सांस्कृतिक मंत्रालय
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारतातील मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीच्या गडकिल्ल्यांचा समावेश , भारतातील हे 44 वे स्थळ आहे
Posted On:
11 JUL 2025 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जुलै 2025
जागतिक वारसा समितीच्या 47 व्या बैठकीत घेण्यात आलेल्या एका उल्लेखनीय निर्णयात, 2024-25 साठी भारताचे अधिकृत नामांकन म्हणून, 'भारताचे मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले ' युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ही मान्यता मिळवणारी भारताची ही 44 वी स्थळे बनली आहेत. ही जागतिक प्रशंसा भारताच्या चिरंतन सांस्कृतिक वारशाचा उत्सव साजरा करते ज्यामधून त्याच्या स्थापत्य प्रतिभेच्या, प्रादेशिक अस्मितेच्या आणि ऐतिहासिक सातत्यतेच्या विविध परंपरा प्रदर्शित होतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऐतिहासिक यशाचे कौतुक केले आणि या कामगिरीबद्दल भारतातील जनतेचे अभिनंदन केले.

भारतातील मराठा लष्करी साम्राज्य
17 ते 19 व्या शतकापर्यंत विस्तारलेले बारा किल्ल्यांचे हे अभूतपूर्व जाळे मराठा साम्राज्याचा धोरणात्मक लष्करी दृष्टीकोन आणि स्थापत्य कौशल्याचे दर्शन घडवते.

Sindhudurg Fort
जानेवारी 2024 मध्ये जागतिक वारसा समितीकडे हा प्रस्ताव विचारार्थ पाठवण्यात आला होता आणि सल्लागार संस्थांसोबत अनेक तांत्रिक बैठका आणि स्थळांचा आढावा घेण्यासाठी आयकोमॉसच्या मोहिमेने दिलेल्या भेटी नंतर अठरा महिन्यांच्या कठोर प्रक्रियेनंतर, जागतिक वारसा समितीच्या सदस्यांनी आज संध्याकाळी पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात हा ऐतिहासिक निर्णय घेतला.
महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्यांमध्ये विस्तारलेल्या निवडक स्थळांमध्ये महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग तसेच तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.

Raigad Fort

Pratapgad Fort
सागरी किनारे ते डोंगरावरील किल्ल्यांपर्यंत विविध भूभागांमध्ये वसलेल्या किल्ल्यांच्या बांधणीवरून मराठा साम्राज्याच्या एकत्रित लष्कराचे परिदृश्य तयार होते. भारतातील तटबंदी परंपरांच्या नावीन्यपूर्ण आणि प्रादेशिक अनुकूलतेवर या किल्ल्यांची बांधणी प्रकाश टाकते.

साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, राजगड आणि जिंजी हे डोंगराळ प्रदेशात वसलेले किल्ले आहेत आणि म्हणूनच त्यांना डोंगरी किल्ले म्हणून ओळखले जाते. घनदाट जंगलात वसलेला प्रतापगड याचे डोंगरी-वन किल्ला म्हणून वर्गीकरण केले जाते. पठारावरील टेकडीवर स्थित पन्हाळा हा डोंगरी-पठारावरचा किल्ला आहे. किनाऱ्यालगत असलेला विजयदुर्ग हा एक उल्लेखनीय किनारी किल्ला आहे. तर समुद्राने वेढलेले खांदेरी, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे बेटावरचे किल्ले म्हणून ओळखले जातात.

Gingee Fort
फ्रान्समधील पॅरिस येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 47 व्या अधिवेशनात यासंबंधीचा मजकूर तयार करण्यात आला. हा एक भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाला मिळालेल्या जागतिक मान्यतेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

वारसा समितीच्या बैठकीत, 20 पैकी 18 पक्षांनी या महत्त्वाच्या स्थळाला यादीत समाविष्ट करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. या प्रस्तावावरील चर्चा 59 मिनिटे चालली आणि 18 सकारात्मक शिफारशींनंतर, सर्व सदस्य राष्ट्रे, युनेस्को, जागतिक वारसा केंद्र आणि युनेस्कोच्या सल्लागार संस्था (ICOMOS, IUCN IUCN) यांनी, या महत्त्वपूर्ण संधीबद्दल भारतीय शिष्टमंडळाचे अभिनंदन केले.
ही जागतिक मान्यता म्हणजे जागतिक व्यासपीठावर भारताच्या वारशाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी नवीन भारताच्या अथक प्रयत्नांचा दाखला आहे. ही मान्यता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि महाराष्ट्र सरकारच्या या ऐतिहासिक खजिन्याच्या जतनासाठी केलेल्या प्रयत्नांना अधोरेखित करते.
गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 46व्या बैठकीत आसाममधील चराईदेव येथील मोईदम्सना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले होते.
जागतिक स्तरावर सर्वाधिक जागतिक वारसा स्थळांमध्ये भारत सहाव्या क्रमांकावर आहे, तर आशिया-पॅसिफिक क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 1972 च्या जागतिक वारसा अधिवेशनाला 196 देशांनी मान्यता दिली आहे.
जागतिक वारसा यादीच्या तात्पुरत्या यादीत भारताची 62 स्थळे आहेत. ही यादी भविष्यात कोणत्याही स्थळाला जागतिक वारसा मालमत्ता म्हणून मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक आहे. दरवर्षी प्रत्येक देश केवळ एकच स्थळ जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी जागतिक वारसा समितीसमोर प्रस्तावित करू शकतो.
भारत सरकारच्या वतीने, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ही देशातील सर्व जागतिक वारसा संबंधित बाबींसाठी नोडल संस्था आहे.
N.Chitale/S.Kane/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2144165)