सांस्कृतिक मंत्रालय
सारनाथ येथे आषाढ पौर्णिमा झाली मोठ्या भक्तीभावाने साजरी : भगवान बुद्धांच्या पहिल्या उपदेशाचा सन्मान
Posted On:
10 JUL 2025 10:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2025
आकाशात संध्याकाळी पसरलेला संधिप्रकाश आणि आषाढ पौर्णिमेच्या पवित्र चंद्रांच्या चांदण्याने उजळलेली सारनाथची ऐतिहासिक भूमी अशा वातावरणात, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाने (IBC), भारत सरकारचे संस्कृती मंत्रालय आणि महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाच्या सहकार्याने, आषाढ पौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली. याच दिवशी भगवान बुद्धांनी याच स्थानावर आपला पहिला उपदेश दिला असल्याने हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून ओळखला जातो.
या दिनाचे औचित्य साधून, सारनाथ येथील पूज्य मूलगंध कुटी विहार येथे एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभाला जगभरातील पूजनीय भिक्खू, विद्वान आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासोबतच 'वर्षावासा'चाही म्हणजेच बौद्ध भिक्खूंसाठी असलेल्या पारंपरिक पावसाळी मठ-वास्तव्याचा प्रारंभ झाला. हा काळ आत्मपरीक्षण, शिस्त आणि आध्यात्मिक विकासाचा मानला जातो.
या कार्यक्रमाची सुरुवात धामेक स्तूपाभोवती केलेल्या परिक्रमेने (प्रदक्षिणा) झाली. भिक्खू, भिक्खुणी आणि सामान्य भाविक शांतपणे आणि आदराने स्तूपाभोवती चालले होते. अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेला तो स्तूप, भगवान बुद्धांच्या शिकवणीच्या चिरंतन प्रतिध्वनीचा साक्षीदार म्हणून उभा होता.
हा औपचारिक कार्यक्रम मूलगंध कुटी विहाराचे प्रभारी,आदरणीय सुमित्तनंद थेरो यांच्या स्वागतपर भाषणाने सुरू झाला. त्यांनी सारनाथच्या शतकानुशतके धम्माचे जतन करत असलेले पावित्र्य आणि शांततेवर विचार व्यक्त केले.
व्हिएतनामच्या ज्येष्ठ भिक्खुणी आदरणीय डियू त्रि यांनी व्हिएतनाममधील बुद्धांच्या नुकत्याच झालेल्या अवशेष प्रदर्शनाबद्दल भावनोत्कट विचार व्यक्त केले, ज्या प्रदर्शन कार्यक्रमात नऊ शहरांमध्ये 17.8 दशलक्ष भाविकांनी आदरांजली वाहिली.
केंद्रीय उच्च तिबेटी अभ्यास संस्थेचे कुलगुरू, आदरणीय वांगचुक दोरजी नेगी यांनी धम्मातील ज्ञान आणि आचरण यांच्यातील सखोल परस्परसंबंधांवर आणि आषाढ पौर्णिमेनिमित्त बुद्धांच्या पहिल्या उपदेशापासून ते भिक्खू संघाच्या स्थापनेपर्यंतच्या घटनांच्या प्रतीकात्मक एकात्मिकतेवर अंतर्दृष्टीपूर्ण विचार मांडले.
भारत-श्रीलंका आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेचे अध्यक्ष, पूज्य सुमेध थेरो यांनी या उत्सवासाठी सारनाथसारख्या सखोल ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या स्थळाची निवड केल्याबद्दल भारत सरकारचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी बुद्धमार्गाच्या सामायिक प्रकाशाने शतकानुशतके जोपासले गेलेल्या भारत आणि श्रीलंकेमधील चिरस्थायी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संबंधांवर भर दिला.
या कार्यक्रमाचा समारोप आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाचे सरचिटणीस, शारत्से खेनसूर जांगचूप चोएदेन रिंपोचे यांच्या प्रभावी भाषणाने झाला. त्यांनी बौद्ध एकतेचे आणि आंतरधर्मीय सलोख्याचे जागतिक ध्येय पुन्हा अधोरेखित केले, शांततापूर्ण जगाच्या स्थापनेसाठी सहानुभूतीपूर्ण आणि समावेशक संवादाचे आवाहन केले.
सारनाथमधील आषाढ पौर्णिमेच्या या सोहळ्याने बुद्धांच्या कालातीत शिकवणीचा प्रतिध्वनी पुन्हा एकदा घुमला आणि त्याने जगाला विद्वत्ता, करुणा आणि जागरूक सहअस्तित्वाच्या मार्गावर चालण्यासाठी आमंत्रित केले.
***
N.Chitale/S.Patil/P.Malndkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143897)