सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (पीएमएमएल) सोसायटीची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न


पंतप्रधानांनी 'म्युझियम मॅप ऑफ इंडिया'ची दूरदर्शी संकल्पना मांडली

Posted On: 23 JUN 2025 9:35PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीमध्ये तीन मूर्ती भवन येथे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (पीएमएमएल) सोसायटीची 47 वी  वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.

बैठकीदरम्यान, पंतप्रधानांनी भर देत सांगितले  की संग्रहालयांना जगभरात खूप महत्व आहे आणि त्यांच्यात आपल्याला इतिहासाची अनुभूती देण्याचे सामर्थ्य आहे. संग्रहालयांबद्दल लोकांच्या मनात आवड निर्माण करण्यासाठी आणि समाजात त्याची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

पंतप्रधानांनी "म्युझियम मॅप ऑफ इंडिया" ही दूरदर्शी संकल्पना मांडली, ज्याचा उद्देश देशभरातील संग्रहालयांचे एकात्मिक सांस्कृतिक आणि माहितीपूर्ण परिदृश्य प्रदान करणे, हे आहे.

 

तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराचे महत्त्व अधोरेखित करत, पंतप्रधानांनी देशातील सर्व संग्रहालयांचा सर्वसमावेशक राष्ट्रीय डेटाबेस विकसित करण्याची सूचना केली, ज्यामध्ये लोकसंख्या आणि गुणवत्ता मानके यासारख्या महत्त्वाच्या निकषांचा समावेश असेल. संग्रहालयांचे व्यवस्थापन आणि संचालन करणाऱ्यांसाठी नियमित कार्यशाळा आयोजित कराव्यात, ज्यामध्ये क्षमता विकास आणि ज्ञानाची देवाणघेवाण यावर भर द्यावा, असेही त्यांनी सुचवले. देशातील संग्रहालयांबाबत नवीन कल्पना आणि दृष्टिकोन समोर आणण्यासाठी प्रत्येक राज्यातील 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पाच व्यक्तींचा समावेश असलेली समिती स्थापन करणे, यासारख्या नवीन उपक्रमांची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासह सर्व पंतप्रधानांशी संबंधित  संग्रहालयाची उभारणी करून त्यांचा ठेवा जपण्यात आला  याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. 2014 पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. भारतीय संग्रहालयांमध्ये जतन केलेल्या समृद्ध वारशाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी पंतप्रधानांनी संग्रहालयांना भेट देण्यासाठी महत्वाच्या प्रभावशाली व्यक्तींना सहभागी करून घेण्याचे आणि विविध दूतावासांच्या अधिकाऱ्यांना भारतीय संग्रहालयांमध्ये आमंत्रित करण्याचे आवाहन केले.

आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण होत असताना आणीबाणीच्या काळातील सर्व कायदेशीर लढाया आणि कागदपत्रांचे संकलन करून त्याचे जतन करावे, अशी सूचना पंतप्रधानांनी केली.
पंतप्रधानांनी वर्तमानाचे पद्धतशीरपणे जतन आणि दस्तऐवजीकरण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की आपल्या सध्याच्या प्रणाली आणि नोंदी मजबूत करून, आपण हे सुनिश्चित करू शकतो की भविष्यातील पिढ्या आणि विशेषतः संशोधक या काळाचा अभ्यास करण्यासाठी आणि तो समजून घेण्यासाठी कोणत्याही अडचणीशिवाय सक्षम असतील.
पीएमएमएल सोसायटीच्या इतर सदस्यांनीही संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या अधिक विकासासाठी त्यांच्या सूचना आणि दृष्टीकोन मांडला.
पंतप्रधानांनी तीन मूर्ती हाऊसच्या हिरवळीवर कापूराचे झाड देखील लावले, जे विकास, वारसा आणि शाश्वततेचे प्रतीक आहे.

***

SushamaK/RAgashe/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2139120) Visitor Counter : 3