आयुष मंत्रालय
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत उद्यापासून 'शल्यकॉन २०२५' या तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
१४ जुलै रोजी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती
तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात होणार थेट शस्त्रक्रिया प्रात्यक्षिके, वैज्ञानिक सत्रे तसेच मौखिक व भित्ती चित्रकांचे सादरीकरण
Posted On:
12 JUL 2025 12:30PM by PIB Mumbai
अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, नवी दिल्ली यांच्या वतीने ‘शल्यकॉन २०२५’ या तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, १३ जुलै ते १५ जुलै दरम्यान सुश्रुत जयंतीनच्या औचित्याने हा परिसंवाद होणार आहे. दरवर्षी १५ जुलै रोजी शल्यक्रियेचे जनक आचार्य सुश्रुत यांची जयंती साजरी केली जाते. शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात आचार्य सुश्रुत यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाच्या सन्मानार्थ, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या शल्यतंत्र विभागातील डॉ. योगेश बडवे यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रीय सुश्रुत असोसिएशनच्या २५ व्या वार्षिक परिषदेमध्ये एक शैक्षणिक उपक्रम म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ जुलै रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा; राष्ट्रीय आयुर्वेद संस्था जयपूरचे कुलगुरू प्रा. संजीव शर्मा; आणि आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था जामनगरच्या संचालक प्रा. तनुजा नेसरी हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्था तिच्या स्थापनेपासून जगभरात आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी समर्पित असून, यंदाच्या शल्यकॉन परिसंवादात आयुर्वेदाचे मूलतत्त्वे आणि आधुनिक शस्त्रक्रिया यांचे एकत्रीकरण करण्यावर भर देण्यात येणार असून, उदयोन्मुख आयुर्वेद शल्यचिकित्सकांना एकात्मिक शस्त्रक्रिया आणि त्यासंबंधित आत्मविश्वास वाढवण्यासाठी पुढाकार घेणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या प्रभारी संचालक प्रा. मंजुषा राजगोपाला यांनी म्हंटले आहे. १३ आणि १४ जुलै रोजीच्या चर्चासत्रात थेट शस्त्रक्रिया प्रात्यक्षिके सादर केली जाणार असून , ज्यामध्ये जनरल सर्जरी, गुद-जननेंद्रिय शस्त्रक्रिया आणि मूत्रविकारांवरील शस्त्रक्रिया यांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी, १० सामान्य एंडोस्कोपिक लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केल्या जातील. दुसऱ्या दिवशी सोळा गुद-जननेंद्रिय शस्त्रक्रियांचे थेट प्रात्यक्षिके दिली जातील, ज्यातून सहभागी चिकित्सकांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. नावीन्यता, एकात्मता आणि प्रेरणा या संकल्पनेवर आधारित 'शल्यकॉन २०२५' यातील कार्यक्रम पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम ठरणार आहेत. भारतासह जगभरातून सुमारे ५०० हून अधिक तज्ज्ञ शल्यचिकित्सक, संशोधक, आणि विद्वान या परिसंवादात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात विचारांची देवाणघेवाण, वैद्यकीय प्रगतीचे प्रदर्शन आणि आयुर्वेदिक शस्त्रक्रिया पद्धतींमधील नावीन्यपूर्ण संशोधनाचा शोध घेण्यात येईल.
तीन दिवसांच्या कालावधीत एक विशेष पूर्ण सत्र देखील आयोजित करण्यात आले असून, ज्यामध्ये सामान्य आणि लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया, जखम व्यवस्थापन आणि पॅरा-सर्जिकल तंत्रे, गुद-जननेंद्रिय शल्यचिकित्सा, अस्थी-संधी मर्म चिकित्सा आणि शस्त्रक्रियेतील नवोन्मेष यासारख्या विषयांचा समावेश असेल. शेवटच्या, समारोपाच्या दिवशी २०० हून अधिक मौखिक आणि भित्तिचित्रके सादरीकरण करण्यात येणार असून, त्यामुळे आयुर्वेद शल्यचिकित्सेच्या शास्त्रीय परंपरेत नव्या विचारांची भर पडणार आहे. याशिवाय, परिसंवादात वैज्ञानिक सत्रांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये संशोधक, वैद्यकीय तज्ज्ञ आणि विद्वानांना आपले संशोधन मांडण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक दिवसाच्या सत्रानंतर सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.
***
Y.Rane/R.Dalekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2144205)