आदिवासी विकास मंत्रालय
नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जागतिक सिकल सेल दिनानिमित्त कार्यक्रम
Posted On:
19 JUN 2025 10:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जून 2025
2047 पर्यंत देशातून सिकल सेल आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे केंद्रिय राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनी आज नवी दिल्लीत सांगितले. जागतिक सिकल सेल दिनानिमित्त एम्स रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमात ते म्हणाले, सिकल सेल आजाराच्या निर्मूलनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. देशातून या रोगाला हद्दपार करण्यासाठी आपले मंत्रालय अन्य संबंधित घटकांसोबत काम करत आहे अशी माहिती त्यांनी दिली. 1 जुलै 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 वर्षाअखेरपर्यंत सिकल सेल रोग भारतातून हद्दपार करण्याचा सरकारचा निर्धार व्यक्त केला होता. पंतप्रधानांच्या या निर्धाराला अनुसरुन आपले मंत्रालय अन्य मंत्रिभागांसोबत काम करत आहे. संपूर्ण तपासणी, चाचण्या व रोग निर्मूलनासाठीच्या इतर आवश्यक बाबी पूर्णत्वाकडे आलेल्या आहेत असे त्यांनी सांगितले. हे केवळ वैद्यकीय क्षेत्रासाठीचे आव्हान नसून देशातल्या आदिवासी समाजाला सामाजिक न्याय प्रदान करण्याची चळवळ आहे असे सांगून त्यांनी भारतातून हा रोग हद्दपार करण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. दरम्यान, राज्यमंत्र्यांनी सिकल सेल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसोबत संवाद साधला. देशाच्या विविध भागातून आलेले रुग्ण दिल्लीत उपचार घेत आहेत. या सर्वांना केंद्र व राज्य सरकार सर्व प्रकारची मदत करेल आणि या आजारावरील सर्व औषधे रुग्णांना मोफत उपलब्ध करुन दिली जातील असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

सध्या सिकल सेल रोगावरील केवळ एकच औषध उपलब्ध आहे. रुग्णाच्या शारिरीक अवस्थेनुसार अथवा आजाराच्या गांभीर्यानुसार उपचार करण्यासाठी औषधांचे इतर पर्याय सध्या उपलब्ध नाहीत. गर्भावस्था किंवा अन्य गंभीर आजारांसारख्या विशेष परिस्थितीत ही समस्या आणखीनच गंभीर बनते. त्यामुळे या आजारावर लवकरात लवकर नवीन औषधे विकसित होण्याची आवश्यकता आहे. एम्स दिल्लीच्या सहकार्याने आरोग्य मंत्रालय या औषध संशोधनासाठी एक स्पर्धा आयोजित करणार आहे. यात निवड झालेल्या प्रस्तावाला औषध विकासासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाईल.

जागतिक सिकल सेल दिनाचा एक भाग म्हणून सिकल सेलचे प्रमाण अधिक असणाऱ्या सर्व 17 राज्यांमध्येही राज्यस्तरीय कार्यक्रम तसेच सिकल सेलविरोधी मोहीम सुरू असलेल्या सर्व 365 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय कार्यक्रम आहेत.
जागतिक सिकल सेल दिन – सिकल सेल रोग, त्याचे परिणाम व वेळेत निदान आणि उपचार याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने 19 जून हा दिवस दरवर्षी जागतिक सिकल सेल दिन म्हणून पाळला जातो.
N.Chitale/S.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2137856)