नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
केंद्र सरकारने आय आर ई डी ए अर्थात भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेला कलम 54EC कर लाभ दर्जा प्रदान केला
Posted On:
10 JUL 2025 3:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2025
अर्थमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्था लिमिटेड (IREDA) द्वारे जारी केलेल्या बाँडना आयकर कायदा, 1961 च्या कलम 54EC अंतर्गत 'दीर्घकालीन निर्दिष्ट मालमत्ता' म्हणून अधिसूचित केले आहे. ही अधिसूचना 9 जुलै 2025 पासून लागू झाली.
या अधिसूचनेनुसार, पाच वर्षांनी परतफेड करता येणारे आणि अधिसूचनेच्या तारखेला किंवा त्यानंतर आय आर ई डी ए द्वारे जारी केलेले बाँड आयकर कायदा, 1961 च्या कलम 54EC अंतर्गत कर सूट लाभांसाठी पात्र असतील, या कलमा अंतर्गत विशिष्ट बाँडमधील दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील करात सूट मिळते. जे प्रकल्प कर्ज फेडण्यासाठी राज्य सरकारांवर अवलंबून न राहता त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नातून कर्जाची परतफेड करू शकतील केवळ अशा अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी या बाँडमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग केला जाणार आहे.
पात्र गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात या बाँडमध्ये गुंतवणूक करून 50 लाख रुपयांपर्यंतच्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर (LTCG) कर वाचवू शकतात. या प्रक्रियेत निधीसाठी कमी खर्च करावा लागल्यामुळे आय आर ई डी ए ला फायदा होईल अशी अपेक्षा असून हा नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा असेल, त्यामुळे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राच्या जलद विकासाला पाठबळ मिळेल.
या अधिसूचनेचे स्वागत करताना, आयआरईडीएचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास म्हणाले की “या महत्त्वपूर्ण धोरणात्मक उपक्रमाबद्दल आम्ही अर्थ मंत्रालय, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे मनापासून आभारी आहोत. सरकारकडून मिळालेल्या या मान्यतेमुळे देशात अक्षय ऊर्जा वित्तपुरवठा वाढवण्यात आयआरईडीएची महत्त्वाची भूमिका अधिक दृढ होते. आमच्या बाँड्सना करमुक्त दर्जा दिल्यामुळे गुंतवणुकीसाठी आकर्षक संधी उपलब्ध होतील तसेच त्याचबरोबर हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी भांडवलाची उपलब्धता वाढेल, ज्यामुळे 2030 पर्यंत 500 गिगावॅट बिगर जीवाष्म इंधन क्षमता निर्मितीच्या भारताच्या उद्दिष्टाला देखील योगदान मिळेल.”
या निर्णयामुळे करबचत करणारी साधने शोधणाऱ्या गुंतवणूकदारांचा सहभाग अधिक सर्वसमावेशक होईल आणि देशातील नवीकरणीय ऊर्जा वित्तपुरवठा परिसंस्था मजबूत होईल अशी अपेक्षा आहे.
Jaydevi PS/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143703)
Visitor Counter : 3