सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
भारतीय संकेतभाषा संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे नवी दिल्लीत ‘भारतीय संकेतभाषेचा वापर करून कर्णबधिर विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याच्या सर्वोत्तम पद्धती’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
Posted On:
11 JUL 2025 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जुलै 2025
‘भारतीय संकेतभाषेचा (आयएसएल) वापर करून कर्णबधिर विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याच्या सर्वोत्तम पद्धती’ या विषयावर आधारित दोन दिवसीय ऑफलाइन राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन "भारतीय संकेतभाषा संशोधन व प्रशिक्षण केंद्र" (आयएसएलआरटीसी) यांनी 10 - 11 जुलै 2025 रोजी नवी दिल्लीत केले होते. आयएसएलआरटीसी ही संस्था सामाजिक न्याय आणि सशक्तिकरण मंत्रालयाच्या अपंग व्यक्ती सशक्तीकरण विभाग (डीईपीडबल्यूडी) अंतर्गत कार्यरत एक स्वायत्त संस्था आहे.

या कार्यशाळेचे उद्घाटन डीईपीडबल्यूडीचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते झाले. आपल्या भाषणात सचिवांनी भारतीय संकेतभाषेचे महत्त्व अधोरेखित केले, विशेषतः ती कर्णबधिर व्यक्तींची पहिली भाषा असल्याचे सांगताना, त्यांच्या बौद्धिक आणि शैक्षणिक विकासात या भाषेची अत्यंत मोलाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कर्णबधिर व्यक्तींना भविष्यातील संधी वाढवण्यासाठी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांचा पूर्ण समावेश साधण्यासाठी इंग्रजी भाषा कौशल्य विकसित करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. शिवाय, साक्षरता आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचेही त्यांनी आवाहन केले.
या कार्यशाळेत अनुभवी संसाधन व्यक्तींच्या सादरीकरणांबरोबरच संवादात्मक सत्रांचाही समावेश होता.

सादरीकरणांमध्ये व्यावहारिक रणनीती, द्विभाषिक पद्धती, आणि सांस्कृतिकदृष्ट्या समर्पक अध्यापन पद्धती यांवर भर देण्यात आला, जे कर्णबधिर विद्यार्थ्यांचे इंग्रजी साक्षरतेतून शिक्षण अधिक प्रभावी बनवण्यासाठी आयएसएलचा वापर कसा करावा यावर केंद्रित होते. त्याचबरोवर सहभागी सदस्यांनी गट चर्चांमध्ये उत्साहाने भाग घेतला आणि या सत्रांमध्ये मांडलेल्या विचारांवर चिंतन करून वर्गातील अध्यापन सुधारण्यासाठी प्रभावी उपाय शोधले. विशेष शिक्षक, आयएसएल प्रशिक्षक, आणि देशभरातील कर्णबधीरांसाठी असलेल्या शाळांमधील शिक्षक यांच्याकडून या चर्चांमध्ये समृद्ध आणि रचनात्मक सहभाग मिळाला.
N.Chitale/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2144141)