संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्र्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 साजरा करताना सशस्त्र दलांचे केले नेतृत्व; 2,500 जवानांसोबत विविध आसने आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम केले
Posted On:
21 JUN 2025 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 21 जून 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथील नॉर्दर्न कमांड येथे सुमारे 2,500 जवानांसोबत 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करताना सशस्त्र दलांचे नेतृत्व केले. आपल्या भाषणात त्यांनी जागतिक स्तरावर योग लोकप्रिय करण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आणि अधोरेखित केले की हा योगाभ्यास आरोग्य आणि निरामयतेप्रती एक समग्र दृष्टिकोन प्रदान करतो. आजच्या वेगवान जगात लोकांना भेडसावणारे तणाव, चिंता आणि नैराश्यासारख्या समस्यांवर योग हा एक सार्वत्रिक उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑपरेशन सिंदूर हे संयमाचे एक उत्तम उदाहरण असल्याचे सांगत राजनाथ सिंह म्हणाले की भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान जो संयम, संतुलन आणि अचूकता दाखवली, ती योगाभ्यासातून प्राप्त त्यांच्या आंतरिक शक्तीचे प्रतिबिंब आहे. त्यांनी सांगितले की पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या माध्यमातून भारताच्या सामाजिक आणि सांप्रदायिक एकतेला लक्ष्य करण्यात आले आणि ऑपरेशन सिंदूर हा पाकिस्तानला एक स्पष्ट संदेश होता की भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.
'योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा पुनरुच्चार करत संरक्षण मंत्री म्हणाले की ते केवळ एक राजनैतिक उद्धरण नाही तर एक दृष्टिकोन आहे. योगविद्येच्या माध्यमातून भारताने जगाला एक असे साधन दिले आहे जे कोणत्याही सीमा, धर्म आणि संस्कृतीच्या पलीकडे आहे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नॉर्दर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा उपस्थित होते. सर्व सहभागींनी पंतप्रधानांचे विशाखापट्टणम येथील आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या मुख्य कार्यक्रमातील भाषण पाहिले. जम्मू-काश्मीर आणि लडाख प्रांतातील दुर्गम भूभागात अनेक ठिकाणी योग सत्रे सादर करण्यात आली, जी आपल्या सैनिकांची वचनबद्धता आणि उत्साह दर्शवितात.

झारखंडमधील रांची येथील कुम्हरिया येथील पीएम श्री हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय दिन-2025 समारंभाला संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आणि अधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी निरोगी राष्ट्राच्या उभारणीत योगविद्येचे महत्त्व अधोरेखित केले. योगसाधनेतून मिळणारी शिस्त आणि ऊर्जा त्यांनी अधोरेखित केली आणि सर्वांना, विशेषतः मुलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात योगाभ्यासाचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले. जागतिक स्तरावर योगसाधनेचा प्रसार करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.
संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि संरक्षण मंत्रालयाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीतील संरक्षण लेखा महानियंत्रक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात योगाभ्यास केला.
एकात्मिक संरक्षण मुख्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि संग्रहालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. एकात्मिक संरक्षण कर्मचाऱ्यांचे प्रमुख एअर मार्शल आशुतोष दीक्षित प्रमुख पाहुणे होते, त्यांनी सशस्त्र दलांची निरामयता आणि एकतेप्रती वचनबद्धता अधोरेखित केली.

नवी दिल्ली येथील आर्मी रुग्णालयात (रिसर्च अँड रेफरल) योग दिन कार्यक्रमात 1,500 पेक्षा जास्त डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांनी उत्साहाने सहभाग घेतला. पर्यावरण आणि शाश्वत आरोग्याप्रती वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून, कमांडंट लेफ्टनंट जनरल शंकर नारायण, डेप्युटी कमांडंट मेजर जनरल अमूल कपूर, कर्मचारी आणि रुग्णांनी रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण मोहीम हाती घेतली.
* * *
M.Pange/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2138495)