विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतीय वैद्यकीय संघटनेच्या "डॉक्टर्स डे" कार्यक्रमात डॉ. बी.सी. रॉय यांच्या कार्याचा केला गौरव
डॉ. जितेंद्र सिंह यांनी डॉ. बी.सी. रॉय यांच्या काळातील डॉक्टर-रुग्ण यांच्यातील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याचे केले आवाहन
Posted On:
13 JUL 2025 7:23PM by PIB Mumbai
जागतिक स्तरावर ख्याती प्राप्त डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षणाचे अध्वर्यू डॉ. बिधान चंद्र रॉय यांना अभिवादन करताना, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज त्यांच्या कार्याचा संदर्भ देत डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वासाचे नाते पुन्हा प्रस्थापित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. रॉय यांच्या काळात हे विश्वासाचे नाते आरोग्यसेवेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते हे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.

डॉ. जितेंद्र सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून, भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए) या देशव्यापी संस्थेने आयोजित केलेल्या "डॉक्टर्स डे" कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी बोलताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी डॉ. बी.सी. रॉय यांच्या वारशाचा उल्लेख केला आणि वैद्यक व राष्ट्रनिर्माण यामधील त्यांच्या महान योगदानावर प्रकाश टाकला. “डॉ. रॉय यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांच्या सल्ला शुल्क किंवा वैद्यकीय नैतिकतेशी तडजोड न करता समाजामध्ये अढळ विश्वास निर्माण केला होता,” असं ते म्हणाले.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी वैद्यकीय समुदायाला पूर्वीच्या प्रतिष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजाचा विश्वास पुन्हा उंचावण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, डॉक्टरांविषयी बदललेली समाजाची धारणा ही केवळ वैयक्तिक पातळीवरील अपयशामुळे नव्हे, तर मोठ्या प्रमाणावर बदलणाऱ्या सामाजिक मूल्यांमुळे झाली आहे.

आयएमएच्या वारशाचा उल्लेख करताना, ते म्हणाले की, ही संस्था ‘भारतीय आरोग्य व्यवस्थेचा एक आधारस्तंभ’ आहे आणि ही देशातील सर्वात जुनी व सर्वात मोठी वैद्यकीय व्यावसायिकांची संस्था आहे.
स्वतः वैद्यकशास्त्राचे प्रख्यात प्राध्यापक आणि मधुमेह तज्ज्ञ असलेले डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतातील वैद्यक क्षेत्रात होत असलेल्या बदलांविषयी आपले विचार मांडले.
त्यांनी एकेकाळी संसर्गजन्य रोगांचे वर्चस्व असलेल्या काळापासून ते आजच्या काळातील संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांच्या दुहेरी भाराच्या परिवर्तनाकडे लक्ष वेधले, ज्यामुळे भारतीय डॉक्टर आणि संशोधकांसमोर नवी आव्हाने आणि संधी दोन्ही निर्माण झाल्या आहेत, असे सांगितले.

त्यांनी प्रामुख्याने आधुनिक एलोपॅथी औषधोपचार, आयुष प्रणाली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या एकत्रित मिश्रणावर आधारित एक सर्वांगीण, समन्वित आरोग्यसेवा दृष्टिकोन स्वीकारण्याची तत्काळ गरज असल्याचे सांगितले.
त्यांनी दीर्घकालीन आजारांवर प्रभावी उपाय म्हणून योगाचा उल्लेख केला आणि भिन्न वैद्यकीय प्रणालींमधील वेगळेपण दूर करून समन्वय साधण्याचे आवाहन केले. विविध वैद्यकीय पद्धती एकत्र आणण्यासाठी सकारात्मक दृष्टी ठेवणे गरजेचं आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
त्याचबरोवर त्यांनी भारताच्या वैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील वाढती आघाडी स्पष्ट करताना डीएनए लस, जीन थेरपी चाचण्या, स्वदेशी प्रतिजैविक ‘नाफिथ्रोमायसिन’ यासारख्या यशस्वी प्रयोगांचा उल्लेख केला. ते हेही म्हणाले की बायोबँक्स आणि जीनोम रिपॉझिटरीज हे भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
आपल्या भाषणाच्या शेवटी डॉ. जितेंद्र सिंह यांनी डॉक्टरांना आत्मपरीक्षण करण्याचे आणि बदल स्वीकारण्याचे आवाहन केले. आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात जसे की एआय-सहाय्यित शस्त्रक्रिया, रोबोटिक निदान, आणि टेलिमेडिसिन यशस्वी होण्यासाठी “कालबाह्य बाबी मागे टाकत नव्या पद्धती आत्मसात करणे हे अत्यंत आवश्यक आहे" असे मत मांडले.
तसेच, त्यांनी सार्वजनिक आणि खासगी आरोग्यसेवा व्यवस्थांमधील दरी भरून काढण्याचे महत्त्व देखील यावेळी बोलताना अधोरेखित केले.
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2144432)