आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते दिल्लीत आरोग्य सेवा अधिकारी आणि वैद्यकीय सहाय्यक कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप; आयुष्मान भारत नोंदणी वाहनांना हिरवा झेंडा
Posted On:
06 JUL 2025 3:35PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे दिल्लीत आरोग्य सेवा अधिकारी आणि वैद्यकीय सहाय्यक कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. यावेळी उपस्थित असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आयुष्मान भारत नोंदणी व्हॅन्सना हिरवा झेंडा दाखवला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नड्डा म्हणाले, “हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे कारण आज 15 वर्षांनंतर आपल्या आरोग्य सेवा अधिकारी आणि वैद्यकीय सहाय्यक कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. याद्वारे दिल्ली सरकार आरोग्य क्षेत्राला बळकटी देण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ भरती करत आहे.”
आयुष्मान भारत नोंदणी वाहन उपक्रमाचे कौतुक करताना नड्डा म्हणाले, “सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष प्रकारे तयार केलेल्या 70 व्हॅन चालवण्याचा हा अभिनव उपक्रम आहे, ज्यामाध्यमातून पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सेवा उपलब्ध होईल. आज 20 फिरत्या व्हॅन्सना झेंडा दाखवून रवाना करण्यात आले आहे. अशा 70 व्हॅन्स 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन, लाभार्थ्यांची माहिती गोळा करतील आणि त्यांच्याकडेच जाऊन त्यांची नोंदणी करून त्यांना आयुष्मान पत्र देण्यासाठी प्रक्रिया करतील.”

नड्डा यांनी आरोग्य व्यवस्थेमधील आरोग्यसेवा अधिकारी व वैद्यकीय सहाय्यक कर्मचाऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले आणि नव्याने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना आरोग्य योजना अंमलात आणताना समर्पण आणि सहानुभूतीने काम करण्याचे आवाहन केले.

सर्व संबंधित घटकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, एनसीटी दिल्लीच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिल्ली अधिनस्त सेवा निवड मंडळ ( डीएसएसएसबी) मार्फत निवड झालेल्या 1,388 आरोग्य सेवा अधिकारी आणि 41 वैद्यकीय सहाय्यक अधिकाऱ्यांना नियुक्तीचे प्रस्ताव दिले आहेत. यापैकी आत्तापर्यंत 1,270 उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारली असून त्यांची कागदपत्र तपासणी प्रक्रिया सध्या सुरू आहे.

3 जुलै 2025 पर्यंत 557 आरोग्य सेवा अधिकारी आणि 20 वैद्यकीय सहाय्यक अधिकाऱ्यांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली आहे. ही भरती मोहीम दिल्लीतील रुग्णालयांमधील आरोग्यसेवा अधिकारी व वैद्यकीय सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर मोठ्या प्रमाणात उपाय ठरण्याची अपेक्षा आहे. यासोबतच, निवृत्ती, पदोन्नती व नवीन पदनिर्मितीमुळे, निर्माण होणाऱ्या डॉक्टर, आरोग्यसेवा व वैद्यकीय सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या पदांची आणि भावी रिक्त पदांचीही पूर्तता करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. हे सर्व उपक्रम पुढाकाराने आणि समांतरपणे राबवले जात आहेत.

***
S.Patil/N.Gaikwad/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2142718)