वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताने सौर ऊर्जा क्षमतेत 4,000% वाढ साध्य केली; केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल


आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी भारताने ऊर्जा क्षेत्रात पुरवठा साखळीत लवचिकता आणली पाहिजे : पीयूष गोयल

Posted On: 10 JUL 2025 8:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जुलै 2025


केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे 11 व्या इंडिया भारत उर्जा साठवणूक सप्ताह 2025 ला संबोधित केले. भारताच्या स्थापित सौर ऊर्जा क्षमतेत 4,000% वाढ झाली आहे आणि देशाची अक्षय ऊर्जा क्षमता आता अतिशय भक्कम 227 GW वर पोहोचली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पॅरिस करारानुसार आपले राष्ट्रीय निर्धारित योगदान  पूर्ण करणारा भारत हा G20 देशांमधील कदाचित पहिला देश असेल, असे त्यांनी सांगितले. 

गोयल यांनी जम्मू-काश्मीरमधील पल्ली गावाचे उदाहरण दिले, जे गाव सौर ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमतेचा वापर करून भारताची  पहिली कार्बन-न्यूट्रल पंचायत बनले आहे.

गेल्या दशकातील भारताच्या उत्पादन क्षेत्रातील प्रगती अधोरेखित करताना, गोयल म्हणाले की, देशाची सौर फोटोव्होल्टिक मॉड्यूल क्षमता जवळजवळ 38-पट वाढली आहे, तर फोटोव्होल्टिक  सेल  क्षमतेत 21-पट वाढ झाली आहे. त्यांनी पीएम सूर्य घर योजनेचाही उल्लेख केला, जिचे 1 कोटी घरांना छतावरील सौर पॅनेल  बसवून त्यांना ऊर्जा आत्मनिर्भर करणे आणि विजेची बिले कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.

भारत ऊर्जा स्वयंपूर्ण होण्याच्या एका केंद्रित मार्गावर आहे. देशाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी, चोवीस तास अक्षय ऊर्जा स्रोतांद्वारे देशाला ऊर्जा पुरवण्याचा भारताचा उद्देश आहे, यावर त्यांनी भर दिला.

मंत्र्यांनी साठवण तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर भर दिला – मग ते बॅटरीज, पंप्ड स्टोरेज, हायड्रो स्टोरेज किंवा भूऔष्णिक असो – हे सर्व भारताच्या भविष्यातील ऊर्जा मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहेत, असे त्यांनी सांगितले. ऊर्जा क्षेत्र हे भारताच्या स्वच्छ आणि अक्षय ऊर्जा स्रोतांच्या दिशेने होणाऱ्या संक्रमणामध्ये एक प्रेरक शक्ती असेल, आणि हा दृष्टीकोन गेल्या दशकातील देशाच्या कामगिरीमध्ये आधीच दिसून आला आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

पंम्प स्टोरेज आणि बॅटरी प्रणाली यांसारखे ऊर्जा साठवणुकीचे विविध प्रकार, तसेच अणुऊर्जा, स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला पाठबळ देतील यावर भर दिला. त्यांनी या मोहिमेत हितधारकांची महत्त्वपूर्ण भूमिका असेल यावरही भर दिला.

भारताची ऊर्जा आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी एक व्यापक 'चार-सूत्री' दृष्टिकोन मांडताना, केंद्रीय मंत्री  पीयूष गोयल यांनी लक्ष्यित नवोन्मेष, पायाभूत सुविधांचा विकास, पुरवठा साखळीची लवचिकताआणि समग्र मूल्य साखळी वाढीची गरज असल्याचे सांगितले. भारताने पुढील पिढीतील बॅटरी केमिस्ट्री, सॉलिड-स्टेट आणि हायब्रिड साठवण तंत्रज्ञान, तसेच चक्राकार पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करून ऊर्जा साठवणुकीच्या संशोधन आणि विकासामध्ये नेतृत्व केले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.

मंत्र्यांनी हितधारकांना आपले कार्य वाढवण्यासाठी आणि स्पर्धात्मकता  बळकट करण्यासाठी नवीन संधी शोधण्याचे आवाहन केले. त्यांनी 2030 पर्यंत 500 गिगावॉट अक्षय ऊर्जा क्षमता प्राप्त करण्याच्या भारताच्या उद्दिष्टाचा पुनरुच्चार केला आणि या प्रवासात ऊर्जा साठवणूक केंद्रीय भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला.

भारत उर्जा साठवणूक सप्ताह  हा ऊर्जा साठवणूक, ई-मोबिलिटी, बॅटरी उत्पादन  आणि हरित  हायड्रोजनच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणारा एक प्रमुख औद्योगिक कार्यक्रम आहे. या 11 व्या आवृत्तीमध्ये भारताच्या ऊर्जा संक्रमणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नवनवीन कल्पना आणि धोरणात्मक घडामोडींवर विचारमंथन करण्यासाठी जागतिक नेते, धोरणकर्ते, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील हितधारक एकत्र आले. हा कार्यक्रम राष्ट्रीय ऊर्जा ध्येयांशी सुसंगत संवाद, भागीदारी, संशोधन आणि विकास कौशल्य विकास  आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाला चालना देत आहे.

                  
N.Chitale/S.Patil/P.Malndkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2143867) Visitor Counter : 4