कृषी मंत्रालय
भारत-अर्जेंटिना यांच्यात कृषी सहकार्याबाबत दुसरी संयुक्त कार्यगट बैठक
द्विपक्षीय कृषी सहकार्यासाठी ही बैठक मैलाचा दगड ठरली
Posted On:
16 JUL 2025 9:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2025
भारत आणि अर्जेंटिना यांच्यात कृषी क्षेत्राविषयीची दुसरी संयुक्त कार्यगट बैठक काल झाली. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव देवेश चतुर्वेदी या बैठकीत आभासी पद्धतीने सहभागी झाले. त्यांनी सहअध्यक्ष म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले तर अर्जेंटिनाच्या वतीने कृषी, पशुधन, मत्स्यव्यवसाय सचिव सर्जियो इरैता सह-अध्यक्ष होते. कृषी आणि संबंधित क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी या बैठकीचे महत्त्व दोन्ही बाजूंनी विशद केले.

अर्जेंटिना हा भारतासाठी एक महत्त्वाचा भागीदार असून दोन्ही देशांमधील भागीदारी सहकार्याच्या भावनेवर आधारित आहे, ज्ञान, तंत्रज्ञान आणि दोन्ही देशांना फायदेशीर असलेल्या सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण या बाबतीत दोन देशातील सहकार्य महत्त्वाचे असल्याचे चतुर्वेदी यांनी सांगितले. त्यांनी कृषी यांत्रिकीकरण, कीटक नियंत्रण, हवामानाशी जुळवून घेणारी शेती आणि संयुक्त संशोधन यासारख्या क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत असे त्यांनी नमूद केले.
भारतासोबतची मौल्यवान भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या अर्जेंटिनाच्या वचनबद्धतेवर सर्जियो इरैता यांनी भर दिला. कृषी यांत्रिकीकरण, जीनोम संपादन आणि वनस्पती प्रजनन तंत्रज्ञान यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी अर्जेंटिना कमालीचा उत्सुक आहे असे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांकडे कृषी क्षेत्राचा समृद्ध अनुभव असल्यामुळे उत्पादकता वाढविण्यासाठी, यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी त्यांच्याकडे एकमेकांना पूरक ठरेल असे काम करण्याची क्षमता आहे असे ते म्हणाले.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सहसचिव (वनस्पती संरक्षण) मुक्तानंद अग्रवाल यांनी कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा आढावा घेतला. भारताच्या उल्लेखनीय कृषी कामगिरीविषयी माहिती देताना त्यांनी कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल सांगितले. डिजिटल उपायांचा वापर, हवामान-लवचिक कृषी पद्धतींना प्रोत्साहन देणे, जोखीम कमी करणे आणि शेतकऱ्यांना कर्ज देणे या उपायांचा त्यात समावेश असल्याचे ते म्हणाले.

फलोत्पादनात सहकार्य, तेलबिया आणि डाळींच्या लागवडीची मूल्य साखळी, यांत्रिकीकरण, अचूक शेती, शेतकऱ्यांसाठी कार्बन क्रेडिट, जैव कीटकनाशक, टोळ नियंत्रण आणि व्यवस्थापन, नवीन प्रजनन तंत्रज्ञान आणि बाजारपेठेतील प्रवेश यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली.
कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, भारतीय कृषी संशोधन परिषद, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग आणि परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
* * *
शैलेश पाटील/प्रज्ञा जांभेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2145396)