गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

21व्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धा-2025 मधले पदक विजेते आणि भारतीय पथकाच्या सत्कार समारंभाला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी केले संबोधित, सर्व सहभागींचे केले अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षांत क्रीडा क्षेत्रासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत पाचपट वाढ, यातून क्रीडा क्षेत्राप्रती केंद्र सरकारची वचनबद्धता दिसून येते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार खेळांना प्रत्येक गावापर्यंत पोहोचवत असून, प्रत्येक खेळासाठी वैज्ञानिक पद्धतीनेच मुलांची निवड आणि प्रशिक्षण दिले जात आहे

Posted On: 18 JUL 2025 9:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जुलै 2025

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी अमेरिकेत अलाबामामधील बर्मिंगघम इथे पार पडलेल्या 21व्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धा-2025 मध्ये सहभागी होऊन परतलेल्या भारतीय पोलीस आणि अग्निशमन दलाच्या तुकडीच्या सत्कारासाठी आज नवी दिल्ली इथे आयोजित समारंभाला संबोधित केले.

21व्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय पथकाने  613 पदके जिंकल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. भारतीय पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या संघाने नोंदवलेली उत्कृष्ट कामगिरी तसेच देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदनही केले. या पुढची जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून, या स्पर्धेतला आपला सहभाग सर्वसमावेशक असायला हवा असे त्यांनी नमूद केले.

या भारतीय पथकाला  4,38,85,000 रुपयांचा प्रोत्साहनपर निधी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

देशभरातील विविध पोलीस दलांमधील खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये चांगले प्रदर्शन केले, आता आपले लक्ष जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धा - 2029 वर असायला हवे, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले.

या पुढची जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धा गुजरातमध्ये अहमदाबाद, गांधीनगर आणि केवडिया इथे होणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली. भारतात प्रचंड क्रीडा क्षमता असल्याची दखल जगाला घ्यावी लागेल अशा प्रकारची कामगिरी भारतीय खेळाडू या स्पर्धांमध्ये  नोंदवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षांत क्रीडा क्षेत्रासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत  पाचपट वाढ झाली आहे, यातून क्रीडा क्षेत्राप्रती केंद्र सरकारची वचनबद्धता दिसून येते, असेही ते म्हणाले. आज देशात मोठ्या संख्येने नवीन क्रीडा पायाभूत सुविधा विकसित केल्या गेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत पहिल्या 5 मध्ये असेल, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार खेळांना प्रत्येक गावापर्यंत पोहोचवत असून, प्रत्येक खेळासाठी वैज्ञानिक पद्धतीनेच मुलांची निवड आणि प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.  सद्यस्थितीत देशात क्रीडा क्षेत्रासाठी खूप सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे, असेही शाह यांनी सांगितले.


निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2145962)