संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वदेशी रचना आणि बांधणी असलेले पहिले डायव्हिंग सपोर्ट व्हेसल 'आयएनएस निस्तार' आज विशाखापट्टणम येथे संरक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नौदलाच्या ताफ्यात झाले दाखल

Posted On: 18 JUL 2025 8:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जुलै 2025

भारतीय नौदलात प्रथमच स्वदेशी रचना आणि बांधणी असलेले पहिले डायव्हिंग सपोर्ट व्हेसल 'आयएनएस निस्तार', 18 जुलै 2025 रोजी विशाखापट्टणम येथे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या उपस्थितीत नौदलात दाखल करण्यात आले. हे जहाज हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने बांधलेल्या दोन डायव्हिंग सपोर्ट व्हेसल्सपैकी पहिले जहाज आहे. हे जहाज अतिशय गुंतागुंतीच्या स्थितीत खोल समुद्रातील 'सॅचुरेशन डायव्हिंग' आणि बचाव कार्यासाठी तयार केले आहे, जी क्षमता जगभरातील मोजक्याच नौदलांकडे आहे.

आपल्या भाषणात, संरक्षण राज्यमंत्र्यांनी भारतीय नौदलाचे आणि स्वदेशी जहाजबांधणी उद्योगाचे कौतुक केले. त्यांनी देशांतर्गत उपाययोजना आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून युद्धनौकांमध्ये स्वदेशी सामग्री  सातत्याने वाढवण्याच्या त्यांच्या अथक प्रयत्नांची प्रशंसा केली. आयएनएस निस्तार नौदलात दाखल झाल्याने भारतीय नौदलाची या प्रदेशातील 'पहिली प्रतिसादकर्ता' आणि 'पसंतीचा सुरक्षा भागीदार' म्हणून असलेली भूमिका अधिक दृढ झाली आहे,असे ते म्हणाले. स्वदेशी जहाजबांधणी उद्योग हा सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' अभियानाचा एक आधारस्तंभ राहिला आहे. सध्या, निर्माणाधीन असलेल्या सर्व 57 नवीन युद्धनौका देशातच बांधल्या जात आहेत.

संजय सेठ यांनी सशस्त्र दलांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करत सांगितले की, भारत आपल्या विरोधातल्या कोणत्याही दुःसाहसाचा  सामना करण्यासाठी कटिबद्ध आणि दृढनिश्चयी आहे. त्यांनी आयएनएस निस्तार  च्या समावेशाचे वर्णन तांत्रिक झेप आणि भविष्यासाठी सज्ज सैन्य दल  निर्माण करण्याच्या दिशेने भारतीय जहाजबांधणीतील एक महत्त्वाचा टप्पा असे केले.

या प्रसंगी बोलताना, नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी आयएनएस निस्तार  हे केवळ एक तांत्रिक साधन नसून, ते एक महत्त्वाचे परिचालनात्मक सक्षमीकरण  असल्याचे म्हटले.ते म्हणाले, "निस्तार भारतीय नौदलाला तसेच आमच्या प्रादेशिक भागीदारांना पाणबुडी बचाव समर्थन  प्रदान करेल. यामुळे भारत या प्रदेशात 'पसंतीचा पाणबुडी बचाव भागीदार'  म्हणून उदयास येईल. निस्तारचे नौदलात दाखल होणे हे आपल्या वाढत्या सागरी औद्योगिक क्षमता आणि परिपक्वतेचा पुरावा आहे, आणि आत्मनिर्भर भारताचे  आणखी एक उत्कृष्ट उदाहरण आहे."

आयएनएस निस्तारबद्दल

आयएनएस निस्तार हे रिमोट संचालित वाहन, सेल्फ-प्रोपेल्ड हायपरबॅरिक लाइफ बोट, डायव्हिंग कॉम्प्रेशन चेंबर्स यांसारख्या अत्याधुनिक डायव्हिंग उपकरणांनी सुसज्ज आहे.  हे 300 मीटरपर्यंत खोल डायव्हिंग आणि बचाव कार्य करू शकते. तसेच, ते खोल पाण्यात बुडालेल्या संकटातील पाणबुडीतून कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी 'मदर शिप' म्हणूनही काम करेल. 

10,000 टन पेक्षा जास्त विस्थापन असलेल्या 118 मीटर लांबीच्या या जहाजाचा नौदलात समावेश , भारतीय नौदलाचा पाणबुडी क्षेत्रात आपली सागरी क्षमता सातत्याने मजबूत करण्याचा दृढसंकल्प दर्शवतो. 120  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या  सहभागासह आणि 80% पेक्षा जास्त स्वदेशी घटक  समाविष्ट करून, आयएनएस निस्तार हे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार जटिल जहाजे बांधण्याच्या भारताच्या क्षमतेचे एक द्योतक आहे.

नौदलात दाखल करण्याच्या सोहळ्याला नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, प्रतिष्ठित नागरी मान्यवर, तत्कालीन 'निस्तार'चे  कर्मचारी आणि हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी उपस्थित होते.


निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2145934)