पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
ऊर्जा वार्ता 2025' मध्ये भारताने मांडली महत्त्वाकांक्षी अपस्ट्रीम ऊर्जा रणनीती
सुरक्षित ऊर्जा भविष्यासाठी सुधारणा, वैविध्य निर्मिती आणि जागतिक सहकार्यावर हरदीपसिंग पुरी यांनी दिला भर
Posted On:
17 JUL 2025 10:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2025
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री पुरी यांनी 'ऊर्जा वार्ता 2025' च्या निमित्ताने आयोजित केलेल्या 'फायरसाईड चॅट' सत्रात बोलताना, अपस्ट्रीम एक्स्प्लोअरेशन आणि उत्पादन (E&P) मजबूत करण्यासाठी, ऊर्जा लवचिकता वाढवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी भारताची सर्वसमावेशक रणनीती मांडली.

रशिया-युक्रेन संघर्ष आणि मध्य पूर्वेतील तणाव यांसारख्या जागतिक भू-राजकीय अडथळ्यांमुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या स्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, पुरी यांनी सांगितले की भारताने आपला कच्च्या तेलाच्या आयात स्त्रोतांची संख्या 27 वरून 40 देशांपर्यंत सक्रियपणे वाढवली आहे. ते म्हणाले की, जागतिक अशांततेच्या काळात ऊर्जा पुरवठ्यात कोणताही खंड पडू नये यासाठी ही वैविध्य निर्मिती एक महत्त्वाचे पाऊल आहे.
पुरी यांनी अतिशय ठामपणे हे स्पष्ट केले की, भारताने कधीही कोणतेही प्रतिबंधित कच्चे तेल खरेदी केलेले नाही. रशियन तेल जागतिक निर्बंधांखाली नसून, केवळ त्यावर किंमतीची मर्यादा होती, जी आंतरराष्ट्रीय ऊर्जा पुरवठा साखळीतील वस्तुस्थितीचे प्रतिबिंब कळावे म्हणून काळजीपूर्वक तयार केली गेली होती.


ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे भारताचा दृष्टिकोन सक्रीय आणि संतुलित राहिला आहे, ज्यामुळे देश जागतिक ऊर्जा बाजारात एक स्थिरीकरण करणारी शक्ती बनला आहे.
भारताच्या ऑफशोअर अर्थात अपतटीय ऊर्जेमधील महत्त्वाकांक्षेचा पुनरुच्चार करताना, पुरी यांनी अंदमान(बेसिन) तेलक्षेत्रामधील महत्त्वपूर्ण हायड्रोकार्बन क्षमतेकडे लक्ष वेधले, ज्याची तुलना त्यांनी समृद्ध गयाना बेसिनशी केली. "मला खात्री आहे की आपल्याला गयानाच्या आकाराची अनेक क्षेत्रे, विशेष करून अंदमान समुद्रात मिळतील," असा तीव्र आशावाद व्यक्त केला.
मंत्र्यांनी देशाच्या सिस्मिक डेटाबेसच्या विस्तार आणि आधुनिकीकरणाद्वारे भूगर्भातील माहितीचे ज्ञान वाढवण्यावर भारताचा भर असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी विस्तृत सिस्मिक सर्वेक्षणे करणे, प्रगत तंत्रज्ञान वापरणे आणि राष्ट्रीय डेटा रिपॉझिटरीद्वारे डेटाची उपलब्धता सर्वांना खुली करणे यावर सरकारचा भर असल्याचेही सांगितले. ते म्हणाले की, हे प्रयत्न गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि तेलक्षेत्र शोधामध्ये पारदर्शक, डेटा-आधारित निर्णय घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचे आहेत
इराण आणि व्हेनेझुएलावरील सध्याच्या निर्बंधांमुळे दीर्घकालीन पुरवठा सुरक्षेबाबतच्या चिंतांना उत्तर देताना, पुरी यांनी अशा निर्बंधांच्या स्थायीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ब्राझील, गयाना आणि कॅनडासारख्या देशांमधून तेलाच्या नवीन स्रोतांच्या उदयाकडे लक्ष वेधले.
जागतिक खनिज तेल बाजार हळूहळू अधिक वैविध्यपूर्ण आणि लवचिक बनत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच, त्यांनी सर्व हितधारकांना ही हमी दिली की, कोणतीही संभाव्य अस्थिरता किंवा अडथळे यांना तोंड देण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज आहे.
देशांतर्गत आघाडीवर भाष्य करताना हरदीपसिंग पुरी यांनी ऊर्जा विकास प्रकल्पांना सुलभ करण्यात राज्य सरकारांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. त्यांनी परस्पर उत्तरदायित्व आणि केंद्र-राज्य सहकार्य अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. तसेच, जी राज्ये ऊर्जा पायाभूत सुविधांना गती देत आहेत, त्यांना सुशासनाचे आदर्श म्हणून गौरवले पाहिजे, अशी सूचना केली.
ऊर्जा वार्ता 2025' ची दुसरी आवृत्ती, भारताची प्रमुख अपस्ट्रीम तेल आणि वायू परिषद, आज (17 जुलै 2025) नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आली होती. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली हायड्रोकार्बन्स महासंचालनालयाद्वारे आयोजित या कार्यक्रमात केंद्रीय आणि राज्य मंत्री, वरिष्ठ अधिकारी, जागतिक उद्योग नेते, क्षेत्रातील तज्ञ आणि माध्यम व्यावसायिक यांसह 700 हून अधिक सहभागी उपस्थित होते. "सहकार्य करा, नवनिर्मिती करा, समन्वय साधा" या संकल्पनेसह, या परिषदेने भारताच्या ऊर्जा आराखड्याविषयी संवाद, तांत्रिक देवाणघेवाण आणि धोरणात्मक दृष्टीसाठी एक गतिमान व्यासपीठ म्हणून काम केले.

परिषदेच्या नवोन्मेष प्रदर्शनाचा भाग म्हणून पुरी यांनी प्रदर्शन गॅलरी आणि नवोन्मेष केंद्राला भेट दिली. या ठिकाणी 'एक्सप्लोरेशन अँड प्रॉडक्शन' (E&P) ऑपरेटर, स्टार्ट-अप्स आणि शैक्षणिक संस्थांनी सादर केलेले 50 हून अधिक तांत्रिक पोस्टर्स आणि 15 हून अधिक नाविन्यपूर्ण उपाययोजनांची माहिती मांडण्यात आली होती. त्यांनी अनेक सहभागींशी संवाद साधला आणि भारताच्या अपस्ट्रीम उद्योगाचे भविष्य घडवण्यात सातत्यपूर्ण तांत्रिक नवोन्मेषाचे महत्त्व अधोरेखित केले.
'ऊर्जा वार्ता 2025' हा ऊर्जा क्षेत्रातील भविष्यातील वाटचालीस दिशा देणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम मानला जात आहे.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2145681)
Visitor Counter : 2