दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ग्रामीण डाक सेवक हे ग्रामीण भारतातील सेवा विस्ताराचे आधारस्तंभ – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया; बंगळुरू जीडीएस संमेलनात टपाल कार्यालयांना ‘नागरी केंद्र’ म्हणून रुपांतर करण्याची मांडली संकल्पना
Posted On:
10 JUL 2025 5:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2025
केंद्रीय दूरसंचार आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया यांनी कर्नाटकात बंगळुरू इथे झालेल्या ग्रामीण डाक सेवक संमेलनात उपस्थितांना संबोधित करत भारतीय टपाल सेवेच्या भविष्यासाठी एक ठळक दृष्टीकोन मांडला.
भारतीय टपाल सेवेचे व्यापक जाळे अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, जगात भारतीय टपाल खात्यासारखे दुसरे कोणतेही वितरण माध्यम इतके व्यापक नाही. देशाची1.64 लाख टपाल कार्यालये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि भरुचपासून धर्मनगरपर्यंत पसरली आहेत.
फोटो ओळ – कर्नाटकात बंगळुरू इथे जीडीएस संमेलनात ग्रामीण टपाल सेवकांना संबोधित करताना केंद्रीय संवाद मंत्री
सिंदिया यांनी टपाल परिवाराशी असलेल्या आपुलकीच्या नात्याचा उल्लेख करून हे केवळ खाते नसून कुटुंब असल्याचे सांगितले.
फोटो ओळ – टपाल वितरण कर्मचाऱ्यासोबत एका आनंददायी क्षणी केंद्रीय मंत्री
प्रत्येक कामगार स्वतःहून मिशनमध्ये सहभागी होतो तेव्हाच खरा परिवर्तनात्मक बदल घडतो, यावर सिंदिया यांनी ग्रामीण डाक सेवकांशी बोलताना भर दिला. ग्रामीण भागातील प्रत्येक गावात डाक सेवक विश्वासाचे खरे स्तंभ आहेत आणि ते प्रत्येक घराशी भावनिकदृष्ट्या जोडलेले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा दृष्टिकोन ठळकपणे मांडत त्यांनी सांगितले की टपाल कार्यालये अधिक नागरिक-केंद्रित व्हावीत यासाठी पुनर्रचना व्हायला हवी, तसेच ग्रामीण भारतात टपाल कार्यालये सुलभ, आधुनिक आणि सेवा समृद्ध करत प्रशासनाचे मुख्य द्वार ठरावीत यासाठीच्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
फोटो ओळ - विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ग्रामीण डाक सेवकांचा गौरव करताना केंद्रीय मंत्री
संमेलनाचा समारोप करताना, केंद्रीय मंत्र्यांनी टपाल परिवारातील प्रत्येक सदस्याला परिवर्तनाचे माध्यम होण्याचे आवाहन केले. ग्रामीण विकासाच्या घडामोडीत टपाल कार्यालयांची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी अधोरेखित केली. तसेच, टपाल कार्यालयांना सामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणाऱ्या अत्यावश्यक सेवा केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याचे स्वप्न मांडले.
ऊर्जा आणि आत्मविश्वासासह टपाल परिवाराने या आव्हानाला सामोरे जाण्याचे आवाहन सिंदिया यांनी केले तेव्हा या मिशनला पुढे नेण्याची शपथ घेत उपस्थित सेवकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
समाज माध्यम लिंक –
N.Chitale/R.Bedekar/P.Malndkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143878)