पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य श्री विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला संबोधित केले
भारत ही जगातील सर्वात प्राचीन जिवंत सभ्यता आहेः पंतप्रधान
भारत एक सेवाभावी देश आहे, मानवतावादी देश आहेः पंतप्रधान
आमच्या सरकारने प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहेः पंतप्रधान
भारताच्या प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायजेशन करण्यासाठी आम्ही एक मोहीम राबवत आहोतः पंतप्रधान
आपल्या सांस्कृतिक वारशाला अधिक समृद्ध करण्यासाठी अशा प्रकारची आणखी मोठी कार्ये करण्याची गरज आहेः पंतप्रधान
आमचे सर्व प्रयत्न सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या मंत्राद्वारे लोक सहभागाच्या भावनेने असतील
Posted On:
28 JUN 2025 1:18PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 28 जून 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आचार्य श्री विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला संबोधित केले.
पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की देश भारताच्या आध्यात्मिक परंपरेतील एका महत्त्वाच्या प्रसंगाचा साक्षीदार होत आहे. या सोहळ्यात आचार्य श्री विद्यानंदजी मुनीराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे पावित्र्य त्यांनी अधोरेखित केले. पूज्य आचार्यांच्या अमर प्रेरणेने भारलेला हा कार्यक्रम एक असामान्य आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण करत आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आजच्या दिवसाला आणखी एका कारणामुळे विशेष महत्त्व आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. मोदी यांनी आठवण करून दिली की, 28 जून 1987 रोजी आचार्य श्री विद्यानंदजी मुनीराज यांना औपचारिकपणे 'आचार्य' ही पदवी प्रदान करण्यात आली होती. ही केवळ एक पदवी नव्हती, तर जैन परंपरेला विचार, शिस्त आणि करुणेने जोडणाऱ्या एका पवित्र प्रवाहाची ही सुरुवात होती, यावर पंतप्रधानांनी भर दिला. देश आचार्य विद्यानंदजी मुनीराज यांची जन्मशताब्दी साजरी करत असताना, ही तारीख त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण करून देते, असे पंतप्रधानांनी सांगितले. आचार्य श्री विद्यानंदजी मुनीराज यांना आदरांजली वाहताना मोदींनी, सर्वांना आचार्यांचे आशीर्वाद लाभावे अशी सदिच्छा व्यक्त केली.
“श्री विद्यानंदजी मुनीराज यांचा शताब्दी सोहळा हा एक सामान्य कार्यक्रम नाही, तर तो एका युगाची आठवण आणि एका महान तपस्वीच्या जीवनाचा प्रतिध्वनी आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. या ऐतिहासिक प्रसंगाचे स्मरण करण्यासाठी विशेष स्मारक नाणी आणि टपाल तिकिटे जारी करण्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मोदींनी आचार्य श्री प्रज्ञा सागरजी यांची विशेषत्वाने महती सांगितली आणि त्यांना अभिवादन केले, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो अनुयायी पूज्य गुरुंनी दाखवलेल्या मार्गावर चालत असल्याचे नमूद केले. या प्रसंगी आपल्याला 'धर्मचक्रवर्ती' ही पदवी प्रदान करण्यात आली असल्याचा उल्लेख मोदी यांनी केला आणि संतांकडून जे काही प्राप्त होते, ते नम्रपणे आशीर्वाद म्हणून स्वीकारण्याची भारतीय परंपरा आहे, असे सांगितले. त्यामुळेच त्यांनी अतिशय नम्रपणे ही पदवी स्वीकारली आणि ती भारतमातेच्या चरणी समर्पित केली.
या दिव्य व्यक्तिमत्वासोबत आपल्या भावनिक संबंधांवर त्यांनी भर दिला, ज्यांचे शब्द आयुष्यभर त्यांच्यासाठी मार्गदर्शक सिद्धांत म्हणून काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा पूज्य व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना साहजिकच भावना दाटून येतात, असे त्यांनी सांगितले. श्री विद्यानंदजी मुनिराज यांच्याबद्दल बोलण्याऐवजी, त्यांना पुन्हा एकदा त्यांना ऐकण्याचे भाग्य लाभले असते तर बरे झाले असते अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. अशा महान व्यक्तिमत्त्वाचा प्रवास शब्दात मांडणे सोपे नाही, असे मोदी म्हणाले.
आचार्य विद्यानंदजी मुनिराज यांचा जन्म 22 एप्रिल 1925 रोजी कर्नाटकच्या पवित्र भूमीवर झाला आणि त्यांना 'विद्यानंद' हे आध्यात्मिक नाव देण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. आचार्यांचे जीवन हे ज्ञान आणि आनंदाचा एक अद्वितीय संगम होते, असे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या भाषणात सखोल ज्ञान होते, तरीही त्यांचे शब्द इतके सोपे होते की कोणालाही ते समजू शकतील, असे ते म्हणाले. आचार्य विद्यानंदजींनी 150 पेक्षा जास्त ग्रंथांचे लेखन केले, हजारो किलोमीटर पायी प्रवास केला, आणि आपल्या अथक प्रयत्नांनी लाखो तरुणांना शिस्त व सांस्कृतिक मूल्यांशी जोडले, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. त्यामुळे पंतप्रधानांनी आचार्य श्री विद्यानंदजी मुनीराज म्हणजे एका युगाचे द्रष्टे व्यक्तिमत्व अशा शब्दात त्यांचे वर्णन केले. आचार्यांचे आध्यात्मिक तेजोवलय अनुभवण्याचे आणि त्यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन व आशीर्वाद घेण्याची संधी मिळाल्यामुळे आपण स्वतःला अतिशय भाग्यवान मानत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या शताब्दी सोहळ्यातही पूज्य आचार्यांचे तेच प्रेम आणि जिव्हाळा यांची अजूनही अनुभूती होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
"भारत ही जगातील सर्वात जुनी जिवंत सभ्यता आहे, आपल्याकडील संकल्पना, तात्विक विचार आणि जगाबद्दलचा दृष्टीकोन चिरंतन असल्याने देश हजारो वर्षे टिकून राहिला आहे," असे मोदी म्हणाले. ऋषी, मुनी, संत आणि आचार्यांचे ज्ञान हे शाश्वत दृष्टीचे उगमस्थान असल्याचे ते म्हणाले. आचार्य श्री विद्यानंद जी मुनीराज हे या कालातीत परंपरेचे आधुनिक काळातील दीपस्तंभ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान पुढे म्हणाले की आचार्यांना अनेक विषयांचे सखोल ज्ञान होते तसेच त्यांनी अनेक क्षेत्रात आपले प्रावीण्य देखील दाखवून दिले होते. आचार्यांची आध्यात्मिक बैठक, त्यांचे अफाट ज्ञान तसेच कन्नड, मराठी, संस्कृत आणि प्राकृत यांसारख्या भाषांवरील प्रभुत्व या गोष्टींचा त्यांनी गौरवाने उल्लेख केला. आचार्यांनी साहित्य आणि धर्म यासाठी दिलेले योगदान, शास्त्रीय संगीतावरील त्यांची भक्ती आणि राष्ट्रसेवेप्रती असलेली अढळ बांधिलकी विशद करत, आचार्यांनी आदर्श मानदंड स्थापित केले नाहीत असा जीवनाचा कोणताही पैलू नसेल, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
आचार्य विद्यानंद जी हे केवळ थोर संगीतकारच नव्हते तर ते प्रखर देशभक्त आणि स्वातंत्र्यसेनानी, आणि पूर्ण विरक्ततेचे मूर्त रुप असलेले निग्रही दिगंबर मुनी होते, असेही त्यांनी नमूद केले. ज्ञानाचा ठेवा आणि आध्यात्मिक आनंदाचे स्रोत अशा शब्दात त्यांनी त्यांचे वर्णन केवे. सुरेंद्र उपाध्याय पासून आचार्य श्री विद्यानंद जी मुनिराज बनण्यापर्यंत झालेला प्रवास हा सामान्य व्यक्तीचे पुण्यात्म्यामध्ये झालेले रुपांतर असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. भविष्य हे वर्तमान जीवनाच्या मर्यादेत बांधलेले नसते तर ते एखादी व्यक्ती त्याला कशी दिशा देते, तिचा हेतू आणि निर्धार यावर अवलंबून असते, ही प्रेरणा त्यांनी दिली.
आचार्य श्री विद्यानंद जी मुनीराज यांनी आपले जीवन केवळ अध्यात्मापुरतेच सीमित न ठेवता सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्बांधणीसाठी आपले जीवन हे माध्यम बनविल्याचे स्पष्ट करत, प्राकृत भवन आणि विविध संशोधन संस्थांची स्थापना करून आचार्यांनी ज्ञानाची ज्योत नवीन पिढ्यांकडे सोपवल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आचार्यांनी जैन इतिहासाला योग्य मान्यता मिळवून दिल्याचेही ते म्हणाले. 'जैन दर्शन' आणि 'अनेकान्तवाद' सारख्या मौलिक ग्रंथांचे लेखन करून, त्यांनी तात्विक विचार अधिक प्रगल्भ केला तसेच समावेशकता आणि आकलनाची कक्षा वाढवली. मंदिराच्या जीर्णोद्धारापासून ते वंचित मुलांच्या शिक्षणापर्यंत, आणि व्यापक समाजकल्याणापर्यंत आचार्यांच्या प्रत्येक प्रयत्नातून आत्मसाक्षात्कार आणि सार्वजनिक हिताची तळमळ दिसून येते, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
जीवन खऱ्या अर्थाने अध्यात्मिक बनले तरच ते निःस्वार्थ सेवेचे साधन बनते असे आचार्य विद्यानंद जी महाराजांनी एकदा म्हटले होते, याचे स्मरण करून देत मोदी म्हणाले, या विचाराचे मूळ जैन तत्त्वज्ञानाच्या मर्मामध्ये असून ते भारताच्या अंतर्निहित भावनेशी संबंधित आहे. "भारत हे असे राष्ट्र आहे ज्याची व्याख्या सेवा आणि मानवता या मार्गदर्शक सूत्रानुसार केली जाते". जग शतकानुशतके हिंसेने हिंसाचार दडपण्याचा प्रयत्न करत असताना भारताने जगाला अहिंसेच्या सामर्थ्याची ओळख करून दिल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. भारतीय नीतीमूल्यांनी नेहमीच मानवतेच्या सेवेच्या भावनेला सर्वात वरचे स्थान दिले आहे, यावरही त्यांनी भर दिला.
भारताचा सेवाभाव निःस्वार्थ आहे, तो स्वार्थाच्या पलीकडचा आणि निस्वार्थतेने प्रेरित आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. हेच तत्व आज देशाच्या प्रशासनाचे मार्गदर्शक तत्व असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, आयुष्मान भारत योजना आणि वंचितांसाठी मोफत अन्नधान्य वाटप यांसारख्या उपक्रमांचा उल्लेखही त्यांनी केला. समाजाच्या तळागाळातील लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या सर्व उपक्रमांतून याच तत्वाचे प्रतिबिंब उमटले असल्याचे ते म्हणाले. सर्व योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचाव्यात आणि कोणीही मागे राहणार नाही, तसेच होणारी प्रगती ही खऱ्या अर्थाने समावेशक असेल याची सुनिश्चिती करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. हा संकल्प आचार्य श्री विद्यानंद जी मुनीराज यांच्या आदर्शांनी प्रेरित असल्याचा, तसेच तो परस्पर सामायिक राष्ट्रीय वचनबद्धता असल्याचे ते म्हणाले.
तीर्थंकर, साधू आणि आचार्यांची शिकवण आणि शब्द प्रत्येक युगात कालातीत आणि सुसंबद्ध राहतात, असे पंतप्रधान म्हणाले. आज पंच महाव्रते, अनुव्रत, त्रिरत्न आणि षट् आवश्यक कर्तव्ये ही जैन धर्माची तत्त्वे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाची झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. चिरस्थायी तत्वज्ञानही त्या त्या काळाच्या गरजेनुसार सामान्य माणसांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची बाबही त्यांनी नमूद केली. आचार्य श्री विद्यानंद जी मुनीराज यांनी आपले जीवन आणि कार्य याच उद्देशाला समर्पित केले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले. आचार्यजींनी जैन धर्मग्रंथ सुलभ भाषेत सादर करण्यासाठी वचनामृत चळवळ सुरू केली, त्यांनी भक्ती संगीताचा वापर करून गहन आध्यात्मिक संकल्पना सामान्य लोकांसाठी सोप्या आणि सुलभ पद्धतीने पोहोचवल्या असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी आचार्यजींच्या एका भजनाचा दाखलाही दिला. अशा रचना म्हणजे ज्ञानरुपी मोत्यांनी विणलेल्या आध्यात्मिक माळा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. अमरत्वावरील हा निर्मळ विश्वास आणि अनंताकडे पाहण्याच्या धैर्यामुळे भारतीय अध्यात्म आणि संस्कृती खरोखरच अपवादात्मक बनली असल्याचे त्यांनी सांगितले.
आचार्य श्री विद्यानंद जी मुनीराज यांचे शताब्दी वर्ष हे सातत्यपूर्ण प्रेरणेचे वर्ष असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आचार्यजींच्या आध्यात्मिक शिकवणीचा अंगिकार वैयक्तिक जीवनात करण्यासोबतच, समाज आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी त्यांचे कार्य पुढे नेणे ही आपली जबाबदारी असल्याचे पंप्रधान म्हणाले. आचार्य विद्यानंदजी यांनी त्यांच्या साहित्यिक कार्यांतून तसेच भक्तिमय रचनांतून प्राचीन प्राकृत भाषेचे पुनरुज्जीवन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. प्राकृत ही भारताच्या सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असून, ती भगवान महावीरांच्या शिकवणीचे मूळ माध्यम आहे, या भाषेतच जैन आगमांची रचना केली गेली, असे पंतप्रधानांनी सांगितले. संस्कृतीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे ही भाषा सामान्य वापरातून लुप्त होऊ लागली होती, ही बाब त्यांनी नमूद केली. आचार्य विद्यानंद जी यांच्यासारख्या संतांचे प्रयत्न आता राष्ट्रीय प्रयत्न बनले आहेत, असे मोदी यांनी पुढे सांगितले. ऑक्टोबर 2024 मध्ये सरकारने प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, याचे स्मरण त्यांनी उपस्थितांना करून दिले. भारताच्या प्राचीन हस्तलिखितांचे संरक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डिजिटायझेशन मोहिमेचाही उल्लेख त्यांनी केला. या मोहिमेअंतर्गत मोठ्या संख्येने जैन धर्मग्रंथ आणि आचार्यांशी संबंधित ग्रंथांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार उच्च शिक्षणात मातृभाषेच्या वापराला प्रोत्साहन देत असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. लाल किल्ल्यावरून आपण दिलेल्या भाषणाचाही दाखला त्यांनी दिला. त्या भाषणातून आपण राष्ट्राला वसाहतवादी मानसिकतेतून मुक्त करण्याचा, तसेच विकास आणि वारसा दोन्ही सोबत घेऊन पुढे जाण्याचा संकल्प मांडला होता, याचा त्यांनी पुन्हा एकदा उल्लेख केला. हीच वचनबद्धता भारताच्या सांस्कृतिक आणि तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांची मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. 2024 मध्ये सरकारने मोठ्या स्वरुपात भगवान महावीरांच्या 2,550 व्या निर्वाण महोत्सवाचे आयोजन केले होते, आणि हा महोत्सव आचार्य विद्यानंद जी मुनीराज यांच्या प्रेरणेने, तसेच आचार्य श्री प्रज्ञा सागर जी यांच्यासारख्या संतांच्या आशीर्वादाने पार पडला होता, याचे स्मरण त्यांनी उपस्थितांना करून दिले. येत्या काळात आपल्या सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी देशाने असे आणखी मोठे प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले. आत्ता होत असलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच, अशा सर्व उपक्रमांना सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या मंत्राचे, तसेच लोकसहभागाच्या भावनेचे मार्गदर्शन मिळत राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मोदी म्हणाले की या प्रसंगी त्यांची उपस्थिती नैसर्गिकपणे नव संकल्प जाहीर करण्यात आले होते, त्या ‘नवकार मंत्र दिवसाची’ आठवण करून देते. त्यांनी आनंद व्यक्त केला की मोठ्या संख्येने नागरिक हे संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले की आचार्य श्री विद्याप्रभाजी मुनीराज यांच्या शिकवणुकीमुळे हे संकल्प अधिक बळकट होत आहेत.
पंतप्रधानांनी पुन्हा एकदा नव संकल्प आठवून दिले: ते म्हणाले, पहिला संकल्प आहे पाणी वाचवा – प्रत्येक थेंबाचे महत्त्व समजून घेणे ही केवळ जबाबदारी नाही, तर पृथ्वी मातेप्रती हे आपले कर्तव्य आहे. दुसरा संकल्प एक झाड आईच्या नावाने’ – आपल्या आईच्या नावाने एक झाड लावा आणि आई जशी आपल्याला वाढवते, तशीच त्या झाडाची काळजी घ्या. असे प्रत्येक झाड आईकडून मिळालेला जिवंत आशीर्वाद ठरेल. तिसरा संकल्प स्वच्छता केवळ दाखवण्यासाठी नाही तर ती अंतःकरणातील अहिंसेचे प्रतीक आहे. प्रत्येक रस्ता, परिसर व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. चौथा संकल्प ‘व्होकल फॉर लोकल’ अर्थात देशात तयार झालेल्या, आपल्या कष्टातून निर्माण झालेल्या वस्तू वापराव्यात व प्रचार करावा. पाचवा संकल्प भारत देश समजून घ्या – जग बघणे चांगलेच आहे, पण आपला भारत समजून घेणे, अनुभवणे आणि जपणे गरजेचे आहे. सहावा संकल्प म्हणजे नैसर्गिक शेतीचा स्वीकार – पृथ्वी मातेला रसायनांपासून मुक्त करण्यासाठी आणि गावोगावी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही दिशा आवश्यक आहे. सातवा संकल्प निरोगी जीवनशैलीचा अवलंब हा आहे. संतुलित आहार, पारंपरिक भारतीय जेवणात भरड धान्यांचा समावेश, आणि तेलाचे सेवन किमान दहा टक्क्यांनी कमी करणे आवश्यक आहे. आठवा संकल्प दररोज योग व खेळ अंगीकारा, म्हणजे शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग व खेळ नियमित जीवनाचा भाग व्हावा. नववा संकल्प गरीबांची मदत करा हा असून गरिबांच्या हाती हात देऊन त्यांना गरिबीमधून बाहेर काढणे हीच खरी सेवा आहे.
पंतप्रधानांनी सांगितले की या नव संकल्पांवर कार्य करून आपण आचार्य श्री विद्याप्रभाजी मुनीराज यांची शिकवण अधिक बळकट करू शकतो.
“भारताचा अमृत काळाचा दृष्टिकोन हा राष्ट्राच्या आत्म्यात खोलवर रुजलेला आहे आणि आपल्या संतांच्या ज्ञानाने समृद्ध झालेला आहे,”असे मोदी म्हणाले. त्यांनी नमूद केले की 140 कोटी भारतीय हे अमृत संकल्प पूर्ण करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत आणि एका विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की हे स्वप्न म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षा पूर्ण करणे होय. या दृष्टीकोनाला आचार्य श्री विद्याप्रभाजी मुनीराज यांच्यापासून प्रेरणा मिळते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार चालणे, त्यांच्या शिकवणीचे आंतरिकीकरण करणे आणि राष्ट्रनिर्मितीला जीवनातील सर्वोच्च कर्तव्य मानणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. मोदी यांनी विश्वास व्यक्त केला की या पवित्र प्रसंगाची पावित्र्यपूर्ण भावना या संकल्पांना अधिक बळ देईल. त्यांनी आचार्य श्री विद्याप्रभाजी मुनीराज यांना या निमित्त कृतज्ञ अभिवादन केले.
पार्श्वभूमी:
आचार्य विद्याप्रभाजी महाराज यांचे शताब्दी वर्ष हे भारत सरकार आणि भगवान महावीर अहिंसा भारती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने साजरे करण्यात येत आहे. हे वर्षभर चालणारे राष्ट्रीय श्रद्धांजली वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये देशभरात सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि आध्यात्मिक उपक्रम राबवण्यात येतील.
आचार्य विद्याप्रभाजी महाराज यांनी जैन तत्वज्ञान व आचारधर्मावर 50 पेक्षा अधिक ग्रंथ लिहिले. त्यांनी भारतभर प्राचीन जैन मंदिरांच्या जीर्णोद्धारामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली तसेच प्राकृत, जैन तत्वज्ञान व शास्त्रीय भाषांमध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी काम केले.
***
M.Pange/S.Patil/M.Ganoo/N.Gaikwad/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2140427)
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam