पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएचडीसीसीआयने भारताच्या पाककलाविषयक वारशाला अधिक प्रकाशझोतात आणण्यासाठी राष्ट्रीय युवा खानसामा (शेफ) स्पर्धेची सुरुवात केली


नवी दिल्ली येथे झालेल्या भव्य नांदी सोहळ्याद्वारे परंपरेचा नवोन्मेषाशी मिलाफ घडवण्यासाठीच्या देशव्यापी प्रतिभा शोध मोहिमेचा प्रारंभ झाला

Posted On: 16 JUL 2025 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2025

 

नवी दिल्लीत पीएचडी हाऊस येथे झालेल्या भव्य नांदी सोहळ्याद्वारे पीएचडी वाणिज्य आणि उद्योग चेंबरने (पीएचडीसीसीआय) केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सहयोगातून देशव्यापी प्रतिभा शोध मोहिमेची (एनवायसीसी) सुरुवात केली. देशभरातील संस्थांमध्ये आदरातिथ्य अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट पाककला प्रतिभा असणारे विद्यार्थी शोधून काढून, त्यांना मार्गदर्शन देऊन त्यांच्या प्रतिभेचा अविष्कार सादर करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयातील अतिरिक्त सचिव आणि महासंचालक, सुमन बिल्ला (भारतीय सनदी अधिकारी) यांनी याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितांना संबोधित करताना, भारतातील लुप्त होत जाणाऱ्या पाककलेच्या परंपरांचे जतन करण्याच्या गरजेवर अधिक भर दिला. तरुण शेफ्सना सर्जकतेने विचार करुन आंतरराष्ट्रीय आहारशास्त्र मंचावर आत्मविश्वासाने भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे आवाहन करत ते म्हणाले, “आपला पाककलेचा वारसा सांस्कृतिक स्मृती आणि प्रादेशिक पद्धती यावर उभारलेला आहे. आपण आपल्या या परंपरांना नवजीवन दिले पाहिजे आणि जगाच्या उत्तमोत्तम खाद्यविश्वात भारताच्या पदचिन्हांचा विस्तार केला पाहिजे.”

एनवायसीसी हा भारतीय पाककला संघटनांचे महामंडळ (आयएफसीए) आणि पर्यटन तसेच आदरातिथ्य कौशल्य मंडळ (टीएचसीसी) यांचा संयुक्त उपक्रम असून ‘भारतीय पाककलाविषयक वारशाचा उत्सव:परंपरा आणि नवोन्मेषाचा मिलाफ’ ही त्याची मुख्य संकल्पना आहे. या उपक्रमातून देशभरात आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्पर्धांनंतर जानेवारी 2026 मध्ये नवी दिल्ली येथील आयएचएम पुसा येथे भव्य अंतिम सोहळा होणार आहे.

विभागीय फेऱ्यांचे वेळापत्रक:

  • उत्तर विभाग : 6 ऑगस्ट 2025, एआयएचएम, चंदीगड
  • पूर्व विभाग: 18 सप्टेंबर 2025, आयएचएम कोलकाता
  • पश्चिम विभाग: नोव्हेंबर 2025, आयएचएम, मुंबई
  • दक्षिण विभाग: 18 डिसेंबर 2025, आयएचएम, कोवालम

मुख्य स्पर्धेसह, एनवायसीसीमध्ये प्रत्येक विभागवार कार्यक्रमस्थळी इयत्ता 11 वी आणि 12 वी तील विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रातील कारकीर्दविषयक जागरुकतेच्या उद्देशाने कार्यशाळा घेण्यात येतील आणि त्यांच्या माध्यमातून आदरातिथ्य क्षेत्रातील अभ्यासक्रमात कमी होत चाललेल्या नोंदणीच्या समस्येवर उपाय शोधणे आणि विद्यार्थ्यांना पाककला क्षेत्रातील  वास्तविक कारकीर्द पर्यायांशी ओळख करून देणे ही उद्दिष्टे साध्य करण्यात येतील.

या कार्यक्रमात बोलताना, पीएचडीसीसीआयच्या पर्यटन समितीचे सह-अध्यक्ष राजन सहगल यांनी एनवायसीसीला भारतीय आहारशास्त्राचा उत्सव साजरा करण्यासाठी उद्योग, शिक्षण आणि युवक यांचे एकत्रीकरण करणारी “चळवळ” असे संबोधन दिले. आयएफसीएचे अध्यक्ष डॉ. शेफ मनजित गिल म्हणाले, “एनवायसीसी ही केवळ एक स्पर्धा नसून ते एक सांस्कृतिक पुनरुज्जीवन आहे. भारताच्या वैविध्यपूर्ण खाद्य वारशाचे जतन तसेच आधुनिकीकरण करण्यासाठीचे हे आवाहन आहे.” 

या कार्यक्रमाला शेफ सुधीर सिबल, शेफ अनिल ग्रोव्हर, राजन बहादूर (टीएचएससी), प्रा.कमल कांत पंत (आयएचएम, पुसा), अमरजित सिंग आहुजा (ला मेरिडीयन) या मान्यवरांसह पीएचडीसीसीआयच्या शालिनी एस.शर्मा उपस्थित होत्या. शालिनी एस शर्मा यांनी या स्पर्धेची तपशीलवार रूपरेषा सादर केली.

देशभरातील आदरातिथ्य विषयाचे शिक्षण देणाऱ्या 130 संस्थांच्या सहभागासह या कार्यक्रमाला, व्हीनस इंडस्ट्रीज, नेस्ले प्रोफेशनल्स, वाघ बकरी टी ग्रुप, क्रिमिका, म’केन फुड्स आणि इतर अनेक उद्योगांसह आघाडीच्या भागीदारांचे पाठबळ लाभले आहे. सदर स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे, अंतर्वासिता, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात प्रदर्शनाच्या संधी तसेच ‘सर्वोत्कृष्ट टिकाऊ अन्नपदार्थ’ सादर करणाऱ्या स्पर्धकाला विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.

For more information, visit:

https://phdccitourismhospitality.in/upcoming-events/phdcci-national-chef-competitio

PHDCCI NYCC Curtain Raiser

 

* * *

सोनल तुपे/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2145304) Visitor Counter : 2