वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
विशिष्ट मौल्यवान मिश्रधातूंच्या(सोने असलेल्या) आयातीवर निर्बंध
सीटीएच 2843 अंतर्गत कोलॉयडल धातू आणि संयुगांच्या आयातीवर निर्बंध
प्रविष्टि तिथि:
19 JUN 2025 9:59PM by PIB Mumbai
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) 17 जून, 2025 रोजी अधिसूचना क्रमांक 18/2025-26 जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, पॅलॅडियम (Palladium), ऱ्होडियम(Rhodium) आणि इरिडियम (Iridium) या वजनानुसार 1% पेक्षा जास्त सोने असलेल्या मिश्रधातूंच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
या पावलामुळे प्लॅटिनमच्या आयातीवरील सध्याच्या निर्बंधांचा (दि. 05.03.2025 ची अधिसूचना क्र. 60/2024-25नुसार) विस्तार झाला असून आता यात कस्टम्स टॅरिफ हेडिंग (CTH) 7110 च्या संपूर्ण 4-अंकी स्तराचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे मौल्यवान धातू आणि त्यांच्या मिश्रधातूंच्या आयात धोरणामध्ये एकसमानता सुनिश्चित होत आहे.
त्याच वेळी या धोरणामुळे 1% पेक्षा कमी सोने असलेल्या मिश्रधातूंच्या मुक्त आयातीच्या अनुमतीमुळे व्यापार सुविधा उपलब्ध होऊन इलेक्ट्रॉनिक्स, स्वयंचलित वाहनांचे सुटे भाग आणि विशेष रासायनिक उद्योगांसह औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्रांसाठी आवश्यक कच्च्या मालाचा (inputs) अखंडित पुरवठा सुनिश्चित होतो. हा सुनियोजित दृष्टिकोन व्यापार सुलभता आणि नियामक देखरेखीची गरज यांच्यात समतोल साधणारा आहे.
याबरोबरच, डीजीएफटीने 17 जून 2025 रोजी अधिसूचना क्रमांक 19/2025-26, जारी केली आहे. यानुसार CTH 2843 अंतर्गत येणाऱ्या कोलॉईडल धातू आणि संयुगांच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. रासायनिक संयुगांच्या नावाखाली होणाऱ्या सोन्याच्या आयातीचे नियमन करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले.
तरीही, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि विशेष रासायनिक उद्योगांसह औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्रांसाठी आयात करण्याची परवानगी दिली जाईल. यासाठी आयात अधिकृत अनुमती (import authorization) आवश्यक असेल, ज्यामुळे देशांतर्गत उद्योगांच्या प्रत्यक्ष वापरासाठीच्या गरजा कोणताही व्यत्यय न येता पूर्ण होतील.
तपशीलवार अधिसूचना डीजीएफटीच्या https://dgft.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
***
JPS/ShaileshP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2137909)
आगंतुक पटल : 24