युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
देशाच्या सर्वांगिण विकासासाठी खेळाच्या ताकदीला जोपासण्याचा नवा संकल्प
Posted On:
01 JUL 2025 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 ला मंजुरी देण्यात आली. देशाच्या क्रीडा क्षेत्राला नव्याने दिशा देण्यासाठी आणि खेळाद्वारे नागरिकांना सक्षम बनवण्याच्या दिशेने केंद्र सरकारने टाकलेले हे म्हत्वाचे पाऊल ठरले आहे.
विद्यमान राष्ट्रीय क्रीडा धोरण, 2001 च्या जागी हे नवे धोरण लागू केले जाईल. या धोरणातून भारताला जागतिक क्रीडा शक्ती बनवण्यासाठी आणि 2036 च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसह आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी एक दूरदर्शी आणि धोरणात्मक मार्गदर्शक आराखडा मांडला आहे.
केंद्र सरकारने आपली विविध मंत्रालये, नीती आयोग, राज्य सरकारे, राष्ट्रीय क्रीडा महासंघ, खेळाडू, क्रीडा क्षेत्रातील तज्ञ आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागधारकांसोबत तपशीलवार विचारमंथन केल्यानंतरच राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 तयार केले. हे धोरण पाच मुख्य स्तंभांवर आधारलेले आहे :
1. जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी
या स्तंभाचे उद्देश पुढीलप्रमाणे:
- तळागाळापासून ते उच्च स्तरापर्यंत छोट्या वयातच प्रतिभेचा शोध घेणे आणि त्यांची जडणघडण करण्याच्या यंत्रणेसह क्रीडा कार्यक्रमांना बळकटी देणे.
- स्पर्धात्मक लीग आणि विविध स्पर्धांना प्रोत्साहन देणे, तसेच ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील क्रीडा विषयक पायाभूत सुविधांचा विकास करणे.
- प्रशिक्षण, कोचिंग आणि खेळाडूंना सर्वंकष पाठबळ देण्यासाठी जागतिक दर्जाची व्यवस्था घडवणे.
- राष्ट्रीय क्रीडा महासंघांची क्षमता आणि प्रशासनात सुधारणा घडवून आणणे.
- खेळाडूंची कामगिरी उंचवण्यासाठी क्रीडा विज्ञान, क्रीडा औषधशास्त्र आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याला प्रोत्साहन देणे.
- प्रशिक्षक, तंत्रज्ञान विषयक अधिकारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसह क्रीडा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्यात सुधारणा घडवून आणणे.
2. आर्थिक विकासासाठी क्रीडा
राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 अंतर्गत खेळांच्या आर्थिक क्षमतेची दखल घेतली गेली असून, त्याअनुषंगाने खाली नमूद उद्दिष्टे समोर ठेवली आहेत:
- क्रीडा पर्यटनाला चालना देणे आणि भारतात प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणे.
- क्रीडा विषयक उत्पादन परिसंस्थेला बळकटी देणे आणि या क्षेत्रातील स्टार्टअप्स तसेच उद्योजकतेला प्रोत्साहन देणे.
- सार्वजनिक खाजगी क्षेत्राची भागीदारी, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायिक्तव आणि कल्पक निधी उभारणी उपक्रमांच्या माध्यमातून खाजगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन देणे.
3. सामाजिक विकासासाठी क्रीडा
या धोरणात सामाजिक समावेशन घडवून आणण्याच्या प्रक्रियेतील खेळांच्या भूमिकेवर भर दिला आहे:
- महिला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, आदिवासी समुदाय आणि दिव्यांग व्यक्तींवर भर असलेल्या विशिष्ट उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा सहभाग वाढवणे.
- स्वदेशी आणि पारंपरिक खेळांचे पुनरुज्जीवन करणे आणि या खेळांना चालना देणे.
- शिक्षणात खेळांचे एकात्मिकीकरण घडवून आणत, खेळात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देत, आणि कारकिर्दीसाठी दुहेरी मार्ग खुले करत क्रीडा क्षेत्र देखील कारकिर्द घडवण्याचा एक व्यवहार्य पर्याय असल्याच्या अनुषंगाने या क्षेत्राची जडणघडण करणे.
- खेळांच्या माध्यमातून परदेशातील भारतीय समुदायासोबत जोडले जाणे.
4. क्रीडा क्षेत्राला लोकचळवळीचे स्वरुप देणे
खेळांना राष्ट्रीय चळवळ बनवण्यासाठी, या धोरणाअंतर्गत खाली नमूद उद्दिष्टे समोर ठेवली आहेत:
- देशव्यापी मोहिमा आणि समुदाय आधारित कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोक सहभाग आणि शारिरीक तंदुरुस्तीची संस्कृती रुजवणे.
- शाळा, महाविद्यालये आणि कामाची ठिकाणे या आणि अशा ठिकाणी शारिरीक तंदुरुस्तीविषयक निर्देशांकांचा प्रारंभ करणे.
- सार्वत्रिकपणे आणि सर्वांसाठी क्रीडा सुविधा उपलब्ध असतील अशा रितीने या सुविधांचा विस्तार करणे.
5. शिक्षणासोबत एकात्मिकीकरण (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020)
हे राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शी सुसंगत असावे या हेतूने या धोरणाअंतर्गत खाली नमूद बाबी प्रस्तावित केल्या आहेत:
- खेळांचे शालेय अभ्यासक्रमांसोबत एकात्मिकरण घडवून आणणे.
- क्रीडा शिक्षण आणि त्याबद्दलची जागरूकता वाढवण्यासाठी शिक्षक आणि शारीरिक शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देणे.
6. धोरणात्मक आराखडा
या धोरणाच्या निमित्ताने समोर ठेवलेली उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी,राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 अंतर्गत या धोरणाच्या सर्वसमावेशक अंमलबजावणीची रुपरेषाही मांडली आहे. यात खाली नमूद मुद्यांचा अंतर्भाव केला आहे:
- प्रशासन: क्रीडा प्रशासनासाठी कायदेशीर चौकटीसह एक मजबूत नियामक चौकट स्थापित करणे.
- खाजगी क्षेत्राद्वारे निधी आणि पाठबळ: निधी उभारणीचे कल्पक उपक्रम राबवून सार्वजनिक खाजगी क्षेत्राची भागीदारी, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायिक्तव अशा माध्यमातून खाजगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन देणे.
- तंत्रज्ञान आणि नवोन्मेष: कामगिरीच्या आढावा आणि मूल्यमापनासाठी, या क्षेत्रातील संशोधनासाठी आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा ॲनालिटिक्स यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेणे.
- राष्ट्रीय देखरेख आराखडा: सुस्पष्ट निकष, कार्यप्रदर्शन विषयक प्रमुख निर्देशक आणि कालमर्यादेअंतर्गत निश्चित ध्येय उद्दिष्टाचा अंतर्भाव असलेला एक राष्ट्रीय आराखडा तयार करणे.
- राज्यांसाठी आदर्श प्रारुप धोरण: राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 हे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एक आदर्श प्रारुप म्हणून काम करेल. या धोरणामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आपल्या स्वतःच्या धोरणांना राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत स्वरुप देण्याच्या उद्देशाने त्यात सुधारणा घडवून आणणे किंवा अशी नवी धोरणे तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
- संपूर्ण - सरकार हाच दृष्टिकोन: या धोरणाच्या माध्यमातून सर्व मंत्रालये आणि विभागांच्या क्रिया प्रक्रिया, योजना आणि कार्यक्रमांमध्ये क्रीडा विषयक प्रोत्साहनपर क्रिया प्रक्रियांचे एकात्मिकीकरण घडवून आणण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सर्वांगीण परिणाम साधणे शक्य होणार आहे.
या धोरणाचा नियोजनबद्ध संरचित दृष्टीकोन आणि त्यातल्या दूरगामी रणनितीमुळे राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 भारताला जागतिक पातळीवर क्रीडा क्षेत्रातील एक आघाडीचा देश म्हणून स्थान मिळवून देण्याच्या परिवर्तनकारी मार्गावर घेऊन जाण्यासाठी तसेच, अधिक निरोगी, सहभागासाठी अधिक उत्साही आणि सक्षम नागरिकांची जडणघडण करण्यासाठी सज्ज झाले आहे.
* * *
S.Kane/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2141370)