्गत प्रत्यक्ष पडताळणी आणि राष्ट्रीय वन माहितीसंग्रहातील क्षेत्रीय डेटा यांचा समावेश आहे.
आयएसएफआर 2023 नुसार देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र 8,27,356.95 चौ.किमी म्हणजे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 25.17% आहे. यामध्ये वन क्षेत्र 7,15,342.61 चौ.किमी असून वृक्ष क्षेत्र 1,12,014.34 चौ.किमी आहे. 2021 च्या तुलनेत देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्रामध्ये 1445.81 चौ.किमी वाढ झाल्याचे सध्याच्या मूल्यांकनावरून दिसून येते. यामध्ये 156.41 चौरस किलोमीटर वनक्षेत्र आणि 1289.4 चौरस किलोमीटर वृक्षक्षेत्र समाविष्ट आहे.
देशाच्या वनक्षेत्रात आयएसएफआर 2013 आणि आयएसएफआर 2023 या दहा वर्षांच्या कालावधीत 16,630.25 चौ.किमी इतकी निव्वळ वाढ झाली आहे. म्हणूनच, संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या संवर्धन प्रयत्नांसह विविध धोरणे आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीमुळे गेल्या दशकात देशाचे वन आच्छादन केवळ राखले गेले नाही तर त्यात निव्वळ वाढ दिसून आली आहे. गेल्या दशकापासून देशाच्या वनक्षेत्रात सातत्याने वाढीचा कल दिसून येत आहे.
वनांचे संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन ही राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांची जबाबदारी आहे. देशातील वनांच्या संरक्षण आणि व्यवस्थापनासाठी कायदेशीर चौकट अस्तित्वात आहे.
याव्यतिरिक्त,केंद्रीय वन मंत्रालय देशातील जंगलांचे संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य पुरवते.
याशिवाय, जागतिक पर्यावरण दिन 2024 निमित्त देशभरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यासाठी एक पेड माँ के नाम अर्थात एक झाड आईच्या नावे ही मोहीम सुरु करण्यात आली. या मोहिमेमुळे देशात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले आहे ज्यामुळे हरित आच्छादन वाढण्यास मदत झाली आहे आणि यावर्षीही ही मोहीम सुरूच आहे.
ही माहिती केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2148115)