नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
उच्च-कार्यक्षमता आणि कमी किमतीचे सिलिकॉन-पेरोव्हस्काइट टँडम सौर सेल यामधील एनसीपीआरईचे अग्रणी कार्य भारताच्या सौर ऊर्जा भवितव्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवेल: केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
गेल्या 15 वर्षांत, नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने आयआयटी बॉम्बे येथील एनसीपीआरईला भारताच्या महत्त्वाकांक्षी 100 GW सौर मोहिमेसाठी संशोधन आणि विकास व शिक्षणाचे पाठबळ पुरवण्यासाठी 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी दिला आहे
भारत केवळ अपारंपरिक ऊर्जेचा अंगिकार करत नाही, तर पेरोव्हस्काइट सौर सेल, इन्व्हर्टर तंत्रज्ञान, पीव्ही-विश्वासार्हता, हरित हायड्रोजन आणि ऊर्जा साठवणुकीतील संशोधनातून आपले भविष्य घडवत आहे: प्रल्हाद जोशी
Posted On:
15 JUL 2025 7:45PM by PIB Mumbai
मुंबई, 15 जुलै 2025
केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा तसेच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आयआयटी मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर फोटोव्होल्टेइक रिसर्च अँड एज्युकेशन (NCPRE) ला भेट दिली आणि तेथील संशोधक व सल्लागार मंडळाच्या सदस्यांशी संवाद साधला. जोशी यांनी NCPRE येथील पेरोव्हस्काइट टँडम सौर सेल लॅब, सिलिकॉन फॅब लॅबोरेटरी आणि मध्यम व्होल्टेज लॅबोरेटरीला भेट दिली आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधला. आयआयटी-बॉम्बेने इनक्यूबेट केलेल्या अॅडव्हान्स्ड रिन्यूएबल टँडम-फोटोव्होल्टेक्स इंडिया (Advanced Renewable Tandem-Photovoltaics India - ART-PV India) या स्टार्टअपने 2-टर्मिनल मोनोलिथिक सिलिकॉन/कॅडमियम टेल्युराइड-पेरोव्हस्काइट टँडम सौर सेल विकसित केला आहे, ज्याची कार्यक्षमता 29.8% आहे. हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा टप्पा असून, भारतात आतापर्यंत प्राप्त केलेल्या सर्वाधिक कार्यक्षमतेपैकी एक आहे. एनसीपीआरई (NCPRE) 2010 मध्ये आयआयटी बॉम्बे येथे भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या निधीतून सुरू करण्यात आले. भारताच्या महत्त्वाकांक्षी 100 GW सौर मिशनसाठी संशोधन आणि विकास तसेच शैक्षणिक सहाय्य पुरवणे हे एनसीपीआरईचे मुख्य उद्दिष्ट हे आहे. आजपर्यंत, मंत्रालयाने गेल्या 15 वर्षांत आयआयटी बॉम्बे येथील एनसीपीआरईला 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी दिला आहे.

नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय एआरटी-पीव्ही इंडियाला (ART-PV India) $10 दशलक्ष (सुमारे Rs 83 कोटी) इतका निधी देत आहे, जेणेकरून आयआयटी-बी (IIT-B) कॅम्पसमध्ये अत्याधुनिक पथदर्शी उत्पादन सुविधा स्थापन करता येईल. देशांतर्गत बौद्धिक संपदा जोपासण्याच्या आणि भारतीय नवोन्मेष जागतिक बाजारपेठांपर्यंत पोहोचतील हे सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेशी हे सुसंगत आहे. भारताने अक्षय ऊर्जा (RE) क्षेत्रातील नवोन्मेष आणि आत्मनिर्भरतेवर आधारित राहावे यासाठी एमएनआरई धोरणात्मक आणि आर्थिक सहाय्य देत राहील, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले.

पत्रकारांशी संवाद साधताना, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, "नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाला एनसीपीआरईच्या (NCPRE) उच्च-कार्यक्षमतेच्या, कमी किमतीच्या सिलिकॉन-पेरोव्हस्काइट टँडम सौर सेलच्या (Silicon-Perovskite Tandem Solar Cells) अग्रणी उपक्रमाला पाठबळ देताना अभिमान वाटत आहे. हे कार्य भारताच्या सौर ऊर्जा भविष्यात एक आमूलाग्र परिवर्तन घडवणारे आहे." जेव्हा जग कार्यक्षम, परवडणारे आणि प्रमाणबद्ध सौर ऊर्जा उपायांच्या शोधात आहे, अशा वेळी हे नवोन्मेष भारताला नेतृत्व करण्याची संधी देतील, असेही केंद्रीय मंत्री म्हणाले.

या तंत्रज्ञानामध्ये 30% पेक्षा जास्त कार्यक्षमता साध्य करण्याची क्षमता असून ती पारंपरिक सौर पॅनेलपेक्षा खूप जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे भारत भावी पिढीतील फोटोव्होल्टाइक्समध्ये जागतिक नेतृत्व करणारा देश बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशा प्रकारच्या नवनवीन उपक्रमांमध्ये गुंतवणूक करून, आपण सौर ऊर्जेच्या खर्चात कपात घडवून आणत असून, त्यामुळे ती सर्व भारतीयांसाठी अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध होऊ शकेल, असे त्यांनी नमूद केले. ही केवळ प्रयोगशाळांच्या पातळीवरील प्रगती नाही, तर स्वच्छ, विस्तारता येणाऱ्या आणि आत्मनिर्भर ऊर्जा उत्पादनासाठीचा ठोस कृती आराखडा असल्याचे प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. भारत नवीकरणीय उर्जेचा अवलंब करण्यासोबतच, पेरोव्हस्काइट सोलार सेल (perovskite solar cells), इन्व्हर्टर तंत्रज्ञान, पीव्ही- रिलायबिलीटी, हरित हायड्रोजन आणि ऊर्जा साठवणुकीशी संबंधित संशोधनाच्या माध्यमातून आपल्या भविष्याची दिशा निश्चित करत असल्याचे ते म्हणाले.
भारत स्वच्छ ऊर्जा विषयक नवोन्मेषाच्या बाबतीत आघाडीवर राहावा याकरता, आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाअंतर्गत नवीकरणीय ऊर्जा विषयक तंत्रज्ञान अधिक पुढे नेण्यासाठी केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय वचनबद्ध असल्याचे ते म्हणाले. याच अनुषंगाने केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय फोटोव्होल्टेइक (सौर ऊर्जा) संशोधन आणि शिक्षण केंद्र (NCPRE), भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (IIT Bombay) यांसारख्या प्रमुख संस्थांना पाठबळ दिले जात आहे, त्यामुळे देशांतर्गत संशोधन आणि विकासाला बळकटी मिळत आहे, तंत्रज्ञानाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होते आहे आणि स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन मिळत आहे या बाबी त्यांनी नमूद केल्या. नवीकरणीय ऊर्जा संशोधन आणि तंत्रज्ञान विकास (RE-RTD) तसेच संशोधन आणि विकास निधी योजनांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून, केंद्रीय नव आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, राष्ट्रीय फोटोव्होल्टेइक (सौर ऊर्जा) संशोधन आणि शिक्षण केंद्रा (NCPRE) सारख्या संस्थांना प्रयोगशाळेपासून ते प्रत्यक्ष बाजारपेठेपर्यंतची वाटचाल जलद गतीने पूर्ण करण्याचे बळ देत आहे असेही ते म्हणाले. राष्ट्रीय फोटोव्होल्टेइक (सौर ऊर्जा) संशोधन आणि शिक्षण केंद्राचे (NCPRE) आजवरचे काम म्हणजे, सार्वजनिक निधीतून झालेल्या संशोधनाला, धोरणात्मक पाठबळ मिळाल्याने, भारताला स्वच्छ ऊर्जेचे जागतिक केंद्र म्हणून स्थान मिळवता येऊ शकते याचेच उत्कृष्ट उदाहरण असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, संशोधन आणि विकास तसेच व्यावसायिकीकरणासाठी कशा प्रकारे धोरणात्मक पाठबळ देत आहे ही बाबही केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधोरेखित केली. भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या (IIT Bombay), एआरटी पीव्ही (ART PV) विषयक चमूने, पेरोव्हस्काइट टँडम सोलार सेल (Perovskite Tandem Solar Cells) विस्तारीकरणाच्या क्षमतेसह, फायदेशीर देखील असल्याची बाब व्यावसायिक दृष्टीकोनातून मांडावी असे आवाहन त्यांनी केले. प्रगत तंत्रज्ञान उद्योग व्यवसायांसाठी सुलभतेने उपलब्ध करून दिले गेले तर, आपली कार्यक्षमता वाढवण्यासोबतच नवोन्मेष विषयक एक भक्कम परिसंस्था देखील निर्माण करता येईल, असे ते म्हणाले. हा दृष्टिकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या मोठ्या दृष्टिकोनातील पूर्णतः सुसंगत असून, यात भारतीय संशोधन आणि विकासाला जागतिक मानक म्हणून प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट सामावलेले असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळाने केवळ दोन आठवड्यांपूर्वीच संशोधन, विकास आणि नवोन्मेष विषयक योजनेला मंजुरी दिली असून, संशोधन आणि विकासावरील एकूण खर्चासाठी (GERD) 1.27 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदार, राष्ट्रीय फोटोव्होल्टेइक (सौर ऊर्जा) संशोधन आणि शिक्षण केंद्राचे (NCPRE) मुख्य अन्वेषक (Principal Investigator - PI) प्रा. बायलॉन जी. फर्नांडिस आणि एआरटी-पीव्ही इंडियाचे सह-संस्थापक प्रा. दिनेश काबरा हे मान्यवरही उपस्थित होते
* * *
पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/शैलेश/तुषार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2144986)
Visitor Counter : 2